परवान्यातील क्षेत्रफळाबाहेर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करा; आयुक्त अश्विनी भिडे यांचे निर्देश

मुंबईतील ‘पादचारी प्रथम’ अभियानांतर्गत महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी मुंबई शहरातील विविध भागांची तीन तासांहून अधिक वेळ पाहणी केली. परवान्यात नमूद क्षेत्रफळाबाहेर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देतानाच पदपथ अडथळामुक्त ठेवण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

Aug 18, 2026 - 00:44
 0  10
परवान्यातील क्षेत्रफळाबाहेर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करा; आयुक्त अश्विनी भिडे यांचे निर्देश
अश्विनी भिडे, मुंबई महापालिका, BMC, पादचारी प्रथम अभियान, Pedestrian First, फेरीवाले, पदपथ अतिक्रमण, मुंबई पदपथ, फेरीवाला परवाना,

प्रतिनिधी : नरेश शिंदे 

मुंबई, दि. १७ ऑगस्ट २०२६ : मुंबईतील पदपथ अडथळामुक्त करून ते पादचाऱ्यांसाठी अधिक सुरक्षित आणि सुलभ करण्याच्या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून राबविण्यात येत असलेल्या ‘पादचारी प्रथम’ (Pedestrian First) अभियानाला नागरिकांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. या अभियानाच्या अंमलबजावणीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी आज मुंबई शहरातील विविध भागांची सकाळी सुमारे तीन तासांहून अधिक वेळ पाहणी केली.

पदपथांवर व्यवसाय करणाऱ्या अधिकृत फेरीवाल्यांनी त्यांच्या परवान्यात निश्चित केलेल्या जागेत आणि विहित क्षेत्रफळातच व्यवसाय करावा. परवान्यात नमूद क्षेत्रफळापेक्षा अधिक जागा व्यापून अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश आयुक्त अश्विनी भिडे यांनी यावेळी दिले.

तसेच, अनुज्ञापन विभागाने सर्व परवानाधारक फेरीवाल्यांकडून प्रत्यक्षात किती क्षेत्रफळाचा वापर केला जात आहे, याची पाहणी करावी. परवान्यातील निर्धारित क्षेत्रफळापेक्षा अधिक जागेचा वापर होत असल्याचे आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी, असेही त्यांनी निर्देशित केले.

मुंबई शहरातील विविध भागांची प्रत्यक्ष पाहणी

‘पादचारी प्रथम’ अभियानांतर्गत सुरू असलेल्या कार्यवाहीची पाहणी करताना आयुक्त अश्विनी भिडे यांनी मुंबई शहरातील विविध विभागांना भेटी दिल्या.

‘डी’ विभागातील नाना चौक, ग्रँट रोड रेल्वे स्थानक, नौशीर भरुचा छेद गल्ली, नाना शंकरशेट मार्गावरील भाजी गल्ली आणि ताडदेव मार्ग परिसराची पाहणी करण्यात आली.

‘ई’ विभागातील डॉ. आनंदराव नायर मार्ग, बा. य. ल. नायर रुग्णालय परिसर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, नाथ पै मार्ग आणि संत सावता मार्गाची पाहणी करण्यात आली.

तसेच ‘बी’ विभागातील लोकमान्य टिळक मार्ग, सिंदूर पूल परिसर, जुना बंगालीपुरा गल्ली, रघुनाथ महाराज स्ट्रीट आणि काझी सय्यद मार्ग, तर ‘सी’ विभागातील जगन्नाथ शंकरशेट मार्ग, धोबीतलाव गल्ली, महर्षी कर्वे मार्ग, मरीन लाईन्स आणि चंदनवाडी परिसराची पाहणी करण्यात आली.

‘ए’ विभागातील महात्मा जोतिबा फुले मंडई अर्थात क्रॉफर्ड मार्केट आणि महापालिका मार्ग परिसराचाही पाहणी दौऱ्यात समावेश होता.

या पाहणीदरम्यान पदपथांची सद्यस्थिती, दुरुस्तीची आवश्यकता, अडथळे, फेरीवाल्यांची स्थिती तसेच पादचाऱ्यांना येणाऱ्या अडचणींचा आयुक्तांनी आढावा घेतला.

पदपथांवरील झाडांच्या मुळांचे संरक्षण करा

पदपथ अडथळामुक्त करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून सुरू असलेले प्रयत्न समाधानकारक आहेत. मात्र, या कार्यवाहीत सातत्य राहणे आवश्यक आहे, असे आयुक्तांनी सांगितले.

