जागतिक अर्थव्यवस्थेतील भारताची वाढती भूमिका प्रशंसनीय; सायप्रसचे राष्ट्रपती निकोस क्रिस्टोडोलाइड्स यांचे गौरवोद्गार

सायप्रसचे राष्ट्रपती निकोस क्रिस्टोडोलाइड्स यांनी मुंबईतील नॅशनल स्टॉक एक्सचेंज कार्यक्रमात भारताच्या आर्थिक प्रगतीचे आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील वाढत्या भूमिकेचे कौतुक केले. भारत-सायप्रस आर्थिक, व्यापार आणि गुंतवणूक संबंध अधिक दृढ करण्यावर त्यांनी भर दिला.

May 22, 2026 - 05:38
 0  2
जागतिक अर्थव्यवस्थेतील भारताची वाढती भूमिका प्रशंसनीय; सायप्रसचे राष्ट्रपती निकोस क्रिस्टोडोलाइड्स यांचे गौरवोद्गार
निकोस क्रिस्टोडोलाइड्स, भारत सायप्रस संबंध, भारत अर्थव्यवस्था

मुंबई, दि. २१ : सायप्रस आणि भारतामधील आर्थिक तसेच धोरणात्मक संबंध नव्या उंचीवर पोहोचत असून भारताचे आर्थिक सामर्थ्य, नाविन्यता आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील वाढती भूमिका अत्यंत प्रशंसनीय असल्याचे गौरवोद्गार सायप्रस प्रजासत्ताकचे राष्ट्रपती निकोस क्रिस्टोडोलाइड्स यांनी काढले.

मुंबईतील बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) येथे आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय शेअर बाजाराचे अध्यक्ष श्रीनिवास इंजेटी आणि व्यवस्थापकीय संचालक आशिष कुमार चौहान व्यासपीठावर उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान राष्ट्रपती निकोस क्रिस्टोडोलाइड्स यांच्या हस्ते नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये पारंपरिक घंटानाद करण्यात आला.

यावेळी बोलताना राष्ट्रपती क्रिस्टोडोलाइड्स यांनी सांगितले की, सायप्रस हा युरोपियन महासंघ आणि युरोझोनमधील महत्त्वाचा सदस्य देश असून सध्या युरोपियन महासंघाच्या परिषदेचे अध्यक्षपद सायप्रसकडे आहे. या कार्यकाळात भारत आणि युरोपियन महासंघ यांच्यातील संबंध अधिक बळकट करण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे.

सायप्रसच्या अध्यक्षपदाच्या सुरुवातीच्या काळातच भारत आणि युरोपियन महासंघ यांच्यात मुक्त व्यापार करारावर सहमती झाल्याचा उल्लेख करत त्यांनी भारत-युरोप संबंध अधिक मजबूत करण्यासाठी सायप्रस महत्त्वाचा दुवा म्हणून कार्य करत असल्याचे सांगितले.

ते म्हणाले की, भारत, युरोप, पूर्व भूमध्य समुद्र आणि मध्य पूर्व या प्रदेशांना जोडणारा सायप्रस हा एक नैसर्गिक पूल ठरत आहे. त्यामुळे व्यापार, गुंतवणूक आणि आर्थिक सहकार्य वाढीस मोठी संधी निर्माण होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागील वर्षीच्या सायप्रस दौऱ्याचा उल्लेख करत राष्ट्रपती म्हणाले की, वित्तीय सेवा, तंत्रज्ञान, नाविन्यता, शिपिंग, कनेक्टिव्हिटी आणि ऊर्जा या क्षेत्रांमध्ये भारत आणि सायप्रस यांच्यात अधिक मजबूत संबंध निर्माण करणे हा सध्याच्या द्विपक्षीय दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे.

मागील वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सायप्रस भेटीदरम्यान ‘सायप्रस स्टॉक एक्सचेंज’ आणि ‘एनएसई इंटरनॅशनल एक्स्चेंज’ यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती. हा करार दोन्ही देशांमधील आर्थिक आणि गुंतवणूक संबंध दृढ करण्यासाठी महत्त्वाचा टप्पा ठरल्याचे त्यांनी सांगितले.

या सहकार्यामुळे भारतीय आणि युरोपियन वित्तीय व्यवस्थांमध्ये अधिक सुलभता निर्माण होईल तसेच गुंतवणुकीसाठी नवीन मार्ग खुले होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असून युरोप ही स्थिर आणि मोठी बाजारपेठ आहे. या दोन मोठ्या लोकशाही व्यवस्था एकत्र आल्यास सुमारे दोन अब्ज लोकांची व्यापक बाजारपेठ निर्माण होईल आणि भविष्यात दोन्ही बाजूंना मोठ्या संधी उपलब्ध होतील, असेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय शेअर बाजाराचे अध्यक्ष श्रीनिवास इंजेटी यांनी केले. त्यांनी राष्ट्रीय शेअर बाजारातील भांडवली गुंतवणूक तसेच भारत-सायप्रसमधील गुंतवणूक संधींवर प्रकाश टाकला.

कार्यक्रमाची सुरुवात भारत आणि सायप्रसच्या राष्ट्रगीताने झाली. यावेळी सायप्रसच्या प्रतिनिधी मंडळातील मंत्री, सदस्य तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराचे अधिकारी उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0