अमराठी चालकांसाठी ‘व्यवहारिक मराठी’ उपक्रम; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन
महाराष्ट्रातील रिक्षा, टॅक्सी तसेच ॲप-आधारित प्रवासी सेवांमध्ये कार्यरत अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाने ‘व्यवहारिक मराठी’ उपक्रम सुरू केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
प्रतिनिधी दिपक शिंदे
मुंबई | दि. २९ एप्रिल
राज्यातील प्रवासी सेवा अधिक सुसंवादी, परिणामकारक आणि नागरिकाभिमुख करण्याच्या उद्देशाने परिवहन विभागाने अमराठी चालकांना ‘व्यवहारिक मराठी’ शिकविण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाअंतर्गत तयार करण्यात आलेल्या संक्षिप्त मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार तसेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक उपस्थित होते.
रिक्षा, टॅक्सी आणि ॲप चालकांना होणार फायदा
ही पुस्तिका विशेषतः रिक्षा, टॅक्सी तसेच Ola आणि Uber सारख्या ॲप-आधारित प्रवासी सेवा देणाऱ्या वाहनचालकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. दैनंदिन व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या सोप्या आणि आवश्यक मराठी वाक्यांचा समावेश या पुस्तिकेत करण्यात आला आहे.
प्रवाशांशी संवाद साधताना भाषेची अडचण दूर व्हावी, सेवा अधिक सुलभ व्हावी आणि ग्राहकांना चांगला अनुभव मिळावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
स्थानिक भाषेचे ज्ञान आवश्यक : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, महाराष्ट्रात सेवा देताना स्थानिक भाषेचे ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे. ‘व्यवहारिक मराठी’च्या माध्यमातून चालक आणि प्रवासी यांच्यातील संवाद अधिक प्रभावी होईल आणि सेवेत गुणात्मक सुधारणा घडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राज्यभर प्रशिक्षण कार्यक्रमांची तयारी
परिवहन विभागाच्या या उपक्रमाचे विविध स्तरांतून स्वागत होत असून, पुढील काळात राज्यभर अशा प्रकारच्या प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच रिक्षा व टॅक्सी चालक संघटनांनीही पुढाकार घेऊन मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी ही मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन प्रताप सरनाईक यांनी केले.
What's Your Reaction?
Like
3
Dislike
0
Love
1
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
1