पदपथांची सुधारणा, सुशोभीकरण आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात. पदपथांवरील सर्व प्रकारचे अडथळे दूर करून ते पादचाऱ्यांसाठी सुलभ करावेत. करण्यात आलेला बदल नागरिकांना प्रत्यक्ष मार्गक्रमण करताना दृश्य स्वरूपात जाणवला पाहिजे, असे निर्देश त्यांनी दिले.

पदपथांवरील झाडांच्या मुळांना कोणतीही हानी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. आवश्यकतेनुसार फांद्यांची योग्य पद्धतीने छाटणी करावी. असुरक्षित झाडांचे नियमानुसार आणि शास्त्रोक्त पद्धतीने निर्मूलन करावे, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

फेरीवाल्यांमुळे पादचाऱ्यांच्या मार्गात अडथळा नको

पाहणीदरम्यान आयुक्तांनी काही फेरीवाल्यांच्या परवाना प्रमाणपत्रांची प्रत्यक्ष पाहणी केली. संबंधित फेरीवाले आणि संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधून त्यांना आवश्यक सूचनाही दिल्या.

अधिकृत फेरीवाल्यांना पदपथांवर व्यवसाय करण्यास परवानगी असली तरी त्यांच्या व्यवसायामुळे पादचाऱ्यांच्या मार्गात कोणताही अडथळा निर्माण होता कामा नये. तसेच फेरीवाल्यांनी त्यांच्या परवान्यात नमूद केलेल्या क्षेत्रफळातच व्यवसाय करावा आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

ग्रँट रोड रेल्वे स्थानक, जगन्नाथ शंकरशेट मेट्रो स्थानक आणि बा. य. ल. नायर रुग्णालय परिसरात पादचाऱ्यांना सुलभपणे मार्गक्रमण करता यावे, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

कचरा साचणाऱ्या संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्याचे निर्देश

आयुक्त अश्विनी भिडे यांनी ‘ई’ विभागातील सुका कचरा संकलन केंद्र, रे रोड येथील घनकचरा व्यवस्थापन विभागाची चौकी, संत सावता मार्गावरील उदंचन केंद्र तसेच मोठ्या प्रमाणात कचरा साचणाऱ्या संवेदनशील ठिकाणांची Garbage Vulnerable Points (GVPs) पाहणी केली.

या ठिकाणी दर्शनी भागावर ‘कचरा टाकू नये’ अशा आशयाचे सूचना फलक लावावेत. वारंवार कचरा टाकणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी संवेदनशील ठिकाणी तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, असे निर्देश त्यांनी दिले.

तसेच संबंधित परिसराचे सुशोभीकरण करावे. सुका कचरा वर्गीकरण केंद्रांची रचना अधिक योग्य पद्धतीने करावी आणि वर्गीकरण केलेल्या कचऱ्याचा प्रकार संबंधित कचऱ्याच्या थैलीवर दर्शनी भागावर स्पष्टपणे नमूद करावा, अशा सूचनाही आयुक्तांनी दिल्या.

पदपथांवर साहित्य ठेवू नका; वाहनेही उभी करू नका

पदपथ मोकळे करण्यासाठी आणि कचरा साचणाऱ्या संवेदनशील ठिकाणांचे निर्मूलन करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना सुरू आहेत. मात्र, या प्रयत्नांना नागरिकांचे सहकार्यही तितकेच आवश्यक आहे, असे आयुक्त अश्विनी भिडे यांनी सांगितले.

नागरिकांनी पदपथांवर कोणतेही साहित्य ठेवू नये. पदपथांवर वाहने उभी करू नयेत. तसेच पदपथ, रस्ते किंवा सार्वजनिक ठिकाणी कुठेही कचरा टाकू नये. मुंबई शहर स्वच्छ, सुरक्षित आणि पादचारीस्नेही करण्यासाठी प्रशासनाकडून सुरू असलेल्या ‘पादचारी प्रथम’ अभियानाला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

या पाहणी दौऱ्यावेळी उपायुक्त चंदा जाधव, उपायुक्त प्रशांत गायकवाड, सहायक आयुक्त संतोष साळुंके, आनंद कंकाळ, जितेंद्र घोराडे, उज्ज्वल इंगोले आणि सुनील माने यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 3
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.