भाजप महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा कार्यकारिणीत नाशिकच्या तिघींना स्थान; छाया देवांग उपाध्यक्ष, शिल्पा पारनेरकर व डॉ. सारिका डेरले सचिव
भाजप महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चाच्या नव्या कार्यकारिणीत नाशिक जिल्ह्यातील तिघींना स्थान मिळाले आहे. छाया देवांग यांची प्रदेश उपाध्यक्षपदी, तर शिल्पा पारनेरकर आणि डॉ. सारिका डेरले यांची प्रदेश सचिवपदी निवड करण्यात आली.
नाशिक ब्यूरो
नाशिक : भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चाच्या नव्याने जाहीर करण्यात आलेल्या कार्यकारिणीत नाशिक जिल्ह्यातील तिघींना महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. भाजप महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चाच्या उपाध्यक्षपदी छाया देवांग यांची निवड करण्यात आली असून, नाशिक महानगरातील शिल्पा पारनेरकर आणि भाजप नाशिक ग्रामीण उत्तरमधील डॉ. सारिका डेरले यांची प्रदेश सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजप महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांनी महिला मोर्चाची नवीन प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली. या कार्यकारिणीत नाशिक जिल्ह्यातील तीन महिला पदाधिकाऱ्यांना स्थान मिळाल्याने नाशिक भाजपच्या महिला संघटनेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नवनिर्वाचित महिला मोर्चा पदाधिकाऱ्यांना आवाहन करताना प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांनी सांगितले की, आतापर्यंत महिला पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवून ते प्रभावीपणे राबविले आहेत. भविष्यातही हीच कार्यतत्परता कायम ठेवून महिलांच्या हितासाठी शासनाने घेतलेले निर्णय समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांच्या जनहितासाठी घेतलेले विविध निर्णय तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांच्या विकासासाठी राबविलेल्या उपक्रमांची माहिती समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवावी, असे आवाहनही चित्राताई वाघ यांनी केले.
तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या आवाहनानुसार भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशातर्फे राबविण्यात येणारे विविध उपक्रम मोठ्या प्रमाणावर जनतेपर्यंत पोहोचवावेत. महिला मोर्चाच्या माध्यमातून पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी सक्रियपणे कार्य करावे, असेही त्यांनी नमूद केले.
छाया देवांग, शिल्पा पारनेरकर आणि डॉ. सारिका डेरले यांच्या निवडीबद्दल भाजपचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री गिरीश महाजन, भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालय प्रभारी रवीजी अनासपुरे, नाशिक महानगर जिल्हाध्यक्ष सुनील केदार, नाशिक जिल्हा ग्रामीण दक्षिण अध्यक्ष सुनील बच्छाव, नाशिक जिल्हा उत्तर ग्रामीण अध्यक्ष यतीन कदम, भाजप प्रदेश चिटणीस रोहिणी नायडू-वानखेडे, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी आणि अजित चव्हाण यांनी अभिनंदन केले.
तसेच आमदार राहुल ढिकले, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, महापौर हिमगौरी आहेर-आडके, उपमहापौर मच्छिंद्र सानप, उत्तर महाराष्ट्र माध्यम विभाग प्रमुख बी. गोविंद बोरसे, महाराष्ट्र प्रदेश गुड गव्हर्नन्स सेलचे संयोजक प्रदीप पेशकार, बाळासाहेब सानप, विजय साने, महेश हिरे, सतीश कुलकर्णी, प्रशांत जाधव, गिरीश पालवे, मध्य विधानसभा प्रभारी सुनील फरांदे, भाजप नाशिक शहर सरचिटणीस सुनील देसाई, ॲड. श्याम बडोदे, रश्मी हिरे, पूर्व विधानसभा प्रभारी नाना शिलेदार यांच्यासह महानगरातील मंडल अध्यक्ष, पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी नवनिर्वाचित महिला मोर्चा पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
नाशिक जिल्ह्यातील तिघींना प्रदेश कार्यकारिणीत महत्त्वाची जबाबदारी मिळाल्याने महिला मोर्चाची संघटनात्मक ताकद अधिक वाढेल, तसेच महिलांपर्यंत पक्षाचे विविध उपक्रम आणि शासनाच्या योजना प्रभावीपणे पोहोचविण्यास मदत होईल, अशी भावना भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.