पीसीयूतील उच्च तंत्रज्ञान सुविधांचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी कौशल्य सिद्ध करावे : हर्षवर्धन पाटील
पिंपरी चिंचवड विद्यापीठात इंडस्ट्री ५.० आणि फ्युचर टेक्नॉलॉजीज सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन करण्यात आले. एआय, रोबोटिक्स, ऑटोमेशन, सेमीकंडक्टर, ईव्ही आणि डिजिटल ट्विनसह १६ अत्याधुनिक प्रयोगशाळा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
प्रतिनिधी : रोहन सोनाळे
पिंपरी, पुणे, दि. १ ऑक्टोबर २०२६ : भविष्यातील तंत्रज्ञानाशी समन्वय साधणाऱ्या ‘इंडस्ट्री ५.० आणि फ्युचर टेक्नॉलॉजीज सेंटर ऑफ एक्सलन्स’ या अत्याधुनिक सुविधेचे पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या (PCU) साते, वडगाव मावळ येथील कॅम्पसमध्ये उद्घाटन करण्यात आले. या सुविधांचा विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे उपयोग करून नवोन्मेष, संशोधन आणि कौशल्य विकासाला चालना द्यावी, असे आवाहन पीसीयूचे कुलपती व पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे विश्वस्त हर्षवर्धन पाटील यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या कॅम्पसमध्ये आयोजित कार्यक्रमात पीसीयूचे कुलपती व पीसीईटीचे विश्वस्त हर्षवर्धन पाटील आणि ज्येष्ठ उद्योजक पद्मश्री प्रतापराव पवार यांच्या हस्ते या सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन झाले.
यावेळी पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, पीसीयू व्यवस्थापन समितीचे सदस्य अजिंक्य काळभोर व नरेंद्र लांडगे, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीयूचे कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे, आयटी व आयटीईएस प्रमुख डॉ. रामकृष्ण वडाली, पीसीयू फोर्ब्स मार्शल प्रमुख राजेश पाटील, डिजिटेक रोबोटिक इंडियाचे सीईओ व संस्थापक अजित गटे, ली आम, गजानन पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले की, भविष्यातील तंत्रज्ञानाशी समन्वय साधणाऱ्या या अत्याधुनिक सुविधा विद्यापीठ परिसरात उपलब्ध करून देणे हा आनंदाचा क्षण आहे. या केंद्रामुळे विद्यार्थ्यांना नवोन्मेषाचे प्रत्यक्ष प्रयोग करण्याची आणि तंत्रज्ञानाचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. विद्यार्थ्यांनी या उच्च तंत्रज्ञान सुविधांचा उपयोग करून आपले कौशल्य सिद्ध करावे. हा प्रकल्प विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्ती आणि उद्योजकीय गुणांना चालना देणारे महत्त्वाचे व्यासपीठ ठरेल.
एआय, रोबोटिक्स आणि ईव्ही क्षेत्रांना महत्त्व
पद्मश्री उद्योजक प्रतापराव पवार यांनी सांगितले की, एआय, रोबोटिक्स, ऑटोमेशन, सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रिक व्हेईकल यांसारखी क्षेत्रे भविष्यातील उद्योगविश्वात महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ संस्था आणि विद्यापीठ यांच्यातील सहकार्यामुळे शिक्षण अधिक परिणामकारक होण्यासोबतच रोजगाराच्या संधी वाढण्यासही चालना मिळेल.
पीसीयूने भविष्यातील गरजा ओळखून सुरू केलेले ‘इंडस्ट्री ५.० आणि फ्युचर टेक्नॉलॉजीज सेंटर ऑफ एक्सलन्स’ विद्यार्थ्यांसह उद्योग क्षेत्राच्या भविष्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.
कौशल्य विकासासाठी उपयुक्त ठरणार
पीसीयू व टाटा मोटर्स डिप्लोमा प्रमुख डॉ. उमेश पोतदार यांनी सांगितले की, हा प्रकल्प पीसीयू-टाटा मोटर्सच्या मेकॅट्रॉनिक्स अभियांत्रिकीमधील डिप्लोमा कार्यक्रमासाठी उपयुक्त ठरणार आहे. तसेच केनिया आणि झांझिबार येथील विद्यार्थ्यांसाठी प्रस्तावित कौशल्य विकास कार्यक्रमांमध्येही या केंद्राचा उपयोग होणार आहे.
१६ अत्याधुनिक प्रयोगशाळांची उभारणी
आयटी आणि आयटीईएस प्रमुख प्रा. रामकृष्ण वडाली यांनी सांगितले की, सी-डॅक पुणे, डिजिटेक रोबोटिक इंडिया प्रा. लि. आणि एएमडी यांच्या सहकार्याने या केंद्रामध्ये उच्च क्षमता असलेल्या १६ प्रयोगशाळा उभारण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांसोबतच संशोधक आणि उद्योग क्षेत्रातील व्यावसायिकांसाठीही या सुविधांचा उपयोग करता येणार आहे.
या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये इंडस्ट्रियल ऑटोमेशन, इंडस्ट्रियल मेकॅट्रॉनिक्स, इंडस्ट्रियल रोबोटिक्स, स्मार्ट फॅक्टरी ऑटोमेशन विथ IIoT, इंडस्ट्रियल व्हर्च्युअल फॅक्टरी ऑटोमेशन अँड डिजिटल ट्विन, एआय रोबोटिक्स अँड मशीन लर्निंग, इलेक्ट्रिक व्हेईकल टेक्नॉलॉजी, ड्रोन टेक्नॉलॉजी, ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, सेमीकंडक्टर टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिकल डिझाइन, ॲडव्हान्स्ड एम्बेडेड IoT अँड AIoT, इंडस्ट्रियल कॉम्प्युटर इंटिग्रेटेड मॅन्युफॅक्चरिंग, हाय परफॉर्मन्स कॉम्प्युटिंग, एआय अँड ॲडॅप्टिव्ह कॉम्प्युटिंग तसेच रिसर्च अँड डेव्हलपमेंट लॅब अशा विविध अत्याधुनिक प्रयोगशाळांचा समावेश आहे.
या सुविधांमुळे विद्यार्थ्यांना आधुनिक उद्योगांच्या गरजांनुसार प्रत्यक्ष प्रशिक्षण, प्रयोग, संशोधन आणि प्रकल्पाधारित शिक्षणाची संधी उपलब्ध होणार असून, भविष्यातील तंत्रज्ञान क्षेत्रासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्यास मदत होणार आहे.