सफाई मित्र सुरक्षा शिबिरात ३,५०० हून अधिक सफाई सेवकांची आरोग्य तपासणी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे ‘स्वच्छता ही सेवा २०२६’ अभियानांतर्गत आयोजित सफाई मित्र सुरक्षा शिबिरांमध्ये ३,५०० हून अधिक सफाई सेवकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.

सफाई मित्र सुरक्षा शिबिरात ३,५०० हून अधिक सफाई सेवकांची आरोग्य तपासणी
पिंपरी चिंचवड महानगरपालिका, सफाई मित्र सुरक्षा शिबिर, सफाई सेवक आरोग्य तपासणी, स्वच्छता ही सेवा २०२६,

प्रतिनिधी: रोहन सोनाळे 

पिंपरी, दि. ३० सप्टेंबर २०२६ (प्रतिनिधी) : शहराच्या स्वच्छतेची धुरा सांभाळणाऱ्या सफाई सेवकांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेला प्राधान्य देत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने ‘स्वच्छता ही सेवा २०२६’ अभियानांतर्गत ‘सफाई मित्र सुरक्षा शिबिरां’चे आयोजन करण्यात आले. या शिबिरांना सफाई सेवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, आतापर्यंत ३,५०० हून अधिक सफाई सेवकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

महापालिकेच्या अ, ब, क, ड, इ, फ, ग, ह, ज आणि ल या दहाही क्षेत्रीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात २८ आणि ३० सप्टेंबर रोजी या शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच थेरगाव येथील स्व. कै. शंकरराव गावडे कामगार भवन येथेही विशेष आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.

या शिबिरांमध्ये सफाई सेवकांची हिमोग्लोबिन, रक्तदाब आणि मधुमेहाची मोफत तपासणी करण्यात आली. कामाच्या स्वरूपामुळे सफाई सेवकांना विविध आरोग्यविषयक आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची नियमित तपासणी आणि आजारांचे प्राथमिक टप्प्यात निदान होणे महत्त्वाचे असल्याने या शिबिरांचे आयोजन करण्यात आले.

आरोग्य तपासणीसोबतच सफाई सेवकांना संतुलित आहार, नियमित व्यायाम, योगासने, प्राणायाम आणि ताणतणावाचे व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्वही त्यांना समजावून सांगण्यात आले.

कामाच्या स्वरूपानुसार आवश्यक असलेल्या सुरक्षा साधनांचा योग्य वापर करणे, आरोग्यविषयक चांगल्या सवयी अंगीकारणे तसेच आजाराची प्राथमिक लक्षणे जाणवल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता वेळेत वैद्यकीय सल्ला घेणे याबाबतही सफाई सेवकांमध्ये जनजागृती करण्यात आली.

शहर स्वच्छ ठेवण्यासाठी दररोज प्रत्यक्ष काम करणाऱ्या सफाई सेवकांच्या आरोग्याची काळजी घेणे ही महापालिकेची महत्त्वाची जबाबदारी आहे. त्याच उद्देशाने ‘स्वच्छता ही सेवा २०२६’ अभियानांतर्गत आरोग्य तपासणी, सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन आणि आरोग्यविषयक जनजागृतीवर भर देण्यात आला आहे.

या उपक्रमामुळे सफाई सेवकांना त्यांच्या आरोग्याबाबत जागरूक होण्यासोबतच आवश्यक ती वैद्यकीय तपासणी करून घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे.