दिवाळीनिमित्त ₹८,००० रोख अनुदानाचा मेसेज आलाय? सावधान! पिंपरी चिंचवड पोलिसांचा नागरिकांना महत्त्वाचा इशारा
दिवाळी सणानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे ₹८,००० चे रोख अनुदान देण्याच्या नावाखाली सोशल मीडियावर फसव्या लिंक्स व्हायरल होत आहेत. या सायबर फ्रॉडपासून सावध राहण्याचे आवाहन पिंपरी चिंचवड पोलिसांनी केले आहे.
प्रतिनिधी: रोहन सोनाळे
दिवाळी सणाच्या नावाखाली ₹८,००० रोख अनुदानाचे आमिष; सायबर भामट्यांच्या फसव्या मेसेजपासून सावध राहण्याचे पिंपरी चिंचवड पोलिसांचे आवाहन
पिंपरी चिंचवड:
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सध्या व्हॉट्सॲप (WhatsApp) आणि विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने एक बनावट संदेश मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. यामध्ये "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व भारतीय नागरिकांसाठी दिवाळी सणानिमित्त ₹८,००० चे रोख अनुदान मंजूर केले आहे," असा खोटा दावा केला जात असून सोबत एक संशयास्पद लिंक पाठवली जात आहे. अशा कोणत्याही फसव्या लिंकवर नागरिकांनी क्लिक करू नये, असे स्पष्ट आवाहन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या सायबर सेलतर्फे करण्यात आले आहे.
या संदर्भात पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) रोहिदास पवार यांनी प्रसिद्धीपत्रक जारी करत नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. सायबर गुन्हेगार अशा लिंक्सच्या माध्यमातून सामान्य नागरिकांची वैयक्तिक आणि बँक खात्याची गोपनीय माहिती चोरून त्यांची आर्थिक फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे. नागरिकांनी कोणती खबरदारी घ्यावी?
सायबर पोलिसांनी नागरिकांना खालील नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत:
१. ₹८,००० अनुदान मिळण्याबाबत आलेल्या कोणत्याही अनोळखी संदेशांवर विश्वास ठेवू नका.
२. व्हॉट्सॲप किंवा सोशल मीडियावर आलेल्या अशा संशयास्पद लिंक्सवर चुकूनही क्लिक करू नका.
३. अनुदान मिळवण्यासाठी कोणतेही शुल्क अथवा आगाऊ पैसे भरू नका.
४. गुगल, सोशल मीडिया अथवा सर्च इंजिनवर दिसणाऱ्या अनोळखी वेबसाईट किंवा लिंक्सवर तातडीने विश्वास ठेवू नये.
५. कोणत्याही वेबसाईटवर ऑनलाईन पेमेंट करण्यापूर्वी त्या वेबसाईटचा पत्ता (URL), सत्यता व संबंधित सेवा प्रदात्याची अधिकृतता पडताळून पाहावी.
६. अनोळखी लिंकवर आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा बँक खात्याची कोणतीही माहिती भरू नये.
७. स्वतःचा बँक OTP, ATM PIN, CVV किंवा UPI PIN कधीही कोणालाही सांगू नका.
८. असे बनावट व दिशाभूल करणारे मेसेज इतर ग्रुपमध्ये अथवा नातेवाईकांना फॉरवर्ड करू नका.
९. शासकीय योजनांची कोणतीही माहिती केवळ अधिकृत सरकारी संकेतस्थळांवरूनच तपासावी.
फसवणूक झाल्यास त्वरित संपर्क साधा:
नागरिकांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाल्यास त्यांनी वेळ न दवडता तात्काळ १९३० या राष्ट्रीय सायबर क्राईम हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा किंवा www.cybercrime.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन पिंपरी चिंचवड सायबर पोलीस ठाण्यामार्फत करण्यात आले आहे.