होरायझन अकॅडमीत आंतरराष्ट्रीय योग दिन आणि जागतिक संगीत दिन उत्साहात साजरा

नाशिकमधील मखमलाबाद येथील होरायझन अकॅडमीमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन आणि जागतिक संगीत दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी योगाभ्यास, समूह वादन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

Jun 21, 2026 - 20:51
 0  17
होरायझन अकॅडमीत आंतरराष्ट्रीय योग दिन आणि जागतिक संगीत दिन उत्साहात साजरा
होरायझन अकॅडमी, मखमलाबाद, आंतरराष्ट्रीय योग दिन,

नाशिक, प्रतिनिधी : मखमलाबाद येथील होरायझन अकॅडमीमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन तसेच जागतिक संगीत दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली.

शाळेच्या प्राचार्या सौ. भाग्यश्री लाडोळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात योग आणि संगीत या दोन्ही विषयांशी संबंधित विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

योग दिनानिमित्त योग शिक्षिका सौ. नलिनी भवर यांनी विद्यार्थ्यांना विविध योगासने, प्राणायाम आणि सूर्यनमस्काराची प्रात्यक्षिके दाखवून योगाचे महत्त्व समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनीही उत्साहाने सहभाग घेत योगाभ्यास केला.

जागतिक संगीत दिनानिमित्त संगीत शिक्षक श्री. प्रसाद शिंदे यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या समूह वादनाने उपस्थितांची विशेष दाद मिळवली. संगीताच्या सुरेल वातावरणामुळे संपूर्ण परिसर भारावून गेला.

कार्यक्रमादरम्यान प्राचार्या सौ. भाग्यश्री लाडोळे यांच्या हस्ते योग शिक्षिका सौ. नलिनी भवर आणि संगीत शिक्षक श्री. प्रसाद शिंदे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी आपल्या मनोगतात प्राचार्या लाडोळे यांनी विद्यार्थ्यांनी निरोगी आणि संतुलित जीवनासाठी नियमित योगाचा अंगीकार करावा तसेच संगीताच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व विकास साधावा, असे आवाहन केले.

विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0