वाहन चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक; पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून ५ वाहने जप्त
चिखली पोलिसांनी वाहन चोरीच्या गुन्ह्यात सराईत आरोपीला अटक करून त्याच्याकडून चोरीच्या ५ दुचाकी जप्त केल्या. या कारवाईमुळे चिखली पोलीस ठाण्यातील पाच वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून, सुमारे १ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे
पिंपरी-चिंचवड, दि. ३० : चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सातत्याने घडणाऱ्या वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करताना चिखली पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. आरोपीकडून चोरीच्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या असून, या कारवाईमुळे चिखली पोलीस ठाण्यात दाखल असलेले पाच वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. जप्त करण्यात आलेल्या वाहनांची एकूण किंमत सुमारे १ लाख २५ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार घडणाऱ्या वाहन चोरीच्या घटनांचा तपास करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी विशेष सूचना दिल्या होत्या. त्यानुसार चिखली पोलीस ठाण्यातील तपास पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी सुमारे १५० पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली.
तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांना वाहन चोरी करणारा गुन्हेगार राज संतोष वायसकर याच्याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. आरोपी हा रा. शिवशांती हौसिंग सोसायटी, तळगाववस्ती, चिखली, पुणे येथील रहिवासी असून त्याचे वय २३ वर्षे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी आरोपीकडे वाहन चोरीबाबत चौकशी केली असता त्याने पाच वाहने चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीकडून चोरीच्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या असून, त्यामध्ये बुलेट, स्प्लेंडर, होंडा शाईन, हिरो पॅशन आणि सुझुकी ॲक्सेस या वाहनांचा समावेश आहे.
या कारवाईमुळे चिखली पोलीस ठाण्यात दाखल असलेले वाहन चोरीचे पाच गुन्हे उघडकीस आले आहेत. अटक आरोपी राज संतोष वायसकर हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध यापूर्वी विविध पोलीस ठाण्यांमध्ये वाहन चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
तसेच आरोपीविरुद्ध शंकरिंग समदरींग टाक या सराईत गुन्हेगारासह दाखल असलेल्या एका गुन्ह्यात तो पाहिजे आरोपी असल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.
ही कारवाई पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी आणि इतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजित जाधव यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली.
या कारवाईत पोलीस अधिकारी व अंमलदारांनी परिश्रम घेतले असून, वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी चिखली पोलीस ठाण्याकडून पुढील तपास सुरू आहे.