मध्य रेल्वेच्या भोंगळ कारभाराचा कळस; तासभर धीमी लोकल गायब, जलद आणि एसी लोकल मात्र सुरूच – खासदार संजय दिना पाटील संतप्त
मुलुंड स्थानकावर तासभर धीमी लोकल न आल्याने प्रवाशांचा संताप; त्याच मार्गावर जलद आणि एसी लोकल धावत राहिल्याने रेल्वेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह. खासदार संजय दिना पाटील यांनी ठाण्याहून विशेष धीम्या लोकल सोडण्याची मागणी केली.
मुंबई ब्यूरो: अनिल सावरे
मुंबई, दि. ५ (प्रतिनिधी) : मध्य रेल्वेच्या ढिसाळ नियोजनाचा आणि विस्कळीत वेळापत्रकाचा फटका सोमवारी पुन्हा एकदा मुंबईकर प्रवाशांना बसला. मुलुंड रेल्वे स्थानकावर दुपारच्या सुमारास तब्बल तासभर एकही धीमी लोकल न आल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. विशेष म्हणजे धीमी लोकलची प्रतीक्षा करत हजारो प्रवासी प्लॅटफॉर्मवर गर्दीत अडकलेले असताना त्याच मार्गावर तीन जलद लोकल आणि एक वातानुकूलित लोकल धावत गेल्याने रेल्वे प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
या गोंधळाचा परिणाम केवळ मुलुंडपुरता मर्यादित राहिला नाही, तर भांडुप स्थानकावरही प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली. वाढत्या गर्दीत एका महाविद्यालयीन तरुणीचा तोल जाऊन ती प्लॅटफॉर्मवर पडल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत मोठी दुर्घटना टळली. मात्र गर्दीच्या अशा परिस्थितीत एखादा प्रवासी रेल्वे रुळावर पडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा संतप्त सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
तांत्रिक कारणाचे कारण देत उद्घोषणा
मुलुंड स्थानकावर सोमवारी दुपारी नेहमीप्रमाणे प्रवाशांची मोठी गर्दी होती. रेल्वे प्रशासनाकडून उद्घोषणांमधून तांत्रिक कारणामुळे धीम्या लोकल १० ते १५ मिनिटे उशिराने धावत असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र प्रत्यक्ष परिस्थिती यापेक्षा गंभीर होती.
दुपारी सव्वा एकच्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर धीमी लोकल आली. मात्र आधीच मोठी गर्दी असल्याने अनेक प्रवाशांना गाडीत चढताही आले नाही. त्यानंतर काही मिनिटांतच त्याच धीम्या मार्गावर जलद लोकल धावली. धीम्या लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी या गाडीचा उपयोग नसल्याने अनेक प्रवाशांनी ती सोडून दिली.
त्यानंतर वातानुकूलित लोकल आणि पुन्हा जलद लोकल धावत गेली. मात्र धीमी लोकलची प्रतीक्षा करणारे हजारो प्रवासी प्लॅटफॉर्मवरच अडकून राहिले. एका मागोमाग जलद आणि वातानुकूलित गाड्या धावत असताना धीमी लोकल मात्र उपलब्ध नसल्याने प्लॅटफॉर्मवरील गर्दी वाढतच गेली.
भांडुपमध्येही गर्दीचा उद्रेक
मुलुंडप्रमाणेच भांडुप रेल्वे स्थानकावरही प्रवाशांची मोठी गर्दी झाली. ऑक्टोबरच्या उकाड्यात घामाने हैराण झालेले प्रवासी लोकलची प्रतीक्षा करत ताटकळत उभे होते. रेल्वेकडून १० ते १५ मिनिटांच्या विलंबाची माहिती दिली जात असली तरी प्रत्यक्षात प्रवाशांना त्यापेक्षा कितीतरी अधिक काळ प्रतीक्षा करावी लागली.
या गर्दीत घाईघाईने लोकल पकडण्याच्या प्रयत्नात एका महाविद्यालयीन तरुणीचा तोल गेला. गाडीत चढल्यानंतर ती जलद लोकल असल्याचे लक्षात आल्यानंतर खाली उतरण्याच्या प्रयत्नात ती प्लॅटफॉर्मवर पडली. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. मात्र रेल्वे प्रशासन एखादी मोठी दुर्घटना घडण्याची वाट पाहत आहे का? असा सवाल आता प्रवाशांकडून केला जात आहे.
दुपारच्या वेळेत विशेष धीम्या लोकलची गरज
दुपारी १२ ते ३ या वेळेत शाळा आणि महाविद्यालये सुटतात. त्याचवेळी दुसऱ्या पाळीत कामावर जाणारे कर्मचारीही मोठ्या संख्येने रेल्वे स्थानकांवर दाखल होतात. त्यामुळे या कालावधीत प्रवाशांची संख्या मोठी असते.
अशा परिस्थितीत नियमित धीम्या लोकलच्या फेऱ्यांमध्ये मोठा खंड पडणे आणि त्याच मार्गावर जलद तसेच वातानुकूलित लोकल धावणे यामुळे प्रवाशांच्या अडचणी अधिक वाढतात. तब्बल तासभराच्या प्रतीक्षेनंतर दुपारी सुमारे २ वाजून १० मिनिटांनी धीमी लोकल प्लॅटफॉर्मवर दाखल झाली. लोकल येताच गर्दीतील प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडत गाडी पकडली.
उद्घोषणा व्यवस्थेतही सुधारणा करण्याची मागणी
लोकल कोणती आहे, ती जलद आहे की धीमी, ती कुठे जाणार आहे, याबाबत रेल्वे स्थानकांवर उद्घोषणा केली जाते. मात्र अनेक वेळा उद्घोषणा स्पष्ट ऐकू येत नसल्याने प्रवाशांचा गोंधळ वाढतो. एकाच वेळी अनेक गाड्यांची ये-जा सुरू असताना योग्य माहिती वेळेत न मिळाल्यामुळे प्रवासी घाईघाईने गाडी पकडण्याचा प्रयत्न करतात. यातून अपघाताचा धोका निर्माण होतो.
त्यामुळे उद्घोषणा व्यवस्था अधिक स्पष्ट आणि प्रभावी करण्याची गरज असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.
खासदार संजय दिना पाटील यांचा संताप
या संपूर्ण प्रकाराबाबत ईशान्य मुंबईचे खासदार आणि केंद्रीय रेल्वेच्या सल्लागार समितीचे सदस्य संजय दिना पाटील यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
दुपारी १२ ते ३ या वेळेत शाळा-महाविद्यालये सुटतात तसेच दुसऱ्या पाळीत कामावर जाणारे कर्मचारी मोठ्या संख्येने रेल्वे स्थानकांवर येतात. त्यामुळे या वेळेतील वाढती गर्दी लक्षात घेऊन ठाण्याहून विशेष धीम्या लोकल सोडण्यात याव्यात, अशी मागणी खासदार संजय दिना पाटील यांनी केली आहे.
विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयातून घरी जाताना गर्दी आणि अनिश्चित प्रवासाचा सामना करावा लागू नये, यासाठी रेल्वे प्रशासनाने विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. विद्यार्थ्यांची आणि सर्वसामान्य प्रवाशांची सुरक्षितता ही रेल्वे प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
वेळापत्रक तातडीने सुधारण्याची मागणी
मध्य रेल्वेने लोकल गाड्यांचे वेळापत्रक तातडीने सुधारावे, दुपारच्या वेळेतील प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन लोकल फेऱ्यांचे योग्य नियोजन करावे आणि धीम्या लोकलची उपलब्धता वाढवावी, अशी मागणी खासदार पाटील यांनी केली आहे.
केवळ तांत्रिक कारण सांगून विलंबाचे स्पष्टीकरण देण्याऐवजी प्रवाशांना वेळेत, सुरक्षित आणि नियोजनबद्ध प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मध्य रेल्वेने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, वारंवार होणारा लोकलचा विलंब, चुकीचे वेळापत्रक आणि वाढती गर्दी यामुळे मुंबईकर प्रवाशांमध्ये नाराजी वाढत असून, भविष्यात अशा प्रकारची परिस्थिती टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने तातडीने योग्य नियोजन करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.