नाशिकच्या विकासाचा वेग वाढविणार; ‘विकसित नाशिक’चा रोडमॅप मंत्री गिरीश महाजन यांनी मांडला
स्वातंत्र्य दिनानिमित्त नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी त्यांनी सौर कृषी वाहिनी, शेतकरी कर्जमुक्ती, वीर प्रेरणा स्थळ, शिव मार्ग, राम मार्ग, सिंहस्थ कुंभमेळा, पर्यटन, गुंतवणूक आणि हरित नाशिकसह जिल्ह्याच्या विकासाचा रोडमॅप मांडला.
नाशिक ब्यूरो:
नाशिक, दि. 15 : नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून आगामी काळात विकासाचा वेग आणखी वाढविण्यात येणार आहे. सौर कृषी वाहिनी, शेतकरी कर्जमुक्ती, ‘वीर प्रेरणा स्थळ’, ‘शिव मार्ग’ आणि ‘राम मार्ग’ यांसह विविध विकास योजनांच्या माध्यमातून नाशिकच्या विकासाचा रोडमॅप तयार झाला आहे. शेतकरी, महिला आणि युवकांना पाठबळ देण्यासोबतच नाशिकच्या पर्यटनाला नवी दिशा देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन व कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी केले.
भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या आवारात मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी नाशिकच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प व्यक्त केला. शेतकरी, महिला, युवक, पर्यटन, पर्यावरण तसेच आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने सुरू असलेल्या आणि प्रस्तावित विविध महत्त्वपूर्ण उपक्रमांची माहिती त्यांनी दिली.
या कार्यक्रमास आमदार सरोज अहिरे, महापौर हिमगौरी आडके, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलीस आयुक्त डॉ. संदीप कर्णिक, विशेष पोलीस महानिरीक्षक संजय ऐनापुरे, नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, नाशिक महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, जिल्हा पोलीस अधीक्षक डी. एस. स्वामी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता अरुंधती शर्मा, महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण अकादमीचे अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
‘वीर प्रेरणा स्थळ’ उभारणार; अभिनव भारत मंदिराचे लवकरच लोकार्पण
नाशिक ही क्रांतिकारकांची भूमी असून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्थापन केलेले ‘अभिनव भारत मंदिर’ नव्या स्वरूपात उभे राहत आहे. या ऐतिहासिक वास्तूचे लवकरच लोकार्पण करण्यात येणार असून ते भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरेल, असे मंत्री महाजन यांनी सांगितले.
युवकांना देशभक्ती आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा मिळावी यासाठी शहीद जवानांच्या स्मृतींना अभिवादन करणारे ‘वीर प्रेरणा स्थळ’ जिल्ह्यात स्थापन करण्याची घोषणाही त्यांनी केली.
२० हजारांहून अधिक शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ
शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा असल्याचे नमूद करत मंत्री महाजन यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्याची माहिती दिली. नाशिक जिल्ह्यातील २० हजारांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे पावणेदोनशे कोटी रुपये थेट जमा करण्यात आले असून उर्वरित पात्र शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यात लाभ देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीत नाशिक राज्यात प्रथम
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या अंमलबजावणीत नाशिक जिल्हा राज्यात आघाडीवर असल्याचे मंत्री महाजन यांनी सांगितले. ग्रामपंचायतींनी मोठ्या प्रमाणावर जागा उपलब्ध करून दिल्यामुळे जिल्ह्यात सुमारे ५१५ मेगावॅट वीज उपलब्ध होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिवसा शेतीसाठी वीज उपलब्ध होण्यास मदत होत आहे.
३३ हजार वनहक्कधारकांना सातबाऱ्यावर हक्क
नाशिक जिल्ह्यातील सुमारे ३३ हजार वनहक्कधारकांचे अधिकार अभिलेख अर्थात सातबाऱ्यावर नावे नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामुळे वनहक्कधारकांना कृषी कर्जासह १०० पेक्षा अधिक शासकीय योजनांचा लाभ घेण्याचा मार्ग सुकर होणार आहे.
अडीच लाख शेतकरी ‘महाविस्तार’ ॲपशी जोडले
तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यातील अडीच लाखांहून अधिक शेतकरी ‘महाविस्तार’ ॲपचा वापर करीत असून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून शेतीतील उत्पन्न वाढविण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग केला जात असल्याचे मंत्री महाजन यांनी सांगितले.
