चुनाभट्टी परिसरात पावसाळापूर्वी कामे पूर्ण करण्याचे आदेश; पाणी साचू नये यासाठी उपाययोजनांवर भर

चुनाभट्टी रेल्वे स्थानक परिसरात पावसाळ्यात पाणी साचू नये यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने विविध उपाययोजना राबवण्याचे निर्देश दिले असून ३१ मे २०२६ पर्यंत रस्ते खुले करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Apr 16, 2026 - 22:37
 0  4
चुनाभट्टी परिसरात पावसाळापूर्वी कामे पूर्ण करण्याचे आदेश; पाणी साचू नये यासाठी उपाययोजनांवर भर
चुनाभट्टी पाणी समस्या, मुंबई पावसाळा तयारी,

मुंबई : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर चुनाभट्टी रेल्वे स्थानक परिसरात पाणी साचण्याची समस्या टाळण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी संबंधित विभागांना तातडीने कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. काँक्रिट ओतण्याची कामे १५ मे २०२६ पर्यंत पूर्ण करून सर्व रस्ते ३१ मे २०२६ पर्यंत वाहतुकीसाठी खुले करण्याचे आदेश त्यांनी दिले.

सन २०२४ मध्ये चुनाभट्टी परिसरात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचले होते. त्यानंतर २०२५ मध्ये महानगरपालिकेने विविध उपाययोजना केल्यामुळे संपूर्ण पावसाळ्यात केवळ एकदाच (१९ ऑगस्ट २०२५) पाणी साचल्याची नोंद झाली. या उपाययोजनांची पाहणी आयुक्तांनी केली.

हायवे सोसायटीच्या सखल भागातील पाणी उपसा करून सोमय्या नाल्यात सोडण्यात येते, तर रेल्वे हद्दीत उभारलेल्या जलसाठवण टाकीत साचलेले पाणी पर्जन्य जलवाहिनीद्वारे डंकन नाल्यात सोडले जाते. ही संपूर्ण यंत्रणा अधिक कार्यक्षम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

रेल्वे प्रशासनाने जलसाठवण टाकीपासून अतिरिक्त पाईपलाईन टाकून पाणी थेट सोमय्या नाल्यात सोडण्याचा प्रस्ताव मांडला असून, त्याची व्यवहार्यता तपासण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच केंद्रीय श्रम मंत्रालयाच्या संस्थेच्या हद्दीतून पर्जन्य जलवाहिनी टाकण्यासाठी आवश्यक परवानग्या मिळवण्यासाठी पाठपुरावा करण्यास सांगण्यात आले.

चुनाभट्टी रेल्वे स्थानकाबाहेर द्रुतगती मार्गालगत कार्यरत असलेल्या लघू उपसा केंद्राची (Mini Pumping Station) देखील आयुक्तांनी पाहणी केली. डंकन नाल्यातील पाणी येथे उपसा करून पुढे राहुलनगर नाल्यापर्यंत नेण्याची योजना असून, यामुळे परिसरातील पाण्याचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.

नाल्यांमधील गाळ काढण्याच्या कामात गुणवत्ता आणि पारदर्शकता राखण्याचे निर्देश देत अधिकाऱ्यांनी जबाबदारीने काम करावे, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

या पाहणी दौऱ्यावेळी उपायुक्त प्रशांत गायकवाड, विनायक विसपुते, गिरीश निकम, प्रमुख अभियंता राजेश मुळे, मंतय्या स्वामी, कल्पना राऊळ यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0