माजी सैनिक व त्यांच्या पाल्यांचा होणार सन्मान; 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
कोल्हापूर जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिक विधवा व त्यांच्या पाल्यांच्या विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरीचा धनराशी व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात येणार असून, अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 15 सप्टेंबर 2026 आहे.
कोल्हापूर प्रतिनिधी | उमेश जाधव
कोल्हापूर, दि. 29 (जिमाका) : जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिक विधवा तसेच त्यांच्या पाल्यांनी विविध क्षेत्रांत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव धनराशी व प्रशस्तीपत्र देऊन करण्यात येणार आहे. या सन्मानासाठी पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह 15 सप्टेंबर 2026 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांमध्ये पुरस्कार प्राप्त केलेले खेळाडू, साहित्य, संगीत, गायन, नृत्य, वादन आदी क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करून पुरस्कार मिळविणारे तसेच यशस्वी उद्योजक आणि संगणक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक व माजी सैनिक विधवांचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे.
तसेच पूर, जळीत, दरोडा, अपघात आणि इतर नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी उल्लेखनीय व धाडसी कार्य करणाऱ्या माजी सैनिक व माजी सैनिक विधवांच्या कार्याचाही गौरव करण्यात येणार आहे.
याशिवाय, शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये इयत्ता दहावीच्या परीक्षेत 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणारे तसेच इयत्ता बारावीच्या परीक्षेत 85 टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त करणारे माजी सैनिक किंवा माजी सैनिक विधवांचे पाल्य यांचाही सन्मान करण्यात येणार आहे.
पदवी अथवा पदव्युत्तर परीक्षेत संबंधित विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविणारे माजी सैनिक, त्यांच्या पत्नी अथवा पाल्य यांचाही या सन्मान उपक्रमांतर्गत गौरव करण्यात येणार आहे.
इच्छुक व पात्र लाभार्थ्यांनी त्यांच्या संबंधित कार्याची प्रमाणपत्रे, गुणपत्रिका, सैन्य सेवा पुस्तक तसेच माजी सैनिक किंवा माजी सैनिक विधवा ओळखपत्रासह अर्ज 15 सप्टेंबर 2026 पर्यंत स्वतः उपस्थित राहून जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे सादर करावेत.
अर्ज पोस्टाने स्वीकारले जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी विहित मुदतीपूर्वी आवश्यक कागदपत्रांसह प्रत्यक्ष कार्यालयात अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0