नाशिक जिल्हा वरिष्ठ गट ॲथलेटिक्स स्पर्धा १४ व १५ मे रोजी; जिल्हा संघ निवडीची संधी
नाशिक जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनतर्फे १४ आणि १५ मे २०२६ रोजी वरिष्ठ गटाच्या मैदानी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. पंचवटी येथील विभागीय क्रीडा संकुलात होणाऱ्या या स्पर्धेतून उत्कृष्ट खेळाडूंची जिल्हा संघासाठी निवड केली जाणार आहे.
नाशिक, दि. ९ मे : नाशिक जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या वतीने १४ आणि १५ मे २०२६ रोजी नाशिक जिल्ह्यातील खेळाडूंसाठी वरिष्ठ गटाच्या मैदानी (ॲथलेटिक्स) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा पंचवटी येथील विभागीय क्रीडा संकुल येथील सिंथेटिक ट्रॅकवर होणार असून दोन्ही दिवस सकाळी ७ ते दुपारी १२ वाजेपर्यंत सामने रंगणार आहेत.
विविध स्पर्धांचा समावेश
या स्पर्धेमध्ये १०० मीटरपासून ते १० हजार मीटर धावणे, रिले रेस यांसारख्या धावण्याच्या विविध प्रकारांचा समावेश आहे. तसेच लांब उडी, उंच उडी, तिहेरी उडी, बांबू उडी, गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक आणि हातोडाफेक यांसारख्या मैदानी प्रकारांचाही समावेश करण्यात आला आहे.
याशिवाय ट्रायथलॉन आणि डिकेथलॉन या स्पर्धांचाही समावेश असणार आहे.
उत्कृष्ट खेळाडूंना राज्य स्पर्धेची संधी
या स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे खेळाडूंची नाशिक जिल्हा संघासाठी निवड करण्यात येणार आहे. निवड झालेल्या खेळाडूंना महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स स्पर्धेत नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. राज्यस्तरीय स्पर्धेतून पुढे राष्ट्रीय स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड केली जाणार आहे.
सहभागासाठी आवाहन
स्पर्धेत नाशिक जिल्ह्यात वास्तव्यास असलेले, शिक्षण घेणारे किंवा कार्यरत असलेले खेळाडू सहभागी होऊ शकतात. वरिष्ठ गटाची स्पर्धा असल्यामुळे १६ वर्षांखालील खेळाडूंना सहभाग घेता येणार नाही.
एका खेळाडूला दोन वैयक्तिक प्रकार आणि एका रिले स्पर्धेत सहभाग घेता येणार आहे. इच्छुक खेळाडूंनी १३ मेपूर्वी ऑनलाईन प्रवेश निश्चित करावेत, असे आवाहन असोसिएशनचे अध्यक्ष हेमंत पांडे आणि सचिव सुनील तावरगिरी यांनी केले आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0