चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांना राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरव
चंद्रपूर येथील शासकीय सामान्य रुग्णालयात कार्यरत असलेल्या उज्ज्वला महादेव सोयम यांना आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
नवी दिल्ली प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागात आरोग्यसेवेची ज्योत अखंड तेवत ठेवणाऱ्या चंद्रपूरच्या उज्ज्वला महादेव सोयम यांचा राष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस २०२६ निमित्त नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात आयोजित विशेष सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उज्ज्वला सोयम यांना प्रतिष्ठित राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार प्रदान करण्यात आला.
देशभरातील उत्कृष्ट सेवा देणाऱ्या निवडक १५ नर्सिंग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा, आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव तसेच आरोग्य सचिव पुण्य सलीला श्रीवास्तव उपस्थित होत्या.
चंद्रपूर येथील शासकीय सामान्य रुग्णालयात कार्यरत असलेल्या उज्ज्वला सोयम यांनी गेल्या २४ वर्षांपासून आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय आणि समर्पित सेवा बजावली आहे. विशेषतः नक्षल प्रभावित आणि आदिवासी भागांमध्ये आरोग्य जनजागृती, माता-बालक आरोग्य सेवा आणि कन्याभ्रूण हत्या रोखण्यासाठी त्यांनी सातत्याने काम केले आहे.
दुर्गम भागातील उच्च जोखमीच्या गर्भवती महिलांची काळजी घेणे, नवजात बालकांचे आरोग्य संवर्धन तसेच नैसर्गिक आपत्ती आणि कठीण भौगोलिक परिस्थितीतही आरोग्य सेवा अखंड सुरू ठेवण्यामध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
यंदाच्या आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवसाची संकल्पना “आमच्या परिचारिका, आमचे भविष्य: सक्षम परिचारिका जीव वाचवतात” (Our Nurses, Our Future: Empowered Nurses Save Lives) अशी ठेवण्यात आली होती. राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारामध्ये पदक, प्रमाणपत्र, प्रशस्तीपत्र आणि एक लाख रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येते.
उज्ज्वला सोयम यांच्या या यशामुळे चंद्रपूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राच्या आरोग्य क्षेत्राचा गौरव वाढला असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0