नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-१ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य कांस्य पुतळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक असलेला हा पुतळा विमानतळावरील प्रमुख आकर्षण ठरणार आहे.

Jun 6, 2026 - 23:43
 0  11
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती
छत्रपती शिवाजी महाराज, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ,

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती

नवी मुंबई, दि. ६ जून २०२६ : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-१ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात अनावरण करण्यात आले. महाराष्ट्राच्या इतिहासातील महान योद्धा आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतींना अभिवादन करणारा हा पुतळा विमानतळावरील प्रमुख आकर्षण ठरणार आहे.

या प्रसंगी वनमंत्री गणेश नाईक, महिला व बालविकास मंत्री अदिती सुनील तटकरे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच भूमिपुत्र स्वर्गीय दि. बा. पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक शंतनू गोयल, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे वरिष्ठ अधिकारी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थिती लावली.

नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड (NMIAL) यांच्या पुढाकारातून उभारण्यात आलेल्या या स्मारकात ८ फूट उंच चबूतऱ्यावर १२ फूट उंचीचा कांस्य धातूतील अर्धपुतळा (बस्ट) स्थापित करण्यात आला आहे. नवी मुंबईतील ‘आकार आर्ट अँड स्कल्पचर’चे प्रसिद्ध शिल्पकार नितीन रोहिदास गोर्डे यांनी हा पुतळा साकारला आहे. महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनालयाने मान्यता दिलेल्या प्रारूपानुसार कॉपर अलॉय ब्रॉन्झ (तांबे मिश्रित कांस्य) धातूपासून त्याची निर्मिती करण्यात आली आहे.

आठ महिन्यांहून अधिक कालावधीच्या परिश्रमातून साकारलेली ही कलाकृती छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, नेतृत्व आणि दूरदृष्टीचे प्रतीक म्हणून उभी राहणार आहे. विमानतळावर येणाऱ्या देशी-विदेशी प्रवाशांना महाराष्ट्राच्या समृद्ध इतिहासाची आणि सांस्कृतिक परंपरेची ओळख करून देणारे हे स्मारक ठरेल.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भविष्यातील जागतिक दर्जाचे वाहतूक केंद्र म्हणून विकसित होत असताना, छत्रपती शिवाजी महाराजांचा हा भव्य पुतळा महाराष्ट्राच्या अस्मितेचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक म्हणून प्रवाशांचे स्वागत करणार आहे. त्यामुळे हे ठिकाण केवळ वाहतूक केंद्र न राहता सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळखीचे महत्त्वपूर्ण केंद्र बनणार आहे.

What's Your Reaction?

Like Like 3
Dislike Dislike 0
Love Love 1
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 1