ई20 इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या सक्तीविरोधात 'आप'ची गाडीची अंत्ययात्रा; शुद्ध पेट्रोलचा पर्याय देण्याची मागणी

कोल्हापुरात आम आदमी पक्षाने (आप) ई20 इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या सक्तीविरोधात गाडीची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून आंदोलन केले. वाहनधारकांना शुद्ध पेट्रोलचा पर्याय उपलब्ध करून देणे, ई20 पेट्रोलचे दर कमी करणे आणि ग्राहकांना इंधन निवडीचे स्वातंत्र्य देण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली.

Jul 16, 2026 - 23:19
 0  20
ई20 इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या सक्तीविरोधात 'आप'ची गाडीची अंत्ययात्रा; शुद्ध पेट्रोलचा पर्याय देण्याची मागणी
E20 पेट्रोल, इथेनॉल मिश्रित पेट्रोल, आम आदमी पार्टी, AAP, कोल्हापूर आंदोलन

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी : उमेश जाधव

कोल्हापूर : पेट्रोल पंपांवर ई20 इथेनॉल मिश्रित पेट्रोलची सक्ती करण्यात येत असल्याच्या निषेधार्थ आम आदमी पक्षाने (आप) गुरुवारी कोल्हापुरात गाडीची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत अनोखे आंदोलन केले. वाहनधारकांना शुद्ध पेट्रोलचा पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी करत आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर निवेदन सादर केले.

बसंत बहार टॉकीज परिसरातील पेट्रोल पंपापासून या प्रतिकात्मक अंत्ययात्रेला सुरुवात झाली. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी "राम नाम सत्य है, आम जनता त्रस्त है, नितीन गडकरी मस्त है" अशा घोषणा देत केंद्र सरकारच्या ई20 इंधन धोरणाचा निषेध व्यक्त केला.

आम आदमी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, ई20 पेट्रोलमुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे मायलेज ५ ते १५ टक्क्यांपर्यंत कमी होत असल्याचा दावा वाहनधारकांकडून केला जात आहे. तसेच इथेनॉल मिश्रित इंधनामुळे इंजिनमधील महत्त्वाचे भाग खराब होऊन दुरुस्तीचा खर्च वाढत असल्याची तक्रारही त्यांनी मांडली.

वाहनांची इंजिने प्रामुख्याने शुद्ध पेट्रोलसाठी डिझाइन करण्यात आली असून, केंद्र सरकारच्या सध्याच्या धोरणामुळे ग्राहकांना ई0 किंवा ई10 अशा शुद्ध किंवा कमी इथेनॉल मिश्रित पेट्रोलचा पर्याय उपलब्ध नसल्याचे आंदोलनकर्त्यांनी नमूद केले.

इथेनॉलचे उत्पादन तुलनेने कमी खर्चात होत असतानाही ग्राहकांना ई20 पेट्रोल शुद्ध पेट्रोलइतक्याच दराने विकले जात असल्याने सामान्य आणि मध्यमवर्गीय नागरिकांना आर्थिक फटका बसत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाकडे खालील प्रमुख मागण्या केल्या:

प्रत्येक पेट्रोल पंपावर शुद्ध पेट्रोल (ई0/ई10) उपलब्ध करून द्यावे.

ई20 पेट्रोलची किंमत शुद्ध पेट्रोलपेक्षा कमी ठेवावी.

वाहनधारकांना त्यांच्या वाहनानुसार ई0, ई10 किंवा ई20 इंधन निवडण्याचे स्वातंत्र्य द्यावे.

जुन्या वाहनांच्या वाढीव दुरुस्ती खर्चाची भरपाई द्यावी किंवा वाहन उत्पादक कंपन्यांनी मोफत दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करून द्यावी.

ई20 सक्तीच्या धोरणामुळे देशातील कोट्यवधी वाहनधारकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याचा दावा करत या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करणारे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना देण्यात आले.

या आंदोलनात आम आदमी पक्षाचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई, किरण साळोखे, उत्तम पाटील, अभिजित कांबळे, सूरज सुर्वे, समीर लतीफ, मोईन मोकाशी, दुष्यंत माने, विजय हेगडे, इस्थेर कांबळे, राकेश गायकवाड, संजय नलवडे, दिग्विजय चिले, दिलीप पाटील, प्रथमेश सूर्यवंशी, स्वप्निल काळे, लखन काझी, रमेश कोळी, नाझिल शेख, जुबेर मुजावर, उमेश वडर, रणजित पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले.

What's Your Reaction?

Like Like 4
Dislike Dislike 0
Love Love 2
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 2