इंदिरानगर SRA प्रकल्पात कथित गैरव्यवहाराचा आरोप; पात्र झोपडीधारकांनी स्वतंत्र चौकशीची मागणी

पिंपरी-चिंचवडमधील इंदिरानगर SRA पुनर्वसन प्रकल्पात पात्र झोपडीधारकांवर अन्याय होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. पात्र लाभार्थ्यांना डावलून अपात्र व्यक्तींना लाभ दिल्याचा दावा करत झोपडीधारकांनी SRA प्रशासनाला कायदेशीर नोटीस बजावून स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे.

इंदिरानगर SRA प्रकल्पात कथित गैरव्यवहाराचा आरोप; पात्र झोपडीधारकांनी स्वतंत्र चौकशीची मागणी
इंदिरानगर SRA, SRA प्रकल्प, झोपडपट्टी पुनर्वसन, पिंपरी चिंचवड,

पुणे| प्रतिनिधी : रोहन सोनाळे 

पिंपरी-चिंचवडमधील इंदिरानगर झोपडपट्टी पुनर्वसन (SRA) प्रकल्पात पात्र झोपडीधारकांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत स्थानिक रहिवाशांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पात्र लाभार्थ्यांना वगळून अपात्र व्यक्तींना पुनर्वसन योजनेचा लाभ दिला जात असल्याचा आरोप करत इंदिरानगर झोपडपट्टी पुनर्वसन विकास संस्थेच्या वतीने संस्थेचे विधिज्ञ ॲड. अजित बोराडे यांच्या मार्फत SRA