विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करा : चंद्रकांतदादा पाटील

वांद्रे येथील डॉ. बळीराम हिरे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या फसवणूक प्रकरणाची गंभीर दखल घेत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दोषी संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित जपण्यासाठी कठोर कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत.

May 7, 2026 - 20:51
May 10, 2026 - 01:27
 0  10
विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करा : चंद्रकांतदादा पाटील
चंद्रकांतदादा पाटील, विद्यार्थी फसवणूक,

मुंबई, दि. ७ : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचे संरक्षण करणे ही शासनाची सर्वोच्च प्राथमिकता असून विद्यार्थ्यांची फसवणूक आणि त्यांचे शैक्षणिक नुकसान कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही. विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करा, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रशासनाला दिले.

वांद्रे, मुंबई येथील डॉ. बळीराम हिरे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या फसवणूक प्रकरणाची गंभीर दखल घेत मंत्री पाटील यांनी संबंधित दोषी संस्थांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. या महाविद्यालयात १३२ हून अधिक विद्यार्थ्यांना बोगस अभ्यासक्रम आणि पदव्या देऊन फसविण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणाचा सविस्तर आढावा घेताना मंत्री पाटील यांनी सांगितले की, मान्यताप्राप्त वास्तुशास्त्र अभ्यासक्रमाच्या नावाखाली विद्यापीठ अनुदान आयोगाची (UGC) मान्यता नसलेला अभ्यासक्रम सुरू करून विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित संस्थेविरुद्ध विद्यापीठ कायद्यातील तरतुदींनुसार कठोर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले.

तसेच महाराष्ट्र राज्य कृषि, पशु व मत्स्य विज्ञान, आरोग्य विज्ञान, उच्च, तंत्र व व्यवसाय शिक्षण क्षेत्रातील अनधिकृत संस्था आणि अभ्यासक्रम (प्रतिबंध) अधिनियम २०१३ अंतर्गतही कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

विद्यार्थ्यांना खोटी आमिषे दाखवून अथवा संस्था मान्यताप्राप्त असल्याचा भास निर्माण करून प्रवेश घेण्यास प्रवृत्त केले जाते आणि नंतर विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे उघड होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी कोणत्याही संस्थेत प्रवेश घेण्यापूर्वी संबंधित अभ्यासक्रमाची मान्यता तपासून घ्यावी, असे आवाहनही मंत्री पाटील यांनी केले.

“उच्च शिक्षण संचालनालय, तंत्रशिक्षण संचालनालय किंवा संबंधित सक्षम प्राधिकरणांच्या अधिकृत संकेतस्थळावर संस्थेचे नाव आणि अभ्यासक्रमाची मान्यता तपासूनच प्रवेश घ्यावा,” असे त्यांनी स्पष्ट केले.

भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी विभागाने विशेष कार्यप्रणाली विकसित करण्याचे निर्देशही बैठकीत देण्यात आले. तसेच वांद्रे येथील डॉ. बळीराम हिरे महाविद्यालयातील १३२ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी नवीन शैक्षणिक धोरण २०२० मधील ‘रिकग्निशन ऑफ प्रायर लर्निंग’ या तरतुदीचा अभ्यास करून विद्यार्थ्यांचे हित जपण्याच्या सूचना महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन परिषदेला देण्यात आल्या.

या बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी, तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 4
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.