गावठी पिस्तुलाचा धाक दाखवून लुटमार करणाऱ्या टोळक्याला नाशिक पोलिसांची अटक; अहिल्यानगरमध्ये सिनेस्टाईल पाठलाग

नाशिक शहरात गावठी पिस्तुलाचा धाक दाखवून लुटमार व गुंडगिरी करणाऱ्या टोळक्याला नाशिकच्या गुंडाविरोधी पथकाने अहिल्यानगर जिल्ह्यात सिनेस्टाईल पाठलाग करून अटक केली. आरोपींकडून गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि स्कोडा कार असा ११ लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Aug 5, 2026 - 16:30
 0  11
गावठी पिस्तुलाचा धाक दाखवून लुटमार करणाऱ्या टोळक्याला नाशिक पोलिसांची अटक; अहिल्यानगरमध्ये सिनेस्टाईल पाठलाग
नाशिक पोलीस, गुंडाविरोधी पथक, गावठी पिस्तूल, लुटमार, नाशिक रोड, उपनगर पोलीस ठाणे,

नाशिक ब्युरो : नाशिक शहर आणि परिसरात गावठी पिस्तुलाचा धाक दाखवून लुटमार, दहशत आणि गुंडगिरी करणाऱ्या कुख्यात टोळक्याला नाशिक पोलिसांच्या गुंडाविरोधी पथकाने अहिल्यानगर जिल्ह्यात सिनेस्टाईल पाठलाग करून अटक केली. या कारवाईत आरोपींकडून गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि स्कोडा कार असा एकूण ११ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेले आरोपी नाशिक रोड परिसरातील कुख्यात गुन्हेगार असून, त्यांच्याविरुद्ध यापूर्वी विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. नाशिक शहरात अल्पावधीतच लुटमार आणि दहशतीच्या घटना घडवून फरार झालेल्या या टोळक्याचा शोध घेण्यासाठी नाशिक पोलिसांनी विशेष मोहीम राबविली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ जुलै रोजी नाशिक रोड रेल्वे स्थानक परिसरात टोळक्यातील भूषण उर्फ स्वप्निल गोसावी आणि त्याच्या साथीदाराने एका व्यक्तीच्या पोटाला गावठी पिस्तूल लावून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर संबंधित व्यक्तीच्या खिशातील १७ हजार रुपये बळजबरीने काढून घेतल्याचा आरोप आहे.

या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जाधव मळा, नाशिक रोड परिसरात मध्यरात्री सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास या टोळक्याने पुन्हा दहशत माजविल्याचा प्रकार घडला. आरोपी तीन ते चार साथीदारांसह स्कोडा कारमधून घटनास्थळी आले. त्यांनी एका व्यक्तीला शिवीगाळ केली तसेच हवेत गोळीबार केल्याचा आरोप आहे.

या वेळी आरोपींनी परिसरात उभ्या असलेल्या मर्सिडीज कारची काच आणि हेडलाईट दगडाने फोडून वाहनाचे नुकसान केले. तसेच कारच्या मालकाला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचेही पोलिसांनी सांगितले.

या सलग घटनांची नाशिक पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी गुंडाविरोधी पथकांसह तीन स्वतंत्र पोलीस पथके तयार करण्यात आली. तांत्रिक माहिती, गुप्त बातमीदार आणि स्थानिक स्तरावरील माहितीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू करण्यात आला.

तपासादरम्यान हे टोळके छत्रपती संभाजीनगर, मालेगाव तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस पथकांनी आरोपींचा माग काढत अहिल्यानगर जिल्ह्यात शोधमोहीम तीव्र केली.

दरम्यान, आरोपींचे टोळके अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात भंडारदरा धरण परिसरातील राजूर गावाजवळ असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने संबंधित परिसरात धाड टाकली.

पोलिसांची चाहूल लागताच आरोपी स्कोडा कारमधून कोल्हार-राहुरीच्या दिशेने पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. यानंतर पोलिसांनी आरोपींच्या वाहनाचा थरारक आणि सिनेस्टाईल पाठलाग केला. काही अंतरापर्यंत पाठलाग केल्यानंतर पोलिसांनी टोळक्यातील आरोपींना ताब्यात घेण्यात यश मिळविले.

या कारवाईदरम्यान आरोपींकडून सुमारे एक लाख रुपये किमतीचे गावठी पिस्तूल, सुमारे दहा लाख रुपये किमतीची स्कोडा कार तसेच चार हजार रुपये किमतीची जिवंत काडतुसे असा एकूण ११ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. या टोळक्याविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांचा तपास सुरू असून, त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

नाशिक शहरात पिस्तुलाचा धाक दाखवून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या या टोळक्याला अटक करण्यात नाशिकच्या गुंडाविरोधी पथकाला यश आले असून, या कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारीवर आळा बसण्यास मदत होणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.