डॉ. चित्तरंजन पुरंदरे यांचे वैद्यकीय क्षेत्रातील योगदान प्रेरणादायी; छगन भुजबळांकडून गौरवोद्गार
पाच दशकांहून अधिक काळ वैद्यकीय क्षेत्रात योगदान देणारे प्रा. डॉ. चित्तरंजन पुरंदरे यांचा मुंबईत गौरव सोहळा पार पडला. यावेळी त्यांच्या ‘हँड्स दॅट हील्ड, अ हार्ट दॅट लेड’ या आत्मचरित्राचे प्रकाशन करण्यात आले.
प्रतिनिधी: देवानंद शिंदे
मुंबई, दि. 29 : वैद्यकीय क्षेत्रात पाच दशकांहून अधिक काळ निःस्वार्थ सेवा बजावत हजारो रुग्णांचे प्राण वाचविणारे, अनेक वैद्यकीय विद्यार्थ्यांना घडविणारे आणि वैद्यकीय संशोधनाला नवी दिशा देणारे प्रा. डॉ. चित्तरंजन पुरंदरे यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी काढले.
महिला आरोग्य आणि प्रसूतीशास्त्र क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या प्रा. डॉ. सी. एन. पुरंदरे यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे विशेष गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांच्या जीवनप्रवासावर आधारित ‘हँड्स दॅट हील्ड, अ हार्ट दॅट लेड’ या आत्मचरित्राचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
रुग्णसेवा, अध्यापन आणि संशोधनाचा अनोखा संगम
डॉ. पुरंदरे हे केवळ उत्कृष्ट चिकित्सक नसून शिक्षक आणि संशोधक म्हणूनही त्यांनी भरीव योगदान दिले आहे. आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये त्यांचे 140 हून अधिक संशोधनपर लेख प्रसिद्ध झाल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
आत्मचरित्र म्हणजे केवळ केलेल्या कामांची यादी नसते, तर तो एका काळाचा इतिहास असतो. ज्ञान, संशोधन आणि कौशल्यांचा उपयोग समाजसेवेसाठी झाला पाहिजे, असा प्रेरणादायी संदेश डॉ. पुरंदरे यांच्या जीवनप्रवासातून मिळतो. त्यांचा जीवनप्रवास तरुणांसाठी मार्गदर्शक ठरेल, असेही भुजबळ यांनी नमूद केले.
महिला आरोग्य क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी डॉ. पुरंदरे यांच्या कार्याचे कौतुक केले. त्यांचे कार्य केवळ रुग्णांवरील उपचारांपुरते मर्यादित नसून, महिला आरोग्याबाबत समाजात जागरूकता निर्माण करणारे आहे, असे त्यांनी सांगितले.
डॉ. पुरंदरे यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा आणि सेवाभावी वृत्तीचा लाभ असंख्य रुग्णांना झाला आहे. नव्या पिढीतील वैद्यकीय विद्यार्थ्यांनी त्यांच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी, असे आवाहनही लोढा यांनी केले.
जगभरात निर्माण केली ओळख
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी डॉ. पुरंदरे यांनी आपल्या कार्यातून जगभरात ओळख निर्माण केल्याचे सांगितले. त्यांच्या आत्मचरित्रातून त्यांच्या जीवनातील विविध पैलू समोर येतील, असे नमूद करत त्यांनी पुरंदरे कुटुंबाशी असलेल्या ऋणानुबंधांनाही उजाळा दिला.
खासदार सुप्रिया सुळे यांनीही डॉ. पुरंदरे यांच्या कार्याचे कौतुक केले. महिला आरोग्यासाठी काम करताना त्यांनी रुग्णसेवा, वैद्यकीय शिक्षण आणि सामाजिक बांधिलकी यांचा प्रभावी समन्वय साधला. महिलांच्या आरोग्याकडे संवेदनशीलतेने पाहण्याची दृष्टी समाजात रुजविण्यात त्यांचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले.
‘पुरंदरे तंत्रा’ला आंतरराष्ट्रीय मान्यता
यावेळी आपल्या मनोगतात डॉ. चित्तरंजन पुरंदरे यांनी वैद्यकीय क्षेत्रातील आपल्या कामाचा अनुभव मांडला. महिलांच्या आरोग्यसेवेसाठी काम करण्याची संधी मिळणे, तरुण डॉक्टर घडवणे आणि मातामृत्यू रोखण्याच्या प्रयत्नांत योगदान देता येणे, ही आपल्या कारकीर्दीतील समाधानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
गर्भाशयातील उपचारपद्धती, गर्भशस्त्रक्रिया तसेच गर्भाशयमुखाच्या कर्करोगावरील शस्त्रक्रियात्मक उपचारांमध्ये त्यांनी विविध नवे प्रयोग केले. त्यापैकी काही सुधारित उपचारपद्धतींना आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली असून त्या ‘पुरंदरे तंत्र’ म्हणून ओळखल्या जाऊ लागल्याचे डॉ. पुरंदरे यांनी सांगितले.
‘हँड्स दॅट हील्ड, अ हार्ट दॅट लेड’चे प्रकाशन
कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते डॉ. चित्तरंजन पुरंदरे यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला. त्यांच्या दीर्घ वैद्यकीय कारकीर्दीचा आणि सामाजिक योगदानाचा गौरव यावेळी करण्यात आला.
तसेच डॉ. पुरंदरे यांच्या जीवनप्रवासावर आधारित ‘हँड्स दॅट हील्ड, अ हार्ट दॅट लेड’ या आत्मचरित्राचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर, डॉ. पुरंदरे यांचे कुटुंबीय आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.