मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून ‘मासूम’ प्रकल्पाचा राज्यभर विस्तार
बालसंगोपन संस्थांतील मुलांच्या भावनिक आणि मानसिक आरोग्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘मासूम’ प्रकल्पाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने राज्यभर विस्तार करण्यात आला आहे. १,८६१ मुलांना याचा लाभ मिळाला आहे.
मुंबई, दि. १७ : बालसंगोपन संस्थांमध्ये राहणाऱ्या मुलांच्या भावनिक आणि मानसिक गरजांना प्रतिसाद देण्यासाठी ‘मासूम’ प्रकल्पाचा राज्यव्यापी विस्तार करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
महिला व बाल विकास विभाग आणि Aditya Birla Education Trust यांच्या ‘ईमपॉवर’ उपक्रमाच्या सहकार्याने या प्रकल्पाची अंमलबजावणी होत आहे. बालसंगोपन संस्थांमध्ये राहणाऱ्या मुलांना त्याग, आघात, शोषण आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे होणाऱ्या मानसिक तणावावर मात करण्यासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरत आहे.
एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत २० संस्थांमधील १,८६१ मुलांना या प्रकल्पाचा लाभ मिळाला असून ५,००० हून अधिक समुपदेशन सत्रे घेण्यात आली आहेत. मानकीकृत मूल्यांकनातून मुलांच्या भावनिक स्थैर्यात आणि सामाजिक वर्तनात लक्षणीय सुधारणा दिसून आली आहे.
प्रारंभी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, नाशिक आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये मर्यादित स्वरूपात सुरू झालेला हा प्रकल्प आता राज्यातील १२१ बालसंगोपन संस्थांपर्यंत विस्तारण्यात येत आहे.
या प्रकल्पांतर्गत मुलांना ट्रॉमा-आधारित समुपदेशन, मानसशास्त्रीय चाचण्या, थेरपी आणि सातत्यपूर्ण मानसिक आधार दिला जातो. काही प्रकरणांमध्ये दीर्घकालीन उपचारांचीही व्यवस्था केली जाते.
विशेष म्हणजे, पारंपरिक समुपदेशन पद्धतींऐवजी आर्ट-आधारित थेरपीचा वापर करून मुलांना त्यांच्या भावना व्यक्त करण्यास मदत केली जाते. यामुळे त्यांच्या वर्तनात सकारात्मक बदल दिसून येत आहेत. भविष्यात काही संस्थांमध्ये ऑक्युपेशनल थेरपी सुविधाही उपलब्ध करून देण्याची योजना आहे.
प्रकल्पाचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे क्षमता विकास. बालकल्याण समिती सदस्य, जिल्हा बाल संरक्षण युनिट अधिकारी आणि संस्थांतील कर्मचाऱ्यांना मानसिक आरोग्य व संवाद कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जात आहे.
नवीन करारानुसार प्रत्येक मुलाला त्याच्या गरजेनुसार योग्य सेवा मिळावी यासाठी अधीक्षक, बालकल्याण समिती आणि किशोर न्याय मंडळ यांच्यात समन्वय साधला जाणार आहे. तसेच प्रकल्पाच्या प्रगतीचे मासिक व तिमाही अहवाल महिला व बाल विकास विभागाला सादर केले जाणार आहेत.
‘मासूम’ प्रकल्प हा सार्वजनिक-खासगी भागीदारीचा प्रभावी नमुना ठरत असून मुलांमध्ये आत्मविश्वास, भावनिक सक्षमता आणि उज्ज्वल भविष्याची दृष्टी निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0