‘महाराष्ट्राला सर्वाधिक सुलभ शासकीय सेवा देणारे राज्य बनवा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विभागांना निर्देश

राज्यातील शासकीय सेवा अधिक सुलभ, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित करण्यासाठी गव्हर्नन्स प्रोसेस रि-इंजिनियरिंग (GPR) उपक्रमाला गती देण्यात आली आहे. १५ ऑगस्टपर्यंत सर्व विभागांनी आवश्यक शासन निर्णय काढून सेवा अंतिम चाचणीसाठी तयार ठेवाव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. यावेळी ‘डेटा ॲनालिटिक्स ॲज अ सर्व्हिस’ आणि ‘मिनी सेतू केंद्र’ या दोन डिजिटल प्रकल्पांचेही लोकार्पण करण्यात आले.

‘महाराष्ट्राला सर्वाधिक सुलभ शासकीय सेवा देणारे राज्य बनवा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विभागांना निर्देश
देवेंद्र फडणवीस, GPR, गव्हर्नन्स प्रोसेस रि-इंजिनियरिंग, महाराष्ट्र शासन, ई-गव्हर्नन्स,

मुंबई प्रतिनिधी : नरेश शिंदे 

मुंबई, दि. १६ : महाराष्ट्रातील शासकीय सेवा अधिक सुलभ, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या गव्हर्नन्स प्रोसेस रि-इंजिनियरिंग (GPR) उपक्रमाला अधिक गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. सर्व विभागांनी १५ ऑगस्टपर्यंत भरीव प्रगती करत आवश्यक शासन निर्णय निर्गमित करून सेवा अंतिम चाचणीसाठी तयार ठेवाव्यात, असे त्यांनी स्पष्ट केले.

सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली GPR उपक्रमाच्या तिसऱ्या टप्प्याचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मंत्रालयातील अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, प्रत्येक शासकीय सेवेचे नव्याने पुनरावलोकन करून अनावश्यक कागदपत्रांची संख्या कमी करणे, दुहेरी सेवा एकत्र करणे आणि कालबाह्य सेवांना समाप्त करणे आवश्यक आहे. नागरिकांना जलद आणि पारदर्शक सेवा मिळण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करत "महाराष्ट्राला सर्वाधिक सुलभ शासकीय सेवा देणारे राज्य" अशी ओळख निर्माण करावी.

१५ ऑगस्टपर्यंत पाचवा टप्पा पूर्ण करण्याचे निर्देश

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, GPR अंतर्गत प्रत्येक सेवेसाठी सहा टप्प्यांची प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये GPR अहवाल, मुख्यमंत्री कार्यालयाशी चर्चा, विभागीय मंजुरी, महाआयटीमार्फत तांत्रिक विकास, शासन निर्णय निर्गमित करणे आणि अंतिम चाचणी यांचा समावेश आहे. सर्व विभागांनी १५ ऑगस्टपर्यंत किमान पाचव्या टप्प्यापर्यंत म्हणजे शासन निर्णय निर्गमित करून सेवा अंतिम चाचणीसाठी तयार ठेवाव्यात, असे निर्देश त्यांनी दिले.

महाडीबीटी 2.0 आणि आपले सरकार 2.0 वर सर्व सेवा

राज्यातील सर्व शासकीय सेवा टप्प्याटप्प्याने महाडीबीटी 2.0, मैत्री आणि आपले सरकार 2.0 या डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्याचे काम सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. सेवा वितरणात कोणताही तांत्रिक अडथळा निर्माण होणार नाही, यासाठी माहिती तंत्रज्ञान विभागाने सक्षम यंत्रणा उभारून सर्व कामे निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करावीत, असेही त्यांनी सांगितले.

दोन महत्त्वाच्या डिजिटल प्रकल्पांचे लोकार्पण

बैठकीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'डेटा ॲनालिटिक्स ॲज अ सर्व्हिस' आणि 'मिनी सेतू केंद्र' या इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाच्या दोन महत्त्वपूर्ण प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, डेटा ॲनालिटिक्सचा प्रभावी वापर केल्यास प्रशासनातील उत्तरदायित्व वाढते, गैरव्यवहारांना आळा बसतो, शासनाचा निधी वाचतो आणि सेवा वितरण अधिक पारदर्शक होते.

गडचिरोलीत 'पोलीस दादालोरा खिडकी'चे 'सेतू केंद्रात' रूपांतर

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, गडचिरोली जिल्ह्यातील माओवादमुक्त भागांमध्ये कार्यरत 'पोलीस दादालोरा खिडकी'चे 'सेतू केंद्रात' रूपांतर करण्याचा निर्णय नागरिकाभिमुख प्रशासनाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या माध्यमातून दुर्गम भागातील नागरिकांना सर्व शासकीय सेवा प्रभावीपणे आणि एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्य शासनाच्या या उपक्रमामुळे शासकीय सेवा अधिक वेगवान, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख बनण्यास मदत होणार असून, डिजिटल प्रशासनाच्या दिशेने महाराष्ट्र आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत असल्याचे मानले जात आहे.