हिमोफिलीया उपचारासाठी एका महिन्यात तज्ज्ञ समिती स्थापन करण्याचे मंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

राज्यातील हिमोफिलीया रुग्णांच्या उपचारासाठी एका महिन्यात राज्यस्तरीय तज्ज्ञ समिती स्थापन करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. राज्यात ५ हजार ४९७ हिमोफिलीया रुग्णांची नोंद असून प्रत्येक जिल्ह्यात डे-केअर सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहेत.

May 13, 2026 - 22:48
 0  3
हिमोफिलीया उपचारासाठी एका महिन्यात तज्ज्ञ समिती स्थापन करण्याचे मंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश
हिमोफिलीया, प्रकाश आबिटकर, आरोग्य विभाग, हिमोफिलीया उपचार, डे-केअर सेंटर, महाराष्ट्र आरोग्य विभाग,

मुंबई, दि. १३ :

हिमोफिलीया रुग्णांचे ऑनलाईन पोर्टलद्वारे ट्रॅकिंग करून त्यांना देण्यात येणाऱ्या उपचारांची अद्ययावत नोंद ठेवावी तसेच एका महिन्याच्या आत हिमोफिलीयासाठी राज्यस्तरीय तज्ज्ञ समिती स्थापन करावी, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई येथे आयोजित हिमोफिलीया रुग्णांच्या उपचारासंदर्भातील आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी मंत्री प्रकाश आबिटकर यांनी गुजरात, जम्मू-काश्मीर, केरळ आणि कर्नाटक यांसह इतर राज्यांमध्ये हिमोफिलीया संदर्भात राबविण्यात येणाऱ्या धोरणांचा अभ्यास करण्याच्या सूचना दिल्या. तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या (NHM) पीआयपी वार्षिक कार्यक्रम कृती आराखड्यात हिमोफिलीया आजारासाठी निधी मिळावा यासाठी प्रस्ताव पाठविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

राज्यात हिमोफिलीया रुग्णांना तातडीने आणि प्रभावी उपचार मिळावेत यासाठी प्रत्येक जिल्ह्यात डे-केअर सेंटर कार्यान्वित करण्यात आले असून राज्यात सध्या एकूण ५ हजार ४९७ हिमोफिलीया रुग्णांची नोंद आहे.

हिमोफिलीया आजाराचे कमी तीव्र, मध्यम तीव्र आणि तीव्र असे वर्गीकरण करण्यात आले असून मध्यम व तीव्र स्वरूपाच्या रुग्णांमध्ये अचानक रक्तस्त्राव होण्याचा धोका अधिक असतो. अशा रुग्णांना तातडीने निदान, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील सामाईक डे-केअर सेंटर अद्ययावत करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

तसेच रुग्णांचा डाटा एकत्रित करून या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी व्यापक उपाययोजना राबविण्याची आवश्यकता असल्याचेही मंत्री आबिटकर यांनी नमूद केले.

या बैठकीस खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार उमा गिरीश खापरे, आरोग्य विभागाचे सचिव ई. रवींद्रन, आरोग्य विभागाच्या आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, नागरी अभियान आयुक्त डॉ. सुनील भोकरे, संचालक डॉ. विजय कंदेवाड तसेच हिमोफिलिया सोसायटीचे प्रतिनिधी आणि आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0