स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य शासकीय सोहळ्याची मंत्रालयात रंगीत तालीम; 15 ऑगस्टला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण

स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभाची मंत्रालयात रंगीत तालीम घेण्यात आली. 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9.05 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण होणार आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य शासकीय सोहळ्याची मंत्रालयात रंगीत तालीम; 15 ऑगस्टला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण
स्वातंत्र्यदिन 2026, मंत्रालय ध्वजारोहण, देवेंद्र फडणवीस, स्वातंत्र्यदिन सोहळा, मंत्रालय रंगीत तालीम, 15 ऑगस्ट, महाराष्ट्र सरकार, मुंबई,

प्रतिनिधी : देवानंद शिंदे 

मुंबई, दि. 13 ऑगस्ट 2026 : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभाची तयारी पूर्ण झाली असून, आज या सोहळ्याची रंगीत तालीम घेण्यात आली. येत्या शनिवार, 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9.05 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण होणार आहे.

सामान्य प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचार विभागामार्फत मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभासाठी विविध तयारी करण्यात आली आहे. त्याचाच भाग म्हणून आज मंत्रालय परिसरात ध्वजारोहण समारंभाची रंगीत तालीम घेण्यात आली.

पोलीस पथकांकडून ध्वजाला मानवंदना

आज झालेल्या रंगीत तालीमेत राजशिष्टाचार विभागाचे अवर सचिव अविनाश सोलवट यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर उपस्थित पोलीस दलाच्या पथकांनी ध्वजाला मानवंदना दिली.

या रंगीत तालीमेत मुंबई पोलीस, राज्य राखीव पोलीस दल तसेच घोडेस्वार पथक सहभागी झाले. यावेळी पोलीस दल, मुख्यमंत्री सुरक्षा दल, राजशिष्टाचार विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

विविध संवैधानिक संस्था व शासकीय विभागांचे प्रमुख उपस्थित राहणार

15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, लोकायुक्त, मुंबईतील मंत्री, खासदार, आमदार, मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, मुख्य निवडणूक आयुक्त, मुख्य माहिती आयुक्त तसेच महावाणिज्य दूतावासांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

याशिवाय सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाचे अध्यक्ष, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा, राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू यांचीही उपस्थिती राहणार आहे.

भारतीय सेना, नौदल, वायुदल आणि भारतीय तटरक्षक दलाचे वरिष्ठ अधिकारीही या मुख्य शासकीय सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.

मंत्रालय परिसरातील सुरक्षा व अन्य व्यवस्थांची पाहणी

स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य शासकीय सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मंत्रालय परिसरातील सुरक्षा व्यवस्था, संचलन, ध्वजारोहण तसेच समारंभाच्या अन्य व्यवस्थांची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

रंगीत तालीमेद्वारे विविध व्यवस्थांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. सोहळा सुरळीत आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडण्यासाठी संबंधित विभागांकडून आवश्यक तयारी करण्यात आली आहे.

सनई वादनाने रंगीत तालीमेला विशेष वातावरण

रंगीत तालीम सोहळ्यात कलाकार किरण शिंदे, अरुण शिंदे आणि विवेक शिंदे यांनी सनई वादन केले. सनईच्या मंगलमय सुरांनी मंत्रालय परिसरात स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याचे वातावरण अधिक उत्साहपूर्ण झाले.