अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाई करा; आयुक्त डॉ. अश्विनी भिडे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

महानगरपालिका आयुक्त डॉ. अश्विनी भिडे यांनी मान्सूनपूर्व तयारीचा सविस्तर आढावा घेत अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे आणि नियमबाह्य विकासकामांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. खड्डेमुक्त रस्ते, नालेसफाई, पावसाळी आजारांचे नियंत्रण आणि प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनावरही त्यांनी भर दिला.

Jun 26, 2026 - 02:19
 0  10
अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाई करा; आयुक्त डॉ. अश्विनी भिडे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
अश्विनी भिडे, अनधिकृत बांधकामे, महानगरपालिका, मान्सूनपूर्व तयारी,

मुंबई प्रतिनिधी: संदीप गिरकर 

मुंबई : महानगरपालिका आयुक्त डॉ. अश्विनी भिडे यांनी मान्सूनपूर्व तयारी तसेच विविध नागरी विकासकामांचा सविस्तर आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. यावेळी खड्डेमुक्त रस्ते, पावसाचे पाणी साचणाऱ्या ठिकाणांचे व्यवस्थापन, नालेसफाई, रस्ते विकासकामे, अपघातप्रवण व वाहतूक कोंडीची ठिकाणे, धोकादायक इमारतींवरील प्रतिबंधात्मक कारवाई आणि पावसाळी साथीच्या आजारांच्या नियंत्रणासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी घेतली.

यासोबतच प्रकल्पबाधित नागरिकांच्या (P.A.P.) पुनर्वसन कार्यवाहीचाही त्यांनी सविस्तर आढावा घेतला.

बैठकीत आयुक्त भिडे यांनी अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांबाबत अत्यंत कठोर भूमिका घेतली. कोणतीही हयगय न करता अनधिकृत बांधकामांवर प्रभावी कारवाई करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. विकास नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या बांधकामांवर तात्काळ कारवाई करून ती निष्कासित करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

अधिकाऱ्यांनी नियमित क्षेत्र पाहणी करून संभाव्य नियमभंगाची सुरुवातीलाच नोंद घ्यावी आणि वेळेत प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असे त्यांनी सांगितले. अनधिकृत बांधकामांविरोधातील कारवाईत दिरंगाई, निष्काळजीपणा किंवा प्रशासकीय दुर्लक्ष सहन केले जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.

तसेच नियमबाह्य बांधकामांना प्रोत्साहन देणाऱ्या किंवा जाणूनबुजून दुर्लक्ष करणाऱ्या संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून आवश्यक प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांच्या सुरक्षिततेसह नियोजित आणि शिस्तबद्ध नागरी विकासासाठी अनधिकृत बांधकामांविरोधातील मोहीम सातत्याने आणि प्रभावीपणे राबविण्यावर भर देण्याचे निर्देश त्यांनी दिले.

या बैठकीस उपायुक्त (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) प्रशांत गायकवाड, उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे, उपायुक्त (परिमंडळ ७) मनीष वळंजू, सहायक आयुक्त योगेश त्रिवेदी, सहायक आयुक्त आरती गोळेकर, सहायक आयुक्त प्रफुल तांबे, प्रमुख वैद्यकीय अधिकारी (प्रभारी) डॉ. नितिराज माने, वैद्यकीय अधिकारी (प्रभारी) डॉ. अजय गुप्ता यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0