डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

गडचिरोली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून विद्यार्थी व नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Apr 16, 2026 - 22:30
 0  0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन
डॉ बाबासाहेब आंबेडकर निबंध स्पर्धा, गडचिरोली स्पर्धा, राज्यस्तरीय निबंध स्पर्धा

गडचिरोली, दि. 16 : कौशल्य, रोजगार व उद्योजकता विभागामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत राज्यभरातील विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांना सहभागी होता येणार आहे.

या स्पर्धेचा विषय “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी केलेले कार्य” असा ठेवण्यात आला असून निबंध मराठी भाषेत सादर करणे आवश्यक आहे. स्पर्धेसाठी दोन गट निश्चित करण्यात आले आहेत.

गट क्रमांक १ मध्ये आयटीआय, डिप्लोमा प्रशिक्षणार्थी, उत्तीर्ण विद्यार्थी तसेच बायफोकल व एमसीव्हीसी विद्यार्थ्यांसाठी ५०० ते ८०० शब्दांची मर्यादा ठेवण्यात आली आहे. तर गट क्रमांक २ मध्ये खुल्या गटासाठी (पुरुष/महिला) ८०० ते १२०० शब्दांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

स्पर्धकांनी सादर केलेला निबंध हा मूळ आणि स्वतंत्र असावा. निबंधात कोणतीही कॉपी आढळल्यास संबंधित स्पर्धक अपात्र ठरणार आहे. प्रत्येक स्पर्धकाला एकच निबंध सादर करता येईल. निबंध हस्तलिखित किंवा टंकलिखित स्वरूपात स्वीकारला जाणार असला तरी अंतिम सादरीकरण पीडीएफ स्वरूपात करणे बंधनकारक आहे.

स्पर्धकांनी आपला निबंध दिलेल्या ऑनलाइन लिंकवर अपलोड करावा. अर्ज भरताना पूर्ण नाव, गट क्रमांक, संपर्क क्रमांक, शाळा/महाविद्यालयाचे नाव आणि पूर्ण पत्ता नमूद करणे आवश्यक आहे. निबंधाचे मूल्यमापन मांडणी, भाषा, मौलिकता, दृष्टिकोन आणि सर्जनशीलता या निकषांवर करण्यात येणार आहे.

या स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम ३१ हजार रुपये, द्वितीय २१ हजार रुपये आणि तृतीय ११ हजार रुपये बक्षीस तसेच स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र प्रदान करण्यात येणार आहे.

स्पर्धेचा निकाल अधिकृत माध्यमातून जाहीर केला जाईल. आयोजकांचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहील. अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

सर्व इच्छुक स्पर्धकांनी आपले निबंध १४ एप्रिल ते २० एप्रिल २०२६ या कालावधीत सादर करावेत. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली येथे संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्तांनी केले आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0