‘शिव मार्ग’ आणि ‘राम मार्ग’मुळे आध्यात्मिक पर्यटनाला चालना
नाशिकमध्ये लवकरच ‘शिव मार्ग’ आणि ‘राम मार्ग’ या विशेष पर्यटन बस सेवा सुरू करण्यात येणार आहेत. या माध्यमातून आध्यात्मिक आणि तत्त्वज्ञानात्मक महत्त्व असलेली विविध स्थळे जोडली जाणार आहेत. भाविकांची सुविधा वाढण्यासोबतच पर्यटनामुळे स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास मंत्री महाजन यांनी व्यक्त केला.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद ३१ ऑक्टोबर रोजी होणार असून त्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून विविध स्तरांवर तयारी सुरू आहे. सिंहस्थाच्या अनुषंगाने सुरू असलेली कामे पूर्ण झाल्यानंतर नाशिक शहर आणि परिसराचा चेहरामोहरा बदललेला दिसेल, असा विश्वास मंत्री महाजन यांनी व्यक्त केला.
आगामी सिंहस्थ कुंभमेळा स्वच्छ, हरित, पर्यावरणपूरक आणि आनंददायी करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
२८ ऑगस्टपासून ‘कुंभ भक्ती संगम’
वारकरी संप्रदायाचा सिंहस्थ कुंभमेळ्यातील सहभाग वाढविण्यासाठी २८ ऑगस्टपासून ‘कुंभ भक्ती संगम’ या कार्यक्रमाचे आयोजन नाशिक शहरात करण्यात येणार आहे. वारकरी संप्रदायासह नागरिकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन मंत्री महाजन यांनी केले.
१३ हजार कोटींहून अधिक गुंतवणुकीचे करार
नाशिकमध्ये आयोजित गुंतवणूक परिषदेत १३ हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीचे करार झाले असल्याचे मंत्री महाजन यांनी सांगितले. निफाड येथील ड्रायपोर्टच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार असून नाशिकच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाला त्यातून चालना मिळणार आहे.
‘हरित नाशिक’चा संकल्प
‘एक पेड़ माँ के नाम’ उपक्रमांतर्गत शाळांच्या माध्यमातून पावणेदोन लाख वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. ‘उन्नत नाशिक’ अभियानाच्या माध्यमातून लोकसहभागातून स्वच्छ, सुंदर आणि हरित नाशिक घडविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगामी काळात नाशिक जिल्ह्याची ओळख ‘हरित जिल्हा’ म्हणून निर्माण होईल, असा विश्वास मंत्री महाजन यांनी व्यक्त केला.
जलसंधारण सप्ताहात सहभागी होण्याचे आवाहन
‘कॅच द रेन’ उपक्रमाची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये दखल घेतल्याचे सांगत हा नाशिक जिल्ह्यातील नागरिकांसाठी गौरव असल्याचे मंत्री महाजन यांनी नमूद केले. पाण्याबाबत जनजागृती करण्यासाठी आजपासून २१ ऑगस्टपर्यंत जलसंधारण सप्ताह राबविण्यात येत असून नागरिकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले.
गुणवंत अधिकारी, कर्मचारी आणि खेळाडूंचा गौरव
स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमादरम्यान मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पोलीस विभाग, नाशिक विभागीय आयुक्तालय, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, सामाजिक वनीकरण आणि जिल्हा जलसंधारण विभागातील विविध स्तरावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.
पोलीस दलातील सहायक पोलीस उपनिरीक्षक सुनील कदम आणि संजय वायचळे तसेच राज्य गुप्त वार्ता विभागाचे अपर उपायुक्त भगीरथ देशमुख यांना राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र पोलीस अकादमीचे अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना अतिउत्कृष्ट सेवा पदक, तर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे यांना उत्कृष्ट सेवा पदक मिळाल्याबद्दल त्यांचाही गौरव करण्यात आला.
तसेच १०० मीटर धावणे पॅरा ॲथलेटिक्स कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक मिळवल्याबद्दल दिलीप महादू गावित यांचा मंत्री महाजन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
वीर नारींचा सन्मान
सैन्यदलातील दिवंगत शिपाई संतोष डामसे यांच्या पत्नी वीर नारी श्रीमती उषा संतोष डामसे यांना तीन लाख रुपयांचा धनादेश आणि फिजिकल कॅज्युअल्टी आर्थिक मदत प्रदान करण्यात आली. तसेच दिवंगत नायक सदाशिव अशोक म्हसकर यांच्या पत्नी वीर नारी श्रीमती नीता सदाशिव म्हसकर यांना दोन लाख रुपयांचा धनादेश आणि फिजिकल कॅज्युअल्टी आर्थिक मदत मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते देण्यात आली.
“शेतकऱ्यांच्या कष्टाने, महिलांच्या शक्तीने, युवकांच्या स्वप्नांनी आणि विद्यार्थ्यांच्या जिद्दीने विकसित नाशिक घडेल. विकसित नाशिकमधून विकसित महाराष्ट्र आणि विकसित महाराष्ट्रातून विकसित भारत घडेल,” असा विश्वास मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी व्यक्त केला.
कार्यक्रमास माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी, नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0