बृहन्मुंबई महानगरपालिका माध्यमिक शाळांचा दहावीचा निकाल ९२.०८ टक्के

बृहन्मुंबई महानगरपालिका माध्यमिक शाळांचा दहावीचा (एसएससी) निकाल यंदा ९२.०८ टक्के लागला असून ७७ शाळांनी शंभर टक्के निकालाची कामगिरी केली आहे. स्वयं शेखर गोरेगावकर या विद्यार्थ्याने ९७.६० टक्के गुण मिळवत महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला.

May 8, 2026 - 21:34
May 10, 2026 - 01:26
 0  12
बृहन्मुंबई महानगरपालिका माध्यमिक शाळांचा दहावीचा निकाल ९२.०८ टक्के
बीएमसी एसएससी निकाल २०२६, मुंबई महानगरपालिका शाळा, दहावी

मुंबई प्रतिनिधी उदय कासारे 

बृहन्मुंबई महानगरपालिका माध्यमिक शाळांचा मार्च २०२६ मधील दहावी (एसएससी) परीक्षेचा निकाल ९२.०८ टक्के लागला आहे. यंदा महानगरपालिकेच्या २४६ माध्यमिक शाळांमधून १५ हजार ९०३ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. त्यापैकी १४ हजार ६४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे ७७ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला असून ६६ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवले आहेत.

महानगरपालिकेच्या जी दक्षिण विभागातील सीताराम मिल कंपाऊंड माध्यमिक शाळा येथील विद्यार्थी स्वयं शेखर गोरेगावकर याने ९७.६० टक्के गुण मिळवत महानगरपालिकेच्या सर्व शाळांमधून प्रथम क्रमांक पटकावला आहे.

तर के पश्चिम विभागातील डी. एन. नगर मुंबई पब्लिक स्कूल येथील विद्यार्थिनी अशिया जाकीर सय्यद हिने ९६.२० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला. तसेच प्रभादेवी मुंबई पब्लिक स्कूल येथील दीपक अरुण तिवारी आणि गोखले रोड मुंबई पब्लिक School येथील जिनल हरेश सुमेसरा यांनी ९५.८० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला आहे.

महानगरपालिकेच्या शाळांचा मागील चार वर्षांचा निकाल पाहता सातत्याने चांगली कामगिरी होत असल्याचे दिसून येते. मार्च २०२३ मध्ये ८४.७७ टक्के, मार्च २०२४ मध्ये ९१.५६ टक्के, मार्च २०२५ मध्ये ९२.९२ टक्के तर यंदा मार्च २०२६ मध्ये ९२.०८ टक्के निकाल लागला आहे.

या यशाबद्दल मुंबईच्या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर, महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे तसेच शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचे अभिनंदन केले आहे.

महानगरपालिका शिक्षण विभागामार्फत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावृद्धीसाठी ‘मिशन मेरिट’ सराव पुस्तिका, नियमित सराव परीक्षा, व्याख्यानमाला आणि दत्तक अधिकारी प्रणाली राबविण्यात येत असून त्याचा सकारात्मक परिणाम निकालात दिसून आल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

What's Your Reaction?

Like Like 4
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0