पश्चिम उपनगरातील रुग्णालय व प्रसुतिगृह पुनर्विकासाला गती द्या – अतिरिक्त आयुक्त डॉ. विपिन शर्मा
मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये रुग्णालये व प्रसुतिगृहांच्या पुनर्विकास कामांना गती देण्याचे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिले. सुपरस्पेशालिटी रुग्णालय व प्रसुतिगृह क्षमतावाढ प्रकल्पांवर भर देण्यात आला.
मुंबई :
पश्चिम उपनगरातील नागरिकांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सुविधा त्यांच्या परिसरातच उपलब्ध व्हाव्यात यासाठी रुग्णालये आणि प्रसुतिगृहांच्या पुनर्विकास कामांना गती देण्याचे निर्देश डॉ. विपिन शर्मा यांनी दिले.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय येथे सुरु असलेल्या ३२५ रुग्णशय्या क्षमतेच्या सुपरस्पेशालिटी प्रकल्पाचा आढावा त्यांनी स्थळभेटीद्वारे घेतला. या प्रकल्पाचे काम जलदगतीने पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागांनी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी रुग्णालयातील अतिदक्षता विभाग, बाह्यरुग्ण विभाग, शस्त्रक्रियागृह तसेच रुग्ण कक्षांची पाहणी करत त्यांनी रुग्णांशी संवाद साधला. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयाच्या इमारतीत अतिरिक्त मजले वाढवण्याबाबतही त्यांनी निर्देश दिले. सध्या या रुग्णालयाची क्षमता ४४४ रुग्णशय्या इतकी असून, पश्चिम उपनगरातील सुमारे ३० ते ४० लाख लोकसंख्येला येथे सेवा दिली जाते.
नवीन उभारण्यात येणाऱ्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयात कर्करोग, हृदयरोग, मज्जातंतू, यकृत व मूत्रपिंड विभागांचा समावेश असणार आहे. अकरा मजली या इमारतीपैकी नऊ मजल्यांचे बांधकाम पूर्ण झाले असून उर्वरित कामे वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
तसेच ओशिवरा येथील १५० रुग्णशय्या क्षमतेच्या प्रसुतिगृहाच्या पुनर्विकास प्रकल्पालाही गती देण्याचे निर्देश त्यांनी दिले. या प्रकल्पामुळे परिसरातील महिलांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत.
गोरेगाव येथील ३० रुग्णशय्या क्षमतेच्या टोपीवाला मॅटर्निटी होमलाही त्यांनी भेट देत तेथील सुविधांचा आढावा घेतला. रुग्णांशी संवाद साधून सेवा अधिक प्रभावी करण्यावर भर देण्यात आला.
याशिवाय रुग्णालयातील प्रयोगशाळांना NABH मानांकन मिळवण्यासाठी आवश्यक बाबींचा आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. धर्मशाळेच्या इमारतीची क्षमतावाढ करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
पश्चिम उपनगरातील वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सुविधा सक्षम करणे अत्यावश्यक असून, सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0