शब्द, सूर अन् आठवणींचा सुरेल मंगेशकरी आविष्कार; ‘गाणी मंगेशकरांची’ मैफलीने पिंपरी चिंचवडकर रसिक मंत्रमुग्ध

पिंपरी चिंचवडमध्ये ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’निमित्त पं. हृदयनाथ मंगेशकर प्रस्तुत ‘गाणी मंगेशकरांची’ मैफल रंगली. गीतांच्या निर्मितीमागील आठवणी, रंजक किस्से आणि सुरेल सादरीकरणाने प्रेक्षागृह भारावले.

शब्द, सूर अन् आठवणींचा सुरेल मंगेशकरी आविष्कार; ‘गाणी मंगेशकरांची’ मैफलीने पिंपरी चिंचवडकर रसिक मंत्रमुग्ध
गाणी मंगेशकरांची, पं. हृदयनाथ मंगेशकर, अभिजात मराठी भाषा सप्ताह, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, लता मंगेशकर, आशा भोसले, शांता शेळके, सुरेश भट, विभावरी आपटे जोशी, मराठी भाषा, मराठी संगीत, पिंपरी

प्रतिनिधी: रोहन सोनाळे 

पिंपरी, दि. ४ ऑक्टोबर २०२६ : शब्दांमधील भाव जाणून त्यांना सुरांची साथ देत जन्माला आलेली अजरामर गाणी आणि त्या गीतांच्या निर्मितीमागील असंख्य आठवणी, रंजक किस्से आणि सांगीतिक अनुभवांचा अनोखा मिलाफ पिंपरी चिंचवडकर रसिकांना अनुभवायला मिळाला. पं. हृदयनाथ मंगेशकर प्रस्तुत ‘गाणी मंगेशकरांची’ या विशेष सांगीतिक मैफलीने प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह सुरांनी भारून गेले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’ अंतर्गत या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अभिजात मराठी भाषेचा जागर घडविणे तसेच मराठी भाषेचे संवर्धन, प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने ३ ते ९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली, विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड यांच्या अधिपत्याखाली हा सप्ताह साजरा होत आहे.

मंगेशकरी सुरांनी रंगली अविस्मरणीय मैफल

पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेल्या लोकप्रिय गीतांच्या सादरीकरणाने संपूर्ण प्रेक्षागृह सुरांच्या भावविश्वात रंगून गेले. ‘माझ्या सारंगा’, ‘गोमू माझ्या तू संगतीने’, ‘सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या’, ‘चांदण्यात फिरताना’, ‘धरला तू माझा हात’, ‘मी डोलकर डोलकर’, ‘डोलकर दर्याचा राजा’, ‘घर पाण्यावरी’, ‘बंदराला करतो ये-जा’, ‘माझे रानी, माझे मोगा’, ‘तुजे डोळ्यांत शोधता ठाव’ आणि ‘मोगरा फुलला’ अशा लोकप्रिय गीतांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.

या गीतांचे सादरीकरण जितके सुरेल होते, तितकाच त्यामागील कथा आणि आठवणींचा भागही या मैफलीचे खास आकर्षण ठरला.

एखाद्या गीताची कल्पना कशी सुचली, कवितेतील भाव ओळखून त्याला चाल कशी लाभली, गीत संगीतबद्ध करताना कोणते प्रसंग घडले, अशा अनेक आठवणी पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी रसिकांशी संवाद साधत उलगडल्या. त्यामुळे अनेकदा ऐकलेली गाणी पुन्हा ऐकताना त्यांच्या निर्मितीमागील भावविश्व आणि संगीतप्रक्रिया जाणून घेण्याची नवी दृष्टी रसिकांना मिळाली.

लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या आठवणींनी रंगला भावुक क्षण

ज्येष्ठ गायिका भारतरत्न दिवंगत लता मंगेशकर आणि पद्मविभूषण आशा भोसले यांच्यासोबतच्या सांगीतिक प्रवासातील आठवणी सांगताना पं. हृदयनाथ मंगेशकर भावुक झाले.

दोन्ही बहिणींसोबत काम करतानाचे अनुभव, त्यांचे स्वभाववैशिष्ट्य, गाण्याच्या सादरीकरणातील बारकावे आणि सांगीतिक प्रवासातील विविध प्रसंग त्यांनी रसिकांसमोर मांडले. या आठवणींमुळे मैफलीला भावनिक आणि सांगीतिक अशी दुहेरी उंची मिळाली.

याचबरोबर कवयित्री शांता शेळके आणि गझलकार सुरेश भट यांच्या शब्दांमागील भावविश्व उलगडताना गीतनिर्मितीच्या प्रक्रियेतील अनेक रंजक प्रसंगही पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी सांगितले.

‘अभिजात मराठी’चा शब्द-सूर-संगीतातून अनुभव

‘अभिजात मराठी’ ही केवळ भाषेपुरती मर्यादित संकल्पना नसून शब्द, आशय, काव्य आणि संगीत यांच्या समृद्ध परंपरेचा अनुभव आहे, याची प्रचिती या मैफलीतून रसिकांना आली.

मराठी भाषेतील अभिजात शब्दवैभवाला अभिजात संगीताची जोड देत सादर झालेल्या गीतांनी रसिकांच्या मनातील भावनांचे अनेक पदर उलगडले. शब्दांचा अर्थ, त्यातील सूक्ष्म भाव आणि स्वरांची ताकद यांचा सुरेख मिलाफ या मैफलीत अनुभवायला मिळाला.

विभावरी आपटे-जोशी यांच्या गायकीला उत्स्फूर्त दाद

गायिका विभावरी आपटे-जोशी यांनी आपल्या भावपूर्ण आणि सुरेल गायकीने या गीतांना विशेष साज चढवला. ‘माझ्या सारंगा’पासून ‘मोगरा फुलला’पर्यंत प्रत्येक गीताचे भावविश्व त्यांनी आपल्या स्वरातून जिवंत केले.

प्रत्येक गीताच्या सादरीकरणानंतर रसिकांकडून मिळणारी उत्स्फूर्त दाद मैफलीची रंगत वाढवत होती. गीत, संगीत, आठवणी आणि संवाद यांच्या सुंदर मेळामुळे ही मैफल रसिकांसाठी अविस्मरणीय ठरली.

वाद्यवृंदाची सुरेल साथ

या सांगीतिक मैफलीला तबला साथ डॉ. राजेंद्र दुरकर आणि विक्रम भट, रिदमवर अजय अत्रे, बासरीवर अमर ओक, तर सिंथेसायझरवर दर्शना जोग यांनी साथ दिली. केदार परांजपे यांनी संगीत संयोजनाची जबाबदारी सांभाळली.

कार्यक्रमाला भारती मंगेशकर तसेच राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त गायिका सावनी रवींद्र यांची विशेष उपस्थिती लाभली.

अभिजात मराठी भाषेतील शब्दवैभव, मंगेशकरी संगीताची श्रीमंती, लता-आशा यांच्या सांगीतिक आठवणी आणि भावपूर्ण गायकी यांचा सुरेल संगम घडविणारी ‘गाणी मंगेशकरांची’ ही मैफल पिंपरी चिंचवडकर रसिकांच्या स्मरणात दीर्घकाळ राहणारी ठरली.