‘मुव्ही ट्रॅप’ या अभिनव उत्पादनाचा शुभारंभ; डासजन्य आजार नियंत्रणासाठी महत्त्वाचे पाऊल

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘स्माईल कौन्सिल’च्या माध्यमातून ‘मुव्ही ट्रॅप’ या अभिनव उत्पादनाचा शुभारंभ करण्यात आला. या उपकरणामुळे डासांची उत्पत्ती रोखून मलेरिया, डेंग्यू यांसारख्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यास मदत होणार आहे.

Apr 17, 2026 - 21:45
 0  2
‘मुव्ही ट्रॅप’ या अभिनव उत्पादनाचा शुभारंभ; डासजन्य आजार नियंत्रणासाठी महत्त्वाचे पाऊल
मुव्ही ट्रॅप, BMC, मुंबई महानगरपालिका, डास नियंत्रण, मलेरिया, डेंग्यू, झिका, स्माईल कौन्सिल, स्टार्टअप, आरोग्य,

मुंबई प्रतिनिधी उदय कासारे 

मुंबई, दि. १७ एप्रिल २०२६ : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘सोसायटी फॉर मुंबई इनक्यूबेशन लॅब टू एंटरप्रेन्योरशिप (स्माईल) कौन्सिल’च्या माध्यमातून विकसित करण्यात आलेल्या ‘मुव्ही ट्रॅप’ या अभिनव उत्पादनाचा शुभारंभ करण्यात आला. डासांच्या उत्पत्तीला आळा घालून मलेरिया, डेंग्यू, झिका आणि चिकनगुनिया यांसारख्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे उपकरण उपयुक्त ठरणार असल्याचे मत अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) श्री. अविनाश ढाकणे यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाला पद्मश्री सन्मानित शास्त्रज्ञ प्रा. ए. पी. दाश, कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, प्रा. सुशांता कुमार घोष, डॉ. रजनी कांत, डॉ. शशी बाला, डॉ. रुजुता हाडये, कीटकनाशक अधिकारी रितेश मरापे आणि ‘मुव्ही ट्रॅप’चे निर्माते प्रसाद फडके यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

‘मुव्ही ट्रॅप’ हे उपकरण डासांच्या प्रजनन प्रक्रियेलाच आळा घालते. या ट्रॅपमध्ये पाणी आणि विशेष ‘ऍट्रॅक्टंट’ व सौम्य कीटकनाशक मिश्रण टाकल्यावर डासांची मादी त्याकडे आकर्षित होऊन अंडी घालते. मात्र, या पाण्यातील घटकांमुळे अंडी तत्काळ नष्ट होतात. परिणामी डासांची संख्या वाढण्यापूर्वीच नियंत्रणात येते.

हे उपकरण पर्यावरणपूरक असून यासाठी वीज लागत नाही. एकदा वापर केल्यावर ते सुमारे चार आठवडे प्रभावी राहते. त्यामुळे घरगुती स्तरावर डास नियंत्रणासाठी हा अत्यंत सोयीस्कर आणि सुरक्षित उपाय ठरतो.

महानगरपालिकेच्या ‘स्माईल कौन्सिल’मार्फत स्टार्टअप्सना प्रोत्साहन देऊन अशा अभिनव उपाययोजना विकसित केल्या जात आहेत. या उपक्रमामुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला मोठा हातभार लागणार असून भविष्यात डासजन्य आजारांच्या नियंत्रणासाठी हे उत्पादन महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0