महानगरपालिका रुग्णालयांत 'एक रुग्ण-एक नातेवाईक' धोरण लागू करण्याची महापौर रितू तावडे यांची सूचना

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांतील वाढती गर्दी कमी करून रुग्णांना स्वच्छ व संसर्गमुक्त वातावरण मिळावे यासाठी 'एक रुग्ण-एक नातेवाईक' पद्धत आणि 'अभ्यागत प्रवेशिका प्रणाली' लागू करण्याची सूचना महापौर रितू तावडे यांनी महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्राद्वारे केली आहे.

Jul 14, 2026 - 00:29
 0  8
महानगरपालिका रुग्णालयांत 'एक रुग्ण-एक नातेवाईक' धोरण लागू करण्याची महापौर रितू तावडे यांची सूचना
बृहन्मुंबई महानगरपालिका, रितू तावडे,

मुंबई | प्रतिनिधी नरेश शिंदे 

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रमुख आणि उपनगरीय रुग्णालयांमधील वाढती गर्दी कमी करून रुग्णांना अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि संसर्गमुक्त वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी 'एक रुग्ण-एक नातेवाईक' पद्धत तसेच 'अभ्यागत प्रवेशिका प्रणाली' (Visitor Pass Management System) लागू करण्याची सूचना मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी महानगरपालिका प्रशासनाला केली आहे. यासंदर्भात त्यांनी महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र पाठविले आहे.

महापौरांनी आपल्या पत्रात रुग्णालयांमधील अनावश्यक गर्दीमुळे उपचार प्रक्रियेवर, स्वच्छतेवर आणि सुरक्षेवर परिणाम होत असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे प्रायोगिक तत्त्वावर केईएम, शीव (सायन) आणि नायर रुग्णालयांमध्ये ही व्यवस्था तातडीने सुरू करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

'एक रुग्ण-एक नातेवाईक' धोरणाची शिफारस

महापौरांच्या प्रस्तावानुसार, रुग्णालयात दाखल असलेल्या प्रत्येक रुग्णासोबत वॉर्डमध्ये केवळ एकाच नातेवाईकाला थांबण्याची परवानगी द्यावी. त्यामुळे वॉर्ड आणि कॉरिडॉरमधील अनावश्यक गर्दी कमी होईल. तसेच डॉक्टर, परिचारिका आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना रुग्णांवर अधिक प्रभावीपणे उपचार करता येतील.

अभ्यागत प्रवेशिका प्रणाली लागू करण्याचा प्रस्ताव

रुग्णालयांच्या प्रवेशद्वारावर Visitor Pass Management System सुरू करून प्रत्येक अभ्यागताला प्रवेशिका देण्याची व्यवस्था करण्याचा प्रस्तावही महापौरांनी मांडला आहे. या प्रवेशिकांची तपासणी सुरक्षा रक्षक करतील. भविष्यात ही प्रणाली डिजिटल स्वरूपात राबविल्यास सुरक्षा अधिक मजबूत होईल आणि अनधिकृत व्यक्तींच्या प्रवेशावर प्रभावी नियंत्रण ठेवता येईल, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

अत्यवस्थ रुग्णांसाठी विशेष सवलत

अतिदक्षता विभागात (ICU) उपचार घेत असलेल्या किंवा अत्यंत गंभीर प्रकृतीच्या रुग्णांच्या नातेवाईकांना मानवतावादी दृष्टिकोनातून एकापेक्षा अधिक प्रवेशिका देण्याची विशेष सवलत देण्याचीही सूचना करण्यात आली आहे. अशा प्रकरणांमध्ये अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार संबंधित रुग्णालय प्रशासनाकडे असेल.

या निर्णयामुळे अपेक्षित फायदे

महापौरांनी या प्रणालीमुळे अनेक सकारात्मक परिणाम अपेक्षित असल्याचे स्पष्ट केले आहे. यामध्ये रुग्णालयातील वॉर्ड आणि कॉरिडॉरमधील गर्दी कमी होणे, स्वच्छतेचा दर्जा सुधारणे, रुग्णांना शांत आणि संसर्गमुक्त वातावरण मिळणे तसेच नागरिकांमध्ये सार्वजनिक ठिकाणी नागरी शिस्त वाढीस लागणे यांचा समावेश आहे.

महापौर रितू तावडे यांनी म्हटले आहे की, "रुग्णालयातील गर्दीचे प्रभावी व्यवस्थापन झाल्यास रुग्णसेवेचा दर्जा उंचावेल, स्वच्छता अधिक चांगली राखता येईल, कचरा कमी होईल आणि रुग्णालय परिसर निर्जंतुक ठेवणे सोपे जाईल. तसेच डॉक्टर आणि परिचारिकांना रुग्णांवर अधिक लक्ष केंद्रित करता येईल. मुंबईकरांना उच्च दर्जाची आरोग्यसेवा देण्यासाठी ही व्यवस्था अत्यंत उपयुक्त ठरेल."

What's Your Reaction?

Like Like 3
Dislike Dislike 0
Love Love 1
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 1
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.