मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करा; राजकीय पक्षांना आयुक्त अश्विनी भिडे यांचे आवाहन
मुंबईतील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण SIR-२०२६ अंतर्गत प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून पात्र नागरिकांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी राजकीय पक्षांनी मतदारांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा BMC आयुक्त अश्विनी भिडे यांनी केले.
प्रतिनिधी: नरेश शिंदे
मुंबईतील मतदार याद्या अधिक अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision-SIR)-२०२६ कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेंतर्गत प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या असून, प्रारूप यादीत नाव नसलेल्या किंवा मतदार यादीतील नोंदींबाबत आक्षेप असलेल्या नागरिकांना ३० सप्टेंबर २०२६पर्यंत दावे व हरकती दाखल करता येणार आहेत.
आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून पात्र नागरिकांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी राजकीय पक्षांनी मतदारांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी केले आहे.
SIR-२०२६ बाबत राजकीय पक्षांची बैठक
मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक ३ सप्टेंबर २०२६ रोजी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात पार पडली.
या बैठकीला अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्रीमती प्राजक्ता वर्मा-लवंगारे, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर, सह आयुक्त (कर निर्धारण व संकलन) श्री. विश्वास शंकरवार तसेच विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान SIR-२०२६ अंतर्गत आतापर्यंत करण्यात आलेल्या कार्यवाहीची सविस्तर माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना देण्यात आली.
गृहभेटीपासून प्रारूप मतदार यादीपर्यंतची प्रक्रिया पूर्ण
SIR-२०२६ अंतर्गत आतापर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्या गृहभेटी, गणना पत्रांचे वाटप, संकलन व डिजिटायझेशन ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. त्यानंतर प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
तसेच, मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात आले असून त्यास भारत निवडणूक आयोगाची मान्यताही मिळाली आहे.
सध्या ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. त्यानंतर ३१ ऑगस्ट ते २९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत प्राप्त दावे व हरकतींचा निकाल लावण्यात येणार आहे.
त्यानंतर ४ नोव्हेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
राजकीय पक्षांनी BLO यांच्या समन्वयाने नागरिकांपर्यंत पोहोचावे
SIR-२०२६ची प्रक्रिया विहित वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असल्याचे अश्विनी भिडे यांनी सांगितले. विधानसभा मतदारसंघांचे मतदार नोंदणी अधिकारी (ERO), सहायक मतदार नोंदणी अधिकारी (AERO), पर्यवेक्षक, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) आणि मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (BLA) यांच्या समन्वयातून ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
राजकीय पक्षांनीही BLO यांच्या समन्वयाने मतदारांशी संपर्क साधावा, त्यांना योग्य मार्गदर्शन करावे आणि मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन भिडे यांनी केले.
संपूर्ण प्रक्रियेत सहकार्य करण्याचे आवाहन
मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेमुळे पात्र नागरिकांचे नाव मतदार यादीत राहणे तसेच मतदार यादीतील नोंदींबाबत आवश्यक दुरुस्ती करण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे.
ही संपूर्ण प्रक्रिया योग्य पद्धतीने आणि निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून, सर्व राजकीय पक्षांनी आणि संबंधित घटकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी केले आहे.
दरम्यान, बृहन्मुंबई क्षेत्रात SIR-२०२६ अंतर्गत महानगरपालिका प्रशासनाकडून सुरू असलेल्या कार्यवाहीबाबत बैठकीतील राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी समाधान व्यक्त केले.
What's Your Reaction?
Like
3
Dislike
0
Love
3
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
1