नाशिकमध्ये आद्य शंकराचार्य जन्मोत्सव भक्तीभावात साजरा; श्री शृंगेरी मठात दिवसभर धार्मिक कार्यक्रम
शंकराचार्य जन्मोत्सव, नाशिक बातमी, शृंगेरी मठ, पंचवटी, काळाराम मंदिर, धार्मिक कार्यक्रम, अभिषेक पूजा, महाराष्ट्र न्यूज
नाशिक ब्यूरो – पंचवटी परिसरातील श्रीक्षेत्र काळाराम मंदिराजवळ असलेल्या श्री शृंगेरी शंकराचार्य मठात आद्य जगद्गुरु शंकराचार्य यांचा जन्मोत्सव मोठ्या भक्तीभावात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. दिवसभर विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी विविध धार्मिक विधींनी कार्यक्रमाची सुरुवात झाली. शंकराचार्यांच्या मूर्तीची विधिवत पूजा, अभिषेक, लघुरुद्र पूजा, पंचामृत पूजा तसेच रुद्रपठण आदी कार्यक्रम पार पडले. वेदमूर्ती रवींद्र पैठणे गुरुजी, शांताराम भानोसे, दिनेश गायधनी यांच्यासह इतर पुरोहितांनी धार्मिक विधी पार पाडले. तसेच महर्षी गौतम गोदावरी वेद विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांनी मंत्रपठण करून वातावरण भक्तिमय केले.
या प्रसंगी मठाचे अधिकारी रामगोपाल अय्यर आणि शेखर अय्यर यांच्या हस्ते विश्वकल्याण आणि शांततेसाठी संकल्प करण्यात आला. नाशिक येथील मठात समाधीस्थ असलेल्या दोन शंकराचार्यांच्या पादुकांचे पूजनही करण्यात आले. महाआरतीनंतर सकाळचे सत्र संपन्न झाले.
या कार्यक्रमाला धर्मपंडित वेदमूर्ती आचार्य, भाजपाचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते लक्ष्मण सावजी, ज्येष्ठ वैद्यकीय व्यावसायिक डॉ. संदीप मंडले यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. तसेच मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून दर्शन घेतले.
नाशिक येथील श्री शृंगेरी शंकराचार्य मठाला साडेतीनशे वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. आद्य शंकराचार्यांनी भारताच्या चार दिशांना स्थापन केलेल्या मठ परंपरेचा हा भाग असून, या मठाची स्थापना सन १७४० मध्ये पहिल्या बाजीराव पेशव्यांच्या काळात करण्यात आली होती. या मठात २८ वे शंकराचार्य अभिनव सच्चिदानंद भारती आणि २९ वे नरसिंह भारती यांनी वास्तव्य केले असून त्यांच्या महासमाधीही येथेच आहेत.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0