आधुनिक विज्ञानाच्या जोडीतून आयुर्वेदाला जागतिक स्तरावर नेण्याची गरज – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

आयुर्वेदाला आधुनिक वैज्ञानिक संशोधन, क्लिनिकल पडताळणी आणि नवोन्मेषाची जोड देऊन जागतिक स्तरावर प्रभावी स्थान मिळवून देण्याची गरज असल्याचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी सांगितले.

आधुनिक विज्ञानाच्या जोडीतून आयुर्वेदाला जागतिक स्तरावर नेण्याची गरज – राज्यपाल जिष्णु देव वर्मा
आयुर्वेद, आयुर्वेद दिन २०२६, राज्यपाल जिष्णु देव वर्मा, आधुनिक विज्ञान, आयुर्वेद संशोधन, क्लिनिकल संशोधन,

प्रतिनिधी : नरेश शिंदे 

मुंबई : आयुर्वेद ही भारताची प्राचीन आणि अमूल्य ज्ञानपरंपरा असून, या पारंपरिक ज्ञानाला आधुनिक वैज्ञानिक संशोधन, क्लिनिकल पडताळणी आणि नवोन्मेषाची जोड देऊन आयुर्वेदाला जागतिक स्तरावर प्रभावी स्थान मिळवून देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.

विश्व आयुर्वेद परिषद, महाराष्ट्र यांच्या वतीने ‘आयुर्वेद दिन २०२६’ निमित्त दादर येथील सूर्यवंशी सभागृहात एकदिवसीय वैज्ञानिक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन तसेच स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी केंद्रीय राज्य मंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय राज्य मंत्री श्रीपाद नाईक, कार्यक्रमाध्यक्ष रणजित पुराणिक, माजी महापौर डॉ. शुभा राऊळ, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्यंकट गिते, विश्व आयुर्वेद परिषद महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. विनायक तायडे यांच्यासह आयुर्वेद, आरोग्य, शिक्षण व उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

राज्यपाल जिष्णु देव वर्मा म्हणाले की, आयुर्वेद ही केवळ रोगांवरील उपचारपद्धती नसून निरोगी जीवनशैलीचा व्यापक ज्ञानस्रोत आहे. सध्या मधुमेह, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि हृदयरोग यांसारखे जीवनशैलीशी संबंधित आजार वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर आयुर्वेदाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरू शकते. आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यकाने परस्परपूरक दृष्टिकोनातून कार्य करण्याची गरज आहे.

आयुर्वेद शिक्षण, संशोधन आणि नवोन्मेषाला चालना देण्यासाठी जागतिक दर्जाच्या संस्था, अत्याधुनिक प्रयोगशाळा आणि संशोधन सुविधा उभारण्याची आवश्यकता असल्याचेही राज्यपालांनी नमूद केले.

निरोगी व समृद्ध भारतासाठी आयुर्वेदाची भूमिका

केंद्रीय राज्य मंत्री प्रतापराव जाधव यांनी आयुर्वेद हा केवळ उपचाराचा मार्ग नसून निरोगी जीवनशैलीचा आधार असल्याचे सांगितले. दिनचर्या, ऋतुचर्या, योग्य आहार-विहार आणि योगाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये आरोग्यदायी जीवनशैली विकसित करण्याची गरज आहे.

आयुर्वेदाला आधुनिक संशोधन आणि तंत्रज्ञानाशी जोडून देशाची आरोग्यव्यवस्था अधिक सक्षम करण्यावर भर दिला जात आहे. आयुर्वेदिक औषधी वनस्पतींच्या संवर्धनामुळे आरोग्यासोबतच पर्यावरण, शेती, रोजगार आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही चालना मिळू शकते. निरोगी, आत्मनिर्भर आणि समृद्ध भारताच्या निर्मितीसाठी सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.

आयुर्वेदाला वैज्ञानिक संशोधनाची जोड देण्याची गरज

केंद्रीय राज्य मंत्री श्रीपाद नाईक यांनी आयुर्वेद ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी असल्याचे सांगितले. पारंपरिक ज्ञानाला आधुनिक वैज्ञानिक संशोधन, प्रामाणिक पुरावे आणि क्लिनिकल डेटाची जोड दिल्यास आयुर्वेदाला देशाच्या तसेच जागतिक आरोग्य व्यवस्थेत अधिक प्रभावी स्थान मिळू शकते, असे त्यांनी नमूद केले.

आयुर्वेद शिक्षण, संशोधन, कौशल्यविकास आणि आंतरराष्ट्रीय प्रसारासाठी विविध उपक्रम राबविण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. आयुर्वेदाच्या प्राचीन ज्ञानाला आधुनिक विज्ञानाची जोड देऊन सक्षम शिक्षण व संशोधन संस्था उभारण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. तसेच आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यकाने परस्परपूरक पद्धतीने कार्य करताना रुग्णांची सुरक्षितता आणि वैज्ञानिक पुराव्यांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

आयुर्वेदाच्या प्रचार-प्रसारासाठी व्यापक प्रयत्नांची गरज

विश्व आयुर्वेद परिषद महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. विनायक तायडे यांनी आयुर्वेदाच्या प्रचार-प्रसारासाठी देशभर विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले. आयुर्वेदिक उपचार पद्धतीला राष्ट्रीय उपचार पद्धतीचा दर्जा मिळावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

आयुर्वेदाच्या ज्ञानाचा अधिकाधिक प्रसार करण्यासाठी वैद्य, संशोधक, विद्यार्थी आणि विविध संस्थांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन डॉ. तायडे यांनी केले.

विविध पुरस्कारांचे वितरण

कार्यक्रमादरम्यान राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते आयुर्वेद क्षेत्रातील विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. आयुर्वेद जीवन गौरव पुरस्कार डॉ. मधुभाई कोठारी, युवा धन्वंतरी पुरस्कार डॉ. स्वप्नील पदते आणि आयुर्वेद उद्योजक पुरस्कार मूलराज वडोर यांना प्रदान करण्यात आला.

या वैज्ञानिक परिसंवादास आयुर्वेद क्षेत्रातील वैद्य, शिक्षक, संशोधक, विद्यार्थी, आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच उद्योग क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.