मुंबई महापालिका शाळांच्या गुणवंतांचा मुख्यालयात गौरव; एसएससी परीक्षेत ९२.०८ टक्के निकाल

मार्च २०२६ च्या एसएससी परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांतील गुणवंत विद्यार्थ्यांचा महापालिका मुख्यालयात गौरव करण्यात आला. महापालिका शाळांचा एकूण निकाल ९२.०८ टक्के लागला असून ७७ शाळांनी शंभर टक्के निकालाची नोंद केली आहे.

मुंबई महापालिका शाळांच्या गुणवंतांचा मुख्यालयात गौरव; एसएससी परीक्षेत ९२.०८ टक्के निकाल
मुंबई महापालिका शाळा निकाल, BMC SSC Result 2026

मुंबई प्रतिनिधी 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मार्च २०२६ मध्ये झालेल्या दहावी (एसएससी) परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन करणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांचा महापालिका मुख्यालयात गौरव करण्यात आला. शिक्षण समिती अध्यक्ष श्रीमती राजेश्री शिरवडकर आणि बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

महानगरपालिकेच्या २४६ माध्यमिक शाळांमधून यंदा १५ हजार ९०३ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. त्यापैकी १४ हजार ६४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून महापालिका शाळांचा सरासरी निकाल ९२.०८ टक्के लागला आहे. विशेष म्हणजे ७७ शाळांनी शंभर टक्के निकालाची कामगिरी नोंदवली आहे. तसेच ६६ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले आहेत.

जी दक्षिण विभागातील सीताराम मिल कंपाऊंड माध्यमिक शाळेचा विद्यार्थी स्वयं शेखर गोरेगावकर याने ९७.६० टक्के गुण मिळवत महापालिका शाळांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर के पश्चिम विभागातील डी. एन. नगर मुंबई पब्लिक स्कूलमधील अशिया जाकीर सय्यद हिने ९६.२० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला आहे.

याशिवाय प्रभादेवी मुंबई पब्लिक स्कूलमधील दीपक अरुण तिवारी आणि गोखले रोड मुंबई पब्लिक स्कूलमधील जिनल हरेश सुमेसरा यांनी प्रत्येकी ९५.८० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला आहे.

महापालिका मुख्यालयात आयोजित छोटेखानी समारंभात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शिक्षण समिती अध्यक्ष श्रीमती राजेश्री शिरवडकर आणि आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक केले. दहावीच्या अभ्यासाचे नियोजन, वेळेचे व्यवस्थापन आणि पुढील शिक्षणाची दिशा याबाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला.

गुणवंत विद्यार्थ्यांना यावेळी प्रेरणादायी पुस्तके आणि गुणपत्रक ठेवण्यासाठी विशेष फोल्डर भेट देण्यात आले. या कार्यक्रमाला शिक्षण समिती सदस्य, उप आयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर, शिक्षणाधिकारी श्रीमती सुजाता खरे, किर्तीवर्धन किरतकुडवे, मुख्याध्यापक, शिक्षक तसेच विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.