विलेपार्ले स्थानक परिसरातील पदपथ रुंद करा; सांताक्रुझमधील अतिक्रमणे टप्प्याटप्प्याने हटवा!
मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी ‘पादचारी प्रथम’ अभियानांतर्गत पाहणी केली. विलेपार्ले स्थानक परिसरातील पदपथ रुंद करण्यासह सांताक्रुझमधील अतिक्रमणे टप्प्याटप्प्याने हटविण्याचे निर्देश.
प्रतिनिधी : नरेश शिंदे
‘पादचारी प्रथम’ अभियानांतर्गत आयुक्त अश्विनी भिडे यांची मुंबई व पश्चिम उपनगरांत पाहणी; रस्ते, स्वच्छता आणि आरोग्य सुविधांचा घेतला आढावा
मुंबई, दि. १४ ऑक्टोबर २०२६ : मुंबईतील पादचाऱ्यांना सुरक्षितपणे आणि अडथळ्यांविना चालता यावे, यासाठी विलेपार्ले रेल्वे स्थानक परिसरातील पदपथ रुंद करण्यासह सांताक्रुझ पश्चिम परिसरातील पदपथांवरील अतिक्रमणे टप्प्याटप्प्याने हटविण्याचे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले. ‘पादचारी प्रथम’ अभियान आणि कचरा साचण्याची संवेदनशील ठिकाणे निर्मूलन मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी त्यांनी १४ ऑक्टोबर रोजी मुंबई शहर आणि पश्चिम उपनगरांतील विविध ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी केली.
या दौऱ्यात पदपथांची स्थिती, रस्त्यांची स्वच्छता, अतिक्रमणे, कचरा संकलन व्यवस्था, सुविधायुक्त प्रसाधनगृहे आणि आरोग्य सुविधांचा आढावा घेण्यात आला. पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक सुधारणा तातडीने करण्याच्या सूचना आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
कचरा संकलन वाहनांची पाहणी
जी दक्षिण विभागातील सेनापती बापट मार्गावरील जी. एल. लोडर चौकी येथे आयुक्त अश्विनी भिडे यांनी कचरा संकलनासाठी वापरण्यात येणाऱ्या मोठ्या, मध्यम आणि लहान आकाराच्या वाहनांची पाहणी केली. कचऱ्याची वाहतूक करताना वाहनांवर योग्य आच्छादन कशा प्रकारे केले जाते, याची त्यांनी प्रात्यक्षिकाद्वारे माहिती घेतली. तसेच रस्त्यावरील धूळ साफ करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ब्रश आणि अन्य उपकरणांचीही माहिती जाणून घेतली.
पदपथांची दुरुस्ती आणि स्वच्छतेवर भर
वरळीतील आदर्शनगर मार्गावरील पदपथांची स्थिती आणि सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामांचा आयुक्तांनी आढावा घेतला. नागरिकांना पदपथांवरून सहज आणि सुरक्षितपणे चालता यावे, यासाठी आवश्यक सुधारणा करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांखाली साचणारा कचराही नियमितपणे साफ करावा, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले.
सांताक्रुझमधील अतिक्रमणे टप्प्याटप्प्याने हटविणार
सांताक्रुझ पश्चिम येथील टिळक मार्ग आणि महात्मा गांधी मार्गावरील पदपथांची पाहणी करताना आयुक्तांनी अतिक्रमणे हटवून पदपथ पादचाऱ्यांसाठी मोकळे करण्याच्या सूचना दिल्या. स्कायवॉकवरून खाली लोंबकळणाऱ्या केबल्स काढून टाकण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
अतिक्रमण निष्कासनाची कारवाई टप्प्याटप्प्याने करावी. तसेच रस्त्यांच्या दुभाजकांची नियमित स्वच्छता करून ते स्वच्छ आणि सुस्थितीत ठेवावेत, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.
वाकोला ते सांताक्रुझ स्थानकादरम्यान रस्ता विकसित करण्याचे नियोजन
एच पूर्व विभागातील पंडित जवाहरलाल नेहरू मार्गावर वाकोला जंक्शन ते सांताक्रुझ रेल्वे स्थानकादरम्यानचा रस्ता मंजूर ३६.६० मीटर (१२० फूट) रुंदीच्या रेषेनुसार विकसित करण्याचे प्रस्तावित आहे. या रस्ता रुंदीकरणासाठी लगतच्या मालमत्तांची खुली जागा संपादित करण्याच्या दृष्टीने एच पूर्व विभाग कार्यालयामार्फत २८ नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत.
रेल्वे स्थानक परिसरातील ८९ परवानाधारक गाळे जवळच्या परिसरात स्थलांतरित करण्याचे नियोजन आहे. याशिवाय, एच पूर्व विभागामार्फत २१ अनधिकृत गाळे निष्कासित करण्यात आले आहेत.
दरम्यान, एच पश्चिम विभागातील कान्हुबाई देसाई मार्गावरील ८६ अधिकृत गाळे, महात्मा गांधी मार्गावरील ८२ गाळे, ५० भाजीपाला विक्रेत्यांचे गाळे आणि लोकमान्य टिळक मार्गावरील १४ गाळे लवकरात लवकर स्थलांतरित करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.
शिरोडकर प्रसूतिगृहातील आरोग्य सुविधांचा आढावा
पाहणी दौऱ्यादरम्यान आयुक्त अश्विनी भिडे यांनी के दक्षिण विभागातील डॉ. व्ही. एन. शिरोडकर प्रसूतिगृहाला भेट देऊन आरोग्य सुविधांची तपासणी केली. प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांसाठी उपलब्ध असलेला औषधसाठा आणि इतर सोयीसुविधांचा त्यांनी आढावा घेतला.
प्रसूतिगृहात लवकरच कार्यान्वित होणाऱ्या नवजात शिशू अतिदक्षता विभागाचीही पाहणी करण्यात आली. रुग्णांच्या उपचारांशी संबंधित माहिती तसेच औषधसाठ्याची नोंद आणि व्यवस्थापनासाठी वापरण्यात येणारी संगणकीय प्रणाली कशा प्रकारे कार्य करते, याची माहिती आयुक्तांनी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून घेतली.
वरिष्ठ अधिकारी उपस्थित
या पाहणी दौऱ्यावेळी उपायुक्त प्रशांत गायकवाड, प्रशांत सपकाळे, किरण दिघावकर आणि विश्वास मोटे, तसेच सहायक आयुक्त स्वप्नजा क्षिरसागर, दिनेश पल्लेवाड, मृदुला अंडे आणि वनिता कोकाटे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.