पुणे ग्रोथ हबचा विकास आराखडा; कृषी, उद्योग, पाणीपुरवठा आणि रोजगाराला चालना देण्याचे नियोजन
पुणे क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रोथ हब आराखड्यात कृषी-अन्नप्रक्रिया, जैवइंधन, पाणीपुरवठा, कौशल्य विकास, उद्योग आणि पायाभूत सुविधांसाठी विविध उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.
प्रतिनिधी: नरेश शिंदे
पुणे : पुणे क्षेत्राच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्यात कृषी व अन्नप्रक्रिया उद्योग, जैवइंधन प्रकल्प, पाणीपुरवठा, कौशल्य विकास, महिला व युवक रोजगार, उद्योजकता आणि आधुनिक औद्योगिक पायाभूत सुविधांवर विशेष भर देण्यात आला आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी प्रक्रिया उद्योग, शीतसाखळी आणि पूरक सुविधांचे क्षेत्रनिहाय नियोजन करण्याचा प्रस्ताव आराखड्यात करण्यात आला आहे.
कृषी व अन्नप्रक्रिया क्षेत्राचे स्थूल मूल्यवर्धन पाच अब्ज डॉलरवरून १० ते १२ अब्ज डॉलरपर्यंत वाढविण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. जैवइंधन प्रकल्पांनाही ग्रामीण अर्थव्यवस्थेचे प्रमुख चालक म्हणून विकसित करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे कृषी उत्पादनाला प्रक्रिया उद्योगांची जोड देऊन ग्रामीण भागात रोजगार आणि आर्थिक संधी निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे.
पुणे क्षेत्रातील पाणीपुरवठ्यासाठी विविध उपाय
पुणे क्षेत्राला भविष्यात सुमारे २०० दशलक्ष लिटर प्रतिदिन अतिरिक्त पाण्याची आवश्यकता भासणार असल्याने त्यासाठी विविध पर्याय आराखड्यात सुचविण्यात आले आहेत.
यामध्ये मुळशीमधून सात टीएमसी पाणी, भामा खोऱ्यातून मोठ्या प्रमाणावर पाणीपुरवठा, उपलब्ध पाण्याचा पुनर्वापर, कार्यक्षम पाणी वितरण व्यवस्था आणि जलसाठ्यांमधील गाळ काढण्यासारख्या उपाययोजनांचा समावेश आहे. वाढती लोकसंख्या, औद्योगिक विस्तार आणि शहरीकरण लक्षात घेऊन भविष्यातील पाण्याची गरज भागविण्यासाठी नियोजन करण्यावर भर देण्यात आला आहे.
महिला आणि तरुणांसाठी कौशल्य विकासाला प्राधान्य
पुणे क्षेत्रातील महिला आणि तरुणांना रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रमांचा विस्तार करण्याचे नियोजन आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसेच विद्यापीठांमधील अभ्यासक्रमांमध्ये आवश्यक बदल आणि वाढ करण्याचा प्रस्ताव आहे.
इलेक्ट्रिक वाहने, इलेक्ट्रॉनिक्स, रोबोटिक्स आणि जैवतंत्रज्ञान यांसारख्या उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण आणि शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे. त्याचबरोबर महिलांचा रोजगारातील सहभाग वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
औद्योगिक आणि शहरी विकासासाठी धोरणात्मक सुधारणा
विकास आराखड्यात सेमीकंडक्टर उद्योग, औद्योगिक कामगारांसाठी गृहनिर्माण आणि ग्रामीण-शहरी संक्रमण यासाठी नवीन धोरणे प्रस्तावित करण्यात आली आहेत.
तसेच सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई), एकात्मिक नगरवसाहती, पर्यटन, समूह पुनर्विकास, स्वायत्त औद्योगिक नगरवसाहती, खासगी औद्योगिक उद्याने, स्टार्टअप, झोपडपट्टी पुनर्विकास आणि विनावाहक बस संचालनाशी संबंधित धोरणात्मक सुधारणांचाही आराखड्यात समावेश आहे.
आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र यंत्रणा
विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विविध स्तरांवर स्वतंत्र यंत्रणा उभारण्याचे प्रस्तावित आहे. यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नियामक परिषद, मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्य सुकाणू समिती, पुणे ग्रोथ हब सुकाणू समिती तसेच पीएमआरडीएअंतर्गत प्रकल्प व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे.
या यंत्रणांच्या माध्यमातून विविध विभागांमधील समन्वय साधून आराखड्यातील प्रकल्पांची अंमलबजावणी आणि त्यांचे निरीक्षण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
अधिकाऱ्यांची उपस्थिती
या बैठकीस परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी, महाराष्ट्र वित्त आयोगाचे अध्यक्ष नितीन करीर, उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. अन्बळगन, पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे महासंचालक राजवर्धन, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त अभिजित चौधरी, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे आदी अधिकारी उपस्थित होते.