हुबळी-धारवाड महानगरपालिकेच्या शिष्टमंडळाची बृहन्मुंबई महानगरपालिकेला भेट; विविध विभागांच्या कामकाजाची घेतली माहिती

कर्नाटकातील हुबळी-धारवाड महानगरपालिकेच्या शिष्टमंडळाने बृहन्मुंबई महानगरपालिकेला भेट देत विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेतला. नागरी सेवा, स्वच्छता, आरोग्य सुविधा आणि पायाभूत सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

May 22, 2026 - 22:00
 0  5
हुबळी-धारवाड महानगरपालिकेच्या शिष्टमंडळाची बृहन्मुंबई महानगरपालिकेला भेट; विविध विभागांच्या कामकाजाची घेतली माहिती
बृहन्मुंबई महानगरपालिका, हुबळी धारवाड महानगरपालिका

मुंबई, दि. २२ मे २०२६ : कर्नाटकातील हुबळी-धारवाड महानगरपालिकेच्या शिष्टमंडळाने बृहन्मुंबई महानगरपालिकेला भेट देत विविध विभागांच्या कार्यपद्धतीची माहिती घेतली. यावेळी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचीही सदिच्छा भेट घेण्यात आली.

हुबळी-धारवाड महानगरपालिकेच्या महापौर ज्योती पाटील यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या शिष्टमंडळात उपमहापौर संतोष चव्हाण, सभागृह नेते तथा माजी महापौर इरेश आंचतगेरी, विरोधी पक्षनेते इमाम हुसेन यालिगार आणि उपआयुक्त (विकास) विजयकुमार आर. यांचा समावेश होता.

२१ मे २०२६ रोजी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात झालेल्या या भेटीदरम्यान विविध विभागांच्या कामकाजाचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये महानगरपालिका सचिव विभाग, व्यवसाय विकास विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभाग, पर्यावरण विभाग आणि पायाभूत सुविधा विभागाचा समावेश होता.

शिष्टमंडळासमोर नागरी सेवा, सार्वजनिक स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य सुविधा, घनकचरा व्यवस्थापन, पायाभूत सुविधा विकास तसेच नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात येणाऱ्या विविध सेवांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

यावेळी नागरी सुविधा अधिक प्रभावी करण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना, सेवा व्यवस्थापनातील सुधारणा आणि प्रशासनातील समन्वय यावरही चर्चा करण्यात आली.

हुबळी-धारवाड महानगरपालिकेच्या शिष्टमंडळाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत भविष्यात विविध क्षेत्रांमध्ये परस्पर सहकार्य वाढविण्याची भूमिका व्यक्त केली.

बैठकीनंतर शिष्टमंडळाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागातील नियंत्रण कक्षालाही भेट देऊन आपत्कालीन सेवा व्यवस्थेची माहिती घेतली.

यानंतर शिष्टमंडळाने मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सभागृह नेते गणेश खणकर, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे, शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0