‘चला शाळेत जाऊया’ अभियानातून राज्यातील प्रत्येक शाळेत गुणवत्तापूर्ण बदल घडविणार; मंत्री दादाजी भुसे यांची घोषणा

राज्यातील प्रत्येक शाळेत स्वच्छता, शुद्ध पिण्याचे पाणी, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विद्यार्थीकेंद्रित वातावरण निर्माण करण्यासाठी ‘चला शाळेत जाऊया’ विशेष अभियान राबविण्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केली.

‘चला शाळेत जाऊया’ अभियानातून राज्यातील प्रत्येक शाळेत गुणवत्तापूर्ण बदल घडविणार; मंत्री दादाजी भुसे यांची घोषणा
चला शाळेत जाऊया अभियान, शालेय शिक्षण विभाग, दादाजी भुसे, महाराष्ट्र शाळा, गुणवत्तापूर्ण शिक्षण, शाळा स्वच्छता,

प्रतिनिधी: नरेश शिंदे 

मुंबई : राज्यातील प्रत्येक शाळेत स्वच्छता, शुद्ध पिण्याचे पाणी, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विद्यार्थीकेंद्रित वातावरण निर्माण करण्यासाठी राज्यभर ‘चला शाळेत जाऊया’ हे विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शाळांना भेटी देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घ्यावा आणि आवश्यक त्या सुधारणा घडवून आणाव्यात, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले.

मुंबईतील बालभवन येथे शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी आयोजित ‘शिक्षण संवाद’ या एकदिवसीय कार्यशाळेत मंत्री भुसे बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल, आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह यांच्यासह विभागातील सर्व संचालक, उपसंचालक आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकांतील नियोजनाचा परिणाम शाळांमध्ये दिसला पाहिजे

शिक्षण विभागाचे काम केवळ प्रशासकीय बैठका आणि आढाव्यांपुरते मर्यादित राहू नये, असे स्पष्ट करत मंत्री दादाजी भुसे यांनी अधिकारी, विद्यार्थी, शिक्षक, पालक, शाळा व्यवस्थापन समित्या आणि ग्रामस्थ यांच्याशी थेट संवाद साधण्यावर भर दिला.

बैठका आणि आढाव्यांमध्ये केलेल्या नियोजनाचे प्रतिबिंब प्रत्यक्ष शाळांमध्ये आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये दिसले पाहिजे. यासाठी राज्यातील आठही विभागांमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांची जिल्हानिहाय जबाबदारी निश्चित करून प्रत्येक जिल्ह्याचा स्वतंत्र आढावा घेण्यात येणार आहे.

वरिष्ठ अधिकारी चार दिवसांच्या विशेष दौऱ्यात विविध शाळांना भेटी देऊन प्रत्यक्ष परिस्थितीचे मूल्यांकन करतील. चांगले काम करणाऱ्या आणि सकारात्मक बदल घडवून आणणाऱ्या शाळांना विविध माध्यमांतून प्रोत्साहन दिले जाईल, असेही मंत्री भुसे यांनी सांगितले.

स्वच्छता, पिण्याचे पाणी आणि सुरक्षित इमारतींना प्राधान्य

शाळांमधील मूलभूत सुविधांमध्ये शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छ स्वच्छतागृहे, सुरक्षित इमारती आणि स्वच्छ परिसर यांना सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे, असे मंत्री भुसे यांनी स्पष्ट केले.

काही कामांसाठी मोठ्या निधीची आवश्यकता असली तरी अनेक सुधारणा लोकसहभाग आणि स्थानिक पातळीवरील पुढाकारातून तातडीने करता येऊ शकतात. शाळांची रंगरंगोटी, स्वच्छता आणि परिसर सुशोभीकरणासाठी समाजाचा सहभाग घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

बालवाटिका ते तिसरीपर्यंत मूलभूत कौशल्यांवर भर

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला सर्वाधिक महत्त्व देताना मंत्री भुसे यांनी बालवाटिका ते इयत्ता तिसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची वाचन, लेखन आणि गणितातील मूलभूत कौशल्ये भक्कम करण्यावर विशेष भर दिला.

