एक महिन्यात मराठी शिका, अन्यथा बॅज तीन महिन्यांसाठी निलंबित; परिवहन विभागाची कठोर भूमिका

महाराष्ट्रात व्यावसायिक प्रवासी वाहनचालकांना व्यवहारिक मराठीचे ज्ञान अनिवार्य करण्यात आले आहे. राज्यभर तपासणी मोहिमेत आतापर्यंत ४,२२२ चालकांची तपासणी करून ६६४ चालकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.

Aug 21, 2026 - 01:48
 0  8
एक महिन्यात मराठी शिका, अन्यथा बॅज तीन महिन्यांसाठी निलंबित; परिवहन विभागाची कठोर भूमिका
व्यवहारिक मराठी, वाहनचालक मराठी, परिवहन विभाग, प्रताप सरनाईक, चालक बॅज निलंबन, व्यावसायिक वाहनचालक

प्रतिनिधी : नरेश शिंदे 

मुंबई, दि. २० : महाराष्ट्रात व्यावसायिक प्रवासी वाहने चालविणाऱ्या चालकांना प्रवाशांशी सुसंवाद साधता यावा आणि प्रवाशांच्या सोयी-सुरक्षेला अधिक महत्त्व मिळावे, यासाठी व्यवहारिक मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्यात आले आहे. या नियमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी परिवहन विभागाकडून राज्यभर तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.

तपासणीदरम्यान ज्या चालकांना व्यवहारिक मराठीचे पुरेसे ज्ञान नसल्याचे आढळून येईल, त्यांना नोटीस बजावून एक महिन्याच्या कालावधीत मराठी भाषा शिकण्याची संधी दिली जाणार आहे. या मुदतीतही चालकाने मराठीचे आवश्यक ज्ञान आत्मसात केले नाही, तर संबंधित चालकाचा बॅज तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

राज्यभर ४,२२२ चालकांची तपासणी

राज्यात सुरू असलेल्या तपासणी मोहिमेत आतापर्यंत ४,२२२ व्यावसायिक वाहनचालकांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी ६६४ चालकांना व्यवहारिक मराठीचे पुरेसे ज्ञान नसल्याचे आढळून आल्याने त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

तर मुंबई महानगर क्षेत्रात झालेल्या तपासणीत ३,९९५ वाहनचालकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ६०४ चालकांना व्यवहारिक मराठीचे पुरेसे ज्ञान नसल्याचे आढळून आले असून, त्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.

मराठी शिकण्यासाठी दिली जाणार संधी

परिवहन विभागाच्या तपासणी मोहिमेचा उद्देश केवळ कारवाई करणे नसून चालकांना व्यवहारिक मराठी शिकण्यासाठी संधी उपलब्ध करून देणे हा देखील आहे. नोटीस मिळाल्यानंतर संबंधित चालकाला एक महिन्याचा कालावधी देण्यात येणार आहे.

या कालावधीत चालकाने प्रवाशांशी दैनंदिन व्यवहारात आवश्यक असलेले मराठी भाषेचे ज्ञान आत्मसात करणे अपेक्षित आहे. मात्र, निर्धारित कालावधीनंतरही नियमांचे पालन न केल्यास बॅज निलंबनाची कारवाई केली जाणार आहे.

‘मराठी येणे प्रवाशांच्या सोयी-सुरक्षेशी संबंधित’

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, “महाराष्ट्रात व्यवसाय करून प्रवाशांशी थेट संवाद साधणाऱ्या व्यावसायिक वाहनचालकांना व्यवहारिक मराठी येणे ही केवळ नियमांची बाब नाही, तर प्रवाशांच्या सोयी-सुरक्षेशी संबंधित बाब आहे.”

चालकांना मराठी शिकण्यासाठी पुरेसा कालावधी दिला जात आहे. त्यामुळे या संधीचा लाभ घेऊन चालकांनी आवश्यक मराठी भाषा आत्मसात करावी. मात्र, दिलेल्या मुदतीनंतरही नियमाचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले.

३० सप्टेंबरपर्यंत राज्यभर तपासणी

परिवहन विभागाची ही विशेष तपासणी मोहीम ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे. तपासणीदरम्यान व्यावसायिक प्रवासी वाहनचालकांचे व्यवहारिक मराठी भाषेचे ज्ञान तपासण्यात येणार आहे.

मराठीचे आवश्यक ज्ञान नसलेल्या चालकांना प्रथम सुधारणा करण्याची संधी दिली जाणार आहे. मात्र, त्यानंतरही निर्धारित नियमांचे पालन न करणाऱ्या चालकांविरोधात विहित मुदतीनंतर बॅज निलंबनाची कारवाई केली जाणार आहे.

या निर्णयामुळे महाराष्ट्रात प्रवासी आणि व्यावसायिक वाहनचालक यांच्यातील संवाद अधिक सुलभ होऊन प्रवाशांना दैनंदिन प्रवासात भाषिक अडचणी कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा परिवहन विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.