एटीएममध्ये प्लास्टिक पट्टी लावून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; मुख्य आरोपीसह तिघांवर कारवाई
भांडुप परिसरातील बँक ऑफ बडोदाच्या एटीएममध्ये प्लास्टिक पट्टी लावून ग्राहकांचे पैसे अडकवून चोरी करणाऱ्या टोळीचा भांडुप पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून दोन महिला साथीदारांवरही कारवाई करण्यात आली आहे. आरोपींकडून सुमारे ₹१.२९ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मुंबई ब्यूरो : अनिल सावरे
मुंबई, दि. १८ जुलै : भांडुप परिसरातील बँक ऑफ बडोदाच्या एटीएममध्ये प्लास्टिक पट्टी लावून ग्राहकांचे पैसे अडकवून त्यांची चोरी करणाऱ्या टोळीचा भांडुप पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून दोन महिला साथीदारांविरुद्धही कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. आरोपींकडून सुमारे ₹१ लाख २९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भांडुप येथील बँक ऑफ बडोदाच्या एटीएममध्ये दोन अज्ञात व्यक्तींनी एटीएम मशीनमध्ये प्लास्टिकची पट्टी लावून छेडछाड केली होती. त्यामुळे ग्राहकांनी पैसे काढण्याचा व्यवहार केल्यानंतर त्यांच्या खात्यातून रक्कम वजा होत होती, मात्र पैसे मशीनमधून बाहेर येत नव्हते. याबाबत बँकेकडे पाच तक्रारी प्राप्त झाल्यानंतर भांडुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासादरम्यान पोलिसांनी एटीएममधील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपी ग्राहक येण्यापूर्वी मशीनमध्ये प्लास्टिकची पट्टी बसवत असल्याचे आणि ग्राहक निघून गेल्यानंतर अडकलेली रक्कम काढून नेत असल्याचे निष्पन्न झाले. सलग दोन दिवसांच्या फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले.
या कारवाईत मुख्य आरोपी मोहम्मद जियाद उर्फ अयान इशराद अहमद (वय २१) याला अटक करण्यात आली. तसेच तपासात आरिफा अजीम दुकानदार आणि नमीरा अजीम दुकानदार या दोन महिला आरोपींचा सहभाग समोर आल्याने त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करण्यात आली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
आरोपींकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटारसायकल, प्लास्टिकची पट्टी, मोबाईल फोन आणि चोरीची रोकड असा एकूण ₹१.२९ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई मुंबई पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली पूर्व प्रादेशिक विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली भांडुप पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने केली.
दरम्यान, नागरिकांनी एटीएममधून व्यवहार करताना खात्यातून रक्कम वजा झाल्याचा संदेश मिळूनही पैसे प्राप्त झाले नसल्यास तात्काळ संबंधित बँक आणि जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन भांडुप पोलिसांनी केले आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
1
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
1