प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांना अक्षरओळख, वाचन, लेखन तसेच बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार यांसारखी मूलभूत कौशल्ये आत्मसात झाली पाहिजेत, असे त्यांनी सांगितले.

शाळांच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण क्षेत्राला विशेष प्राधान्य दिले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

जिल्हा नियोजन आणि CSR निधीतून शाळांचा विकास

शाळांच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीचा निधी, विविध विकास योजना आणि कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (CSR) निधी यांच्या माध्यमातून आवश्यक संसाधने उपलब्ध करून देण्याचे निर्देश मंत्री भुसे यांनी अधिकाऱ्यांना दिले.

स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या विविध निधींचा प्रभावी वापर करून शाळांच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी अधिकाऱ्यांनी पाठपुरावा करावा, असे त्यांनी सांगितले.

पोषण आहार आणि गणवेशाच्या गुणवत्तेत तडजोड नाही

विद्यार्थ्यांना मिळणारा पोषण आहार, शालेय गणवेश आणि इतर विद्यार्थी सुविधांमध्ये कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा मंत्री भुसे यांनी दिला.

निकृष्ट दर्जाचा पुरवठा किंवा कोणत्याही प्रकारची अनियमितता आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले. विद्यार्थ्यांच्या हिताशी संबंधित बाबींमध्ये गुणवत्ता आणि पारदर्शकता राखण्यासाठी प्रभावी निरीक्षण व्यवस्था उभी करण्याची सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केली.

प्रत्येक शाळा शिक्षण विभागाच्या जबाबदारीचा भाग

राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, अनुदानित तसेच इतर माध्यमांच्या सर्व शाळा शिक्षण विभागाच्या जबाबदारीचा भाग असल्याचे मंत्री भुसे यांनी स्पष्ट केले.

चांगले काम करणाऱ्या शाळांचे अभिनंदन करून त्यांना प्रोत्साहन द्यावे, तर ज्या शाळांना सुधारणा आवश्यक आहेत, तेथे अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन सकारात्मक बदल घडवून आणावेत, असे निर्देश त्यांनी दिले.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण, एनसीसी, स्काऊट-गाईड, योग, क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रमांना चालना देण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

शिक्षण क्षेत्रात लोकचळवळ उभारण्याचे आवाहन

शाळा व्यवस्थापन समित्या, पालक आणि स्थानिक समुदायाचा सहभाग वाढवून शिक्षण क्षेत्रात लोकचळवळ उभी करण्याचे आवाहन मंत्री भुसे यांनी केले.

“शिक्षणाशिवाय पर्याय नाही”, त्यामुळे ‘ज्ञानमंदिरांचे सशक्तीकरण’ ही सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहोचविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष शाळा भेटींचे नियोजन करण्याच्या सूचना

प्रधान सचिव रणजीत सिंह देओल यांनी शाळा भेटीसाठी जाताना अधिकाऱ्यांनी अधिकाधिक शाळांना भेटी देता येतील, अशा पद्धतीने नियोजन करावे, अशी सूचना केली. शाळा तपासणीदरम्यान आवश्यक असलेली सर्व संबंधित माहिती सोबत बाळगावी, असेही त्यांनी सांगितले.

आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंह यांनी विद्यार्थी शाळेतून बाहेर पडल्यानंतर सक्षम झाला पाहिजे, हा शिक्षणाचा खरा अर्थ असल्याचे सांगितले. शाळांच्या सक्षमीकरणासाठी स्थानिक पातळीवरील विविध विभागांच्या निधीचा उपयोग करून घेण्यासाठी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी पाठपुरावा करावा, अशी सूचना त्यांनी केली.

कार्यशाळेत शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक तसेच विभागातील अधिकाऱ्यांनी आपले प्रत्यक्ष अनुभव मांडले. शाळांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध उपयुक्त सूचनाही यावेळी करण्यात आल्या.