नेहरू विज्ञान केंद्र ते नेहरू तारांगण उड्डाणपूल प्रकल्पाला वेग; ३१ जानेवारी २०२७ पर्यंत काम पूर्ण करण्याचे निर्देश
वरळीतील नेहरू विज्ञान केंद्र ते नेहरू तारांगण उड्डाणपूल व सब वे प्रकल्पाची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी पाहणी केली. ३१ जानेवारी २०२७ पर्यंत काम पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.
प्रतिनिधी : नरेश शिंदे
मुंबई, दि. १ ऑक्टोबर : वरळी येथील नेहरू विज्ञान केंद्र ते नेहरू तारांगण दरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे सुरू असलेल्या उड्डाणपूल व सब वे प्रकल्पाचे काम ३१ जानेवारी २०२७ पर्यंत पूर्ण करा, असे स्पष्ट निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर यांनी दिले.
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी ३० सप्टेंबर २०२६ रोजी प्रत्यक्ष प्रकल्पस्थळी भेट देऊन कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रकल्पातील विविध कामांची सद्यस्थिती, प्रगती आणि पुढील कार्यवाहीचा आढावा घेतला. उर्वरित कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी कामाचा वेग वाढविण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकारी व अभियंत्यांना दिल्या.
पायलिंग, पाइल कॅप आणि पिअरचे काम प्रगतिपथावर
नेहरू विज्ञान केंद्राच्या बाजूला १२०० मिलीमीटर व्यासाच्या मुख्य पाइलचे काम १०० टक्के पूर्ण झाले आहे. एकूण १८ पैकी १७ पाइल कॅप, १८ पैकी १७ पिअर आणि १८ पैकी १७ पिअर कॅपचे काम पूर्ण झाले आहे.
जिजामाता नगरच्या बाजूला १२०० मिलीमीटर व्यासाच्या मुख्य पायलिंगचे काम पूर्ण झाले आहे. या बाजूला एकूण १७ पैकी १७ पाइल कॅप, १७ पैकी १७ पिअर आणि १७ पैकी १७ पिअर कॅपचे काम पूर्ण झाले आहे.
पोर्टल बीम आणि गर्डर निर्मितीला वेग
पोर्टल बीम व गर्डर निर्मितीचे काम प्रकल्पस्थळी तसेच निर्मिती केंद्रात सुरू आहे. एकूण १४ पैकी १४ पोर्टल बीमचे काम पूर्ण झाले असून, १८ गर्डर स्पॅनपैकी १७ गर्डर स्पॅनचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित एका गर्डर स्पॅनचे काम प्रगतिपथावर आहे.
पोर्टल बीम आणि गर्डर स्पॅन उभारणीचे कामही वेगाने सुरू आहे. एकूण १४ पैकी १३ पोर्टल बीमची उभारणी पूर्ण झाली आहे. तसेच १८ पैकी ९ गर्डर स्पॅनची उभारणी पूर्ण झाली आहे.
डेक स्लॅब काँक्रिटीकरणाचे काम सुरू
डेक स्लॅब काँक्रिटीकरणाचे काम एकूण १८ स्पॅनपैकी ७ स्पॅनमध्ये पूर्ण झाले आहे. आणखी २ स्पॅनचे काँक्रिटीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. प्रकल्पातील विविध कामे एकाचवेळी वेगाने पूर्ण करण्यावर महापालिकेचा भर आहे.
प्रवासाचा वेळ सुमारे १५ मिनिटांनी कमी होण्याची अपेक्षा
प्रस्तावित नेहरू विज्ञान केंद्र उड्डाणपुलामुळे नागरिकांच्या प्रवासाच्या वेळेत बचत होण्याची अपेक्षा आहे. सध्या या मार्गाने जाणाऱ्या वाहनचालकांना वरळी नाका (आचार्य अत्रे चौक) येथून वळसा घालून जावे लागते.
उड्डाणपूल पूर्ण झाल्यानंतर प्रवासाचा वेळ सुमारे १५ मिनिटांनी कमी होण्याची अपेक्षा आहे. या पुलामुळे ई. मोझेस मार्गावरून थेट अॅनी बेझंट मार्ग तसेच धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज किनारी मार्गाकडे (Coastal Road) जाण्यासाठी अधिक सोपा आणि जवळचा मार्ग उपलब्ध होणार आहे.
लोअर परळ, महालक्ष्मी आणि करी रोडच्या दिशेने येणाऱ्या वाहनांनाही या पुलाचा थेट वापर करता येणार आहे. त्यामुळे वरळी नाका परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. प्रवासाचे अंतर आणि वाहतूक कोंडी कमी झाल्यामुळे वाहनचालकांच्या इंधनाचीही बचत होण्याची अपेक्षा आहे.
मनुष्यबळ आणि यंत्रसामग्रीचे योग्य नियोजन करण्याचे निर्देश
प्रकल्पातील उर्वरित कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, यंत्रसामग्री आणि संसाधनांचे योग्य नियोजन करण्याचे निर्देश श्री. अभिजीत बांगर यांनी दिले. तसेच कामकाजाचा वेग वाढवून विविध विभागांमध्ये आवश्यक समन्वय साधत प्रकल्प पुढे नेण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
वाहतूक व्यवस्थापनाच्या दृष्टीने वाहतूक पोलिसांसोबत समन्वय साधून वाहतूक आराखडा तयार करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी प्रमुख अभियंता (पूल) श्री. राजेश मुळे यांच्यासह संबंधित अधिकारी आणि अभियंते उपस्थित होते.