जनगणना २०२७ स्व-गणना प्रक्रियेला वेग; मिलिंद आणि मनीषा म्हैसकर यांनी केली ऑनलाइन नोंदणी
जनगणना २०२७ अंतर्गत सुरू असलेल्या स्व-गणना प्रक्रियेत अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर आणि मनीषा म्हैसकर यांनी एसई पोर्टलवर स्वतःची माहिती नोंदवून नागरिकांना मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन केले.
मुंबई, दि. ११ : जनगणना २०२७ अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या स्व-गणना प्रक्रियेत महसूल व वन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर आणि गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांनी संगणकाद्वारे एसई (Self Enumeration) पोर्टलवर स्वतःची माहिती नोंदवून प्रक्रियेला सुरुवात केली.
मंत्रालयातील दालनात झालेल्या या उपक्रमावेळी भारत सरकारच्या सहसचिव तथा राज्याच्या मुख्य प्रधान जनगणना अधिकारी डॉ. निरुपमा जे. डांगे आणि जनगणना कार्य संचालनालयाचे सहसंचालक संतोष पायस उपस्थित होते. यावेळी डॉ. डांगे यांच्या हस्ते मिलिंद म्हैसकर यांना स्मृतीचिन्ह देण्यात आले.
प्रथमच नागरिकांना स्व-गणनेची सुविधा
भारतीय जनगणनेच्या इतिहासात प्रथमच प्रत्येक नागरिकाला स्व-गणनेचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. या प्रक्रियेत नागरिक स्वतःची आणि कुटुंबाची माहिती वेब पोर्टलद्वारे ऑनलाइन नोंदवू शकतात.
महाराष्ट्रासाठी हे एसई पोर्टल १ मे २०२६ ते १५ मे २०२६ या कालावधीत कार्यरत राहणार आहे.
‘एसई आयडी’ देणे आवश्यक
जनगणना प्रगणक घरी भेट देतील, त्यावेळी स्व-गणनेद्वारे नोंदविलेल्या माहितीची पडताळणी आणि अंतिम सादरीकरणासाठी नागरिकांनी त्यांना स्व-गणना आयडी (SE ID) देणे आवश्यक असेल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
नागरिकांना सहभागाचे आवाहन
मिलिंद म्हैसकर आणि मनीषा म्हैसकर यांनी राज्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात स्व-गणना सुविधेचा वापर करून कुटुंबांची माहिती अचूक आणि कार्यक्षम पद्धतीने नोंदवावी, असे आवाहन केले.
तसेच डॉ. निरुपमा जे. डांगे यांनीही राज्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी जनगणना २०२७ च्या घरयादी आणि घरगणना प्रक्रियेत सहभागी होऊन देशव्यापी स्व-गणना मोहिमेला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन केले.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0