सोनोग्राफी व आयव्हीएफ केंद्रांवरील गैरप्रकारांविरोधात धडक मोहीम; दोषींवर मकोका लागू करण्यासाठी कायदा आणणार

महाराष्ट्रात सोनोग्राफी व आयव्हीएफ केंद्रांवरील गैरप्रकार रोखण्यासाठी विशेष तपासणी मोहीम सुरू. गर्भलिंग निदान, स्त्रीबीज तस्करी आणि बेकायदेशीर आयव्हीएफ केंद्रांवर कठोर कारवाई होणार असून दोषींवर मकोका लागू करण्यासाठी कायदा आणण्याची घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केली.

Jul 1, 2026 - 19:11
 0  7
सोनोग्राफी व आयव्हीएफ केंद्रांवरील गैरप्रकारांविरोधात धडक मोहीम; दोषींवर मकोका लागू करण्यासाठी कायदा आणणार
सोनोग्राफी केंद्र, आयव्हीएफ केंद्र, IVF Centre Maharashtra, गर्भलिंग निदान, पीसीपीएनडीटी कायदा,

सोनोग्राफी व आयव्हीएफ केंद्रांवरील गैरप्रकारांविरोधात धडक मोहीम; दोषींवर मकोका लागू करण्यासाठी कायदा आणणार

मुंबई | प्रतिनिधी देवानंद शिंदे 

राज्यातील सोनोग्राफी, आयव्हीएफ आणि गर्भपात केंद्रांद्वारे होणारे गैरप्रकार तसेच गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन रोखण्यासाठी विशेष पथकांमार्फत राज्यभर धडक तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. तसेच अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्यांवर मकोका कायद्याच्या तरतुदी लागू करता याव्यात, यासाठी आवश्यक कायदा आणण्याचा निर्णय शासनाने घेतल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत दिली.

विधानसभेत सदस्य अबू आझमी यांनी विनापरवाना सुरू असलेल्या आयव्हीएफ केंद्रांवरील कारवाईबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री आबिटकर यांनी ही माहिती दिली. यावेळी सदस्य हरीश पिंपळे, अजय चौधरी, योगेश सागर आणि राहुल पाटील यांनीही उपप्रश्न उपस्थित केले.

मंत्री आबिटकर म्हणाले की, राज्यात आयव्हीएफ उपचार आणि सिझेरियन प्रसूतींचे प्रमाण अनावश्यकरीत्या वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आयव्हीएफ उपचारांचा वापर केवळ वैद्यकीय गरजेनुसार होईल, यासाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्यात येणार आहे.

स्त्रीबीज तस्करी, गर्भलिंग निदान, बेकायदेशीर गर्भपात तसेच आयव्हीएफ केंद्रांमधील गैरप्रकारांमध्ये सहभागी असलेल्या डॉक्टर, कर्मचारी आणि संबंधित रुग्णालय व्यवस्थापनाविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बदलापूर आणि अंबरनाथ येथे उघडकीस आलेल्या स्त्रीबीज तस्करी प्रकरणात संबंधित डॉक्टरांना अटक करण्यात आली असून त्यांच्या वैद्यकीय नोंदणी (सनद) रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे. भविष्यात अशा प्रकारच्या गैरप्रकारांमध्ये सहभागी आढळणाऱ्या कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असा इशाराही मंत्री आबिटकर यांनी दिला.

दरम्यान, चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील बेबीश्युअर क्लिनिक आणि इंदिरा आयव्हीएफ सेंटरची परिमंडळस्तरीय तज्ज्ञ समितीमार्फत तपासणी करण्यात आली. तपासणीत अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्याने राज्यस्तरावरून एआरटी लेव्हल-१ नोंदणी मिळेपर्यंत दोन्ही केंद्रांचे कामकाज तातडीने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संबंधित प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचेही मंत्री आबिटकर यांनी सांगितले.

राज्यात गर्भलिंग निदान, स्त्रीबीज तस्करी आणि बेकायदेशीर आयव्हीएफ केंद्रांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी तपासणी मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असून दोषींविरुद्ध कठोर कारवाईचा इशारा शासनाने दिला आहे.

What's Your Reaction?

Like Like 3
Dislike Dislike 0
Love Love 1
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 1