घाटकोपर पोलीस ठाण्यात किरीट सोमय्या यांचे १२ तास ठिय्या आंदोलन; रात्री ३ वाजता अखेर समाप्त

घाटकोपरमधील दोन अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणानंतर पोलिसांनी स्थानिक नागरिकांवर कारवाई केल्याच्या निषेधार्थ किरीट सोमय्या यांनी घाटकोपर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. तब्बल १२ तास चाललेल्या आंदोलनानंतर प्रकरण गुन्हे शाखेकडे देण्याच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

Apr 28, 2026 - 20:09
 0  31
घाटकोपर पोलीस ठाण्यात किरीट सोमय्या यांचे १२ तास ठिय्या आंदोलन; रात्री ३ वाजता अखेर समाप्त
घाटकोपर आंदोलन, किरीट सोमय्या,

मुंबई प्रतिनिधी उदय कासारे 

मुंबई : घाटकोपर येथील नित्यानंद नगर परिसरात दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या धक्कादायक घटनेनंतर राजकीय वातावरण तापले. या प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी घाटकोपर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन छेडले. तब्बल १२ तास सुरू असलेले हे आंदोलन रात्री ३ वाजता अखेर संपले.

मिळालेल्या माहितीनुसार, नित्यानंद नगर भागात ५ ते ६ वर्षांच्या दोन मुलींवर फिरोज शेख ऊर्फ सन्नी (वय ३८) याने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेत घटनास्थळावरून नेत असताना संतप्त नागरिकांनी आरोपीला मारहाण केली. यावेळी पोलिसांनाही मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला.

या घटनेनंतर दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले. पहिला गुन्हा आरोपी फिरोज शेख याच्यावर पॉस्को कायद्यान्वये दाखल करण्यात आला, तर दुसरा गुन्हा पोलिसांना मारहाण आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी नोंदवण्यात आला.

पोलिसांनी आरोपीसह पीडित मुलींचे काही नातेवाईक आणि स्थानिक नागरिक अशा चार जणांना अटक केल्याने परिसरात संतापाची लाट उसळली. यानंतर हे प्रकरण किरीट सोमय्या यांच्याकडे गेले.

सोमय्या यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन पोलिसांनी जबाब नोंदविताना चुकीची माहिती घेतल्याचा आरोप केला. जबाब नोंदवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करत त्यांनी घाटकोपर पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन सुरू केले.

सुरुवातीला पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वाराजवळ आंदोलन करण्यात आले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यातील कारागृहाबाहेर ठिय्या दिला. या आंदोलनात मुंबईच्या महापौर ऋतुजा तावडे, आमदार पराग शहा तसेच भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले.

रात्री उशिरापर्यंत आंदोलन सुरूच राहिले. अखेर रात्री ३ वाजण्याच्या सुमारास पोलीस आयुक्तांनी हे प्रकरण गुन्हे शाखेकडे सोपविण्याचे आश्वासन दिल्यानंतर सोमय्या यांनी आंदोलन मागे घेतले.

तब्बल १२ तास चाललेल्या या आंदोलनामुळे घाटकोपर पोलीस ठाणे परिसरात मोठी गर्दी झाली होती आणि पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता.

What's Your Reaction?

Like Like 7
Dislike Dislike 0
Love Love 1
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 1
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.