भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची'; आषाढी वारीतील ३.८३ लाखांहून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा

आषाढी वारी २०२६ मध्ये सहभागी झालेल्या वारकरी भाविकांसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने व्यापक आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली आहे. आतापर्यंत ३.८३ लाखांहून अधिक वारकऱ्यांवर मोफत उपचार करण्यात आले असून, पालखी मार्गावर रुग्णवाहिका, आयसीयू, आपला दवाखाना आणि एअर ॲम्बुलन्ससह विशेष सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची'; आषाढी वारीतील ३.८३ लाखांहून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा
आषाढी वारी २०२६, वारकरी आरोग्य सेवा, सार्वजनिक आरोग्य विभाग, भक्ती विठोबाची सेवा

प्रतिनिधी. | नरेश शिंदे 

मुंबई, दि. १९ : आषाढी वारी २०२६ मध्ये सहभागी झालेल्या लाखो वारकरी भाविकांसाठी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने 'भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची' ही संकल्पना प्रभावीपणे राबवत व्यापक आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली आहे. आतापर्यंत ३ लाख ८३ हजार ६४३ वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा देण्यात आली असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर आणि सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही आरोग्य सेवा राबविण्यात येत आहे.

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, ३ लाख ८० हजार ४८५ वारकऱ्यांवर बाह्यरुग्ण विभागात उपचार, ३ हजार १५८ रुग्णांना आंतररुग्ण सेवा, तर ८८३ रुग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले आहे.

वारकऱ्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी पालखी मार्गावर ३५३ रुग्णवाहिका, ४३ सुसज्ज आयसीयू, १५६ 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना', २१५ आरोग्यदूत, ३,०८७ वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तसेच ३०२ तज्ज्ञ डॉक्टर कार्यरत आहेत. याशिवाय पंढरपूरमध्ये २४ तास कार्यरत आयसीयू, तीन दिवसांचे महाआरोग्य शिबिर आणि यंदाच्या वारीचे विशेष आकर्षण ठरलेली एअर ॲम्बुलन्स सेवाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

वारकऱ्यांच्या आरोग्याची सर्वांगीण काळजी घेण्यासाठी पालखी मार्गावरील पाणी स्रोतांचे सर्वेक्षण व निर्जंतुकीकरण, डेंग्यू, मलेरिया यांसारख्या कीटकजन्य आजारांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना, हॉटेल व धाब्यांमधील कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी, वारीनंतर विशेष स्वच्छता मोहीम, असंसर्गजन्य आजारांची तपासणी आणि आरोग्य जनजागृतीचे कार्यक्रमही राबविण्यात येत आहेत.

तसेच 'आरोग्यसंपन्न वारी' या डिजिटल ॲपच्या माध्यमातून वारकऱ्यांना तातडीच्या आरोग्य सुविधा, जवळच्या आरोग्य केंद्रांची माहिती आणि आवश्यक वैद्यकीय मदत सहज उपलब्ध करून देण्यात येत आहे.

राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक आरोग्य विभाग वारीच्या संपूर्ण कालावधीत पूर्ण क्षमतेने कार्यरत असून, प्रत्येक वारकऱ्याला सुरक्षित, सुलभ आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा मिळावी यासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली असल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.