मोक्का प्रकरणातील फरार आरोपी तीन वर्षांनंतर जेरबंद; गुन्हे शाखेची तांत्रिक तपासातून मोठी कारवाई
मुंबईतील चुनाभट्टी पोलीस ठाण्यातील मोक्का प्रकरणातील तीन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे नवी मुंबईतील खारघर परिसरातून अटक केली. आरोपीविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
मुंबई ब्यूरो | अनिल सावरे
मुंबई, दि. 28 : मुंबईतील चुनाभट्टी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंध अधिनियम (मोक्का) प्रकरणातील तब्बल तीन वर्षांपासून फरार असलेल्या मुख्य आरोपीला मुंबई गुन्हे शाखेने अटक करण्यात यश मिळवले आहे. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा क्रमांक ४५४/२०२३ मध्ये मोक्का कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी सुमित रवितेज सावंत (वय ३२, रा. चुनाभट्टी, मुंबई) हा गुन्हा दाखल झाल्यापासून अटकेपासून बचाव करण्यासाठी सिंधुदुर्ग, गोवा, चेन्नई, राजस्थान आणि दिल्ली अशा विविध ठिकाणी आपली ओळख लपवत फिरत होता.
या फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी मुंबई गुन्हे शाखा, कक्ष-६ सातत्याने समांतर तपास करत होती. आरोपी प्रत्येकवेळी आपले वास्तव्य बदलत असल्याने त्याचा माग काढणे पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरत होते.
दरम्यान, तांत्रिक विश्लेषण आणि मानवी गुप्त माहितीच्या आधारे आरोपी नवी मुंबईतील खारघर परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून गीतांजली ज्वेलर्सजवळील सेक्टर १९, खारघर येथून आरोपीला ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपीची ओळख सुमित रवितेज सावंत (वय ३२), व्यवसाय – खासगी नोकरी, रा. चुनाभट्टी, मुंबई अशी असून, त्याला पुढील कायदेशीर कारवाईसाठी चुनाभट्टी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सहआयुक्त (गुन्हे) अनिल कुंभारे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उपायुक्त (प्रकटीकरण-१) नवनाथ ढवळे आणि सहायक पोलीस आयुक्त धर्मपाल बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या मोहिमेत गुन्हे शाखा कक्ष-६चे प्रभारी पोलीस निरीक्षक भरत घोणे, पोलीस निरीक्षक सुशांत सावंत, सहायक पोलीस निरीक्षक नवनाथ काळे, श्रीकांत काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली चौधरी, पोलीस उपनिरीक्षक शरद नागेकर, पोलीस उपनिरीक्षक संदीप रहाणे, पोलीस उपनिरीक्षक कल्पना माशेरे, पोलीस उपनिरीक्षक सुहास देसाई तसेच इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
तीन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आल्याने संघटित गुन्हेगारीविरोधातील कारवाईत मुंबई गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले असून, या प्रकरणाचा पुढील तपास चुनाभट्टी पोलीस करीत आहेत.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0