कोल्हापुरात नशामुक्ती अभियानाला वेग; ३०० गावांत प्रशासनाची थेट पोहोच, विकासकामांसह विविध उपक्रमांना गती

कोल्हापूर जिल्ह्यात नशामुक्त कोल्हापूर अभियान युद्धपातळीवर सुरू असून ३०० गावांमध्ये प्रशासन पोहोचले आहे. घरकुल, भूमापन, क्रीडा, जलसंधारण, रस्ते अपघात प्रतिबंध आणि विविध विकासकामांची माहिती पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.

कोल्हापुरात नशामुक्ती अभियानाला वेग; ३०० गावांत प्रशासनाची थेट पोहोच, विकासकामांसह विविध उपक्रमांना गती
कोल्हापूर, प्रकाश आबिटकर, नशामुक्त कोल्हापूर अभियान, नशामुक्त गाव, अमली पदार्थ, ३०० गावे,

प्रतिनिधी: उमेश जाधव 

कोल्हापूर : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासोबतच सामाजिक प्रश्नांवरही प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित केले असून, ‘नशामुक्त कोल्हापूर अभियान’ युद्धपातळीवर राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील तब्बल ३०० गावांमध्ये जिल्हा प्रशासनाचे अधिकारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचल्याची माहिती पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.

जिल्ह्यात १३ जुलैपासून ‘नशामुक्त कोल्हापूर अभियान’ सुरू करण्यात आले असून अमली पदार्थांच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. गांजा व अमली पदार्थांबाबत गोपनीय माहिती देण्यासाठी पोलीस विभागाकडून ९८२२७६६१०० हा संपर्क क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे. अमली पदार्थांच्या बाबतीत ‘शून्य सहनशीलता’ (झिरो टॉलरन्स) धोरण राबविण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहेत.

शाळा, महाविद्यालये आणि आयटीआय परिसराच्या आजूबाजूचा १०० मीटरचा परिसर पूर्णपणे व्यसनमुक्त व निर्बंधित ठेवण्यावर भर देण्यात आला आहे. येत्या १५ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, नगरपालिका आणि महानगरपालिकांमध्ये नशामुक्तीचे ठराव मंजूर करण्यात येणार आहेत. ‘नशामुक्त वॉर्ड’ आणि ‘नशामुक्त ग्रामपंचायत’ ही संकल्पना यशस्वीपणे राबविणाऱ्या संस्थांना शासनाच्या वतीने लवकरच प्रोत्साहनात्मक बक्षिसे देण्यात येतील, असे पालकमंत्री आबिटकर यांनी स्पष्ट केले.

कोल्हापूरच्या खेळाडूंचे अभिनंदन

जागतिक योगासन स्पर्धेत कोल्हापूरचे रोहीत चव्हाण, वृंदा भुतडा आणि निवेष पाटील यांनी सुवर्ण व रौप्य पदके मिळविल्याबद्दल पालकमंत्र्यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.

मेजर ध्यानचंद हॉकी मैदानावर अॅस्ट्रोटर्फ बसविण्यात आले असून, ३२ एकर जागेवर अद्ययावत आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम उभारण्याचा प्रस्ताव राज्य शासनाने मंजूर केला आहे. त्यानुसार दर्जेदार क्रिकेट स्टेडियम उभारण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

जिल्ह्यात ८९ हजारांहून अधिक घरकुले मंजूर

‘देशात कोणीही बेघर राहू नये’ या उद्देशाने सर्वांसाठी घरे उभारण्याचे काम सुरू असल्याचे सांगत पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील घरकुल योजनेची माहिती दिली. जिल्ह्यात ८९ हजार १४१ लाभार्थ्यांना घरकुले मंजूर झाली असून, त्यापैकी ४४ हजार १९६ घरकुले पूर्ण झाली आहेत.

तसेच, दीड गुंठ्यापर्यंत सन २०११ पूर्वी झालेले अतिक्रमण नियमानुकूल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला असून, याचा जिल्ह्यातील सुमारे २९ हजार व्यक्तींना लाभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

भूमापन प्रक्रिया होणार अधिक गतिमान

भूमी अभिलेख विभागासाठी जिल्हा प्रशासनाने ३२ रोव्हर आणि ६० लॅपटॉप उपलब्ध करून दिल्याने जिल्ह्यातील भूमापन प्रक्रिया अधिक गतिमान झाली आहे. जिल्हास्तरावर ५० परवानाधारक भूमापक म्हणून स्थापत्य अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कोल्हापूर व हुपरी शहरासाठी नगर भूमापन करून नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड मिळण्यासाठी जिल्हा नियोजन समितीने निधीची तरतूद केली आहे. नगर भूमिधारकांसाठी अशा प्रकारे निधी उपलब्ध करून देणारी कोल्हापूर जिल्हा नियोजन समिती महाराष्ट्रातील पहिली जिल्हा नियोजन समिती असल्याचेही पालकमंत्री आबिटकर यांनी सांगितले.

पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी विशेष उपक्रम

पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी श्री गणेशमूर्ती व निर्माल्य संकलन उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. सन २०२५-२६ मध्ये सुमारे तीन लाख श्री गणेशमूर्ती, १ हजार ३५२ ट्रॉली आणि ३५८ घंटागाड्यांद्वारे निर्माल्य संकलित करण्यात आले.

यंदाही नागरिकांनी प्रदूषणमुक्त गणेशोत्सव साजरा करून पर्यावरण संवर्धनाला हातभार लावावा, असे आवाहन पालकमंत्री आबिटकर यांनी केले.

अपघातग्रस्तांना तातडीच्या उपचारासाठी योजना

रस्ते अपघातातील बळींची संख्या वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त करताना अपघातग्रस्तांना पहिल्या तासात उपचार मिळणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

PM-RAHA-T योजनेअंतर्गत पात्र अपघातग्रस्तांना सात दिवसांपर्यंत दीड लाख रुपयांपर्यंत कॅशलेस उपचार उपलब्ध आहेत. तसेच अपघातग्रस्तांना तत्काळ रुग्णालयात पोहोचविणाऱ्या नागरिकांना Rah-Veer योजनेअंतर्गत २५ हजार रुपयांचे पारितोषिक व प्रशंसा प्रमाणपत्र देण्यात येते. नागरिकांनी माणुसकीच्या भावनेतून पुढे येऊन अपघातग्रस्तांना मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले.

जलसंधारण सप्ताहानिमित्त ‘वॉक फॉर वॉटर’

कार्यक्रमाच्या सुरुवातीस राष्ट्रीय गीत, राष्ट्रगीत आणि राज्यगीताचे गायन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते मृद व जलसंधारण विभागाच्या ‘जलसंधारण सप्ताह’ निमित्त आयोजित ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’ या उपक्रमाच्या लोगोचे अनावरण करण्यात आले.

यावेळी उपस्थितांनी मृद व जलसंधारणासंबंधीची शपथ घेतली.

जिल्हा क्रीडा पुरस्कारांचे वितरण

जिल्हा प्रशासनाच्या वतीने सन २०२१-२२ आणि २०२२-२३ या वर्षांत विविध क्रीडा प्रकारांत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडू आणि क्रीडा मार्गदर्शकांना जिल्हा क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात आले.

सन २०२१-२२ साठी गुणवंत क्रीडा मार्गदर्शक सागर श्रीकांत जाधव – हॉकी, गुणवंत पुरुष खेळाडू प्रथमकुमार रविंद्र शिंदे – तलवारबाजी, गुणवंत महिला खेळाडू शुभांगी शिवाजी पाटील व जान्हवी ज. सावर्डेकर – पॉवरलिफ्टिंग, तसेच गुणवंत दिव्यांग खेळाडू अन्नपूर्णा सुनिल कांबळे – पॅरा जलतरण यांना पुरस्कार देण्यात आले.

तर सन २०२२-२३ साठी गुणवंत क्रीडा मार्गदर्शक संदिप रघुनाथ पाटील – हँडबॉल/फुटबॉल, गुणवंत पुरुष खेळाडू पृथ्वीराज बाजीराव पाटील – रग्बी, गुणवंत महिला खेळाडू श्लोका श्रीपती शिंदे – तलवारबाजी आणि गुणवंत दिव्यांग खेळाडू दिपक मोहन पाटील – पॅरा जलतरण यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

इयत्ता ५वी व ८वी शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ मधील स्वर्णश्री पाटील, स्वरागिनी केंद्रे, पूर्वा भालेकर आणि अथर्व वाडकर, तसेच इयत्ता ४ थी व ७ वी शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ मधील आदर्श ओऊळकर, शिवम दंडवते, आराध्या दंडवते, देवकी काटकर, समर्थ पाटील आणि मृणाली जाधव या गुणवंत विद्यार्थ्यांना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देऊन अभिनंदन करण्यात आले.

शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या दिवंगत कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या वारसांना शासकीय सेवेत समावेशाबाबतची नियुक्तीपत्रेही यावेळी प्रदान करण्यात आली.

यावेळी पालकमंत्री आबिटकर यांनी स्वातंत्र्यसैनिक, शहीदांच्या पत्नी, आई-वडील, आणीबाणीच्या काळात कारावास भोगलेल्या व्यक्ती, शौर्य पदक विजेते आणि समाजभूषण पुरस्कारप्राप्त व्यक्तींना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमास जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सरिता थोरात, पोलीस उपअधीक्षक सुवर्णा पत्की, करवीर प्रांताधिकारी मोसमी चौगुले, उपजिल्हाधिकारी संपत खिल्लारी, मोहिनी चव्हाण, शक्ती कदम, जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख, तहसीलदार तेजस्विनी पाटील, नाथाजी सगट, हनमंत म्हेत्रे यांच्यासह स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक व त्यांचे कुटुंबीय, ज्येष्ठ नागरिक, अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी, पालक, नागरिक आणि माध्यम प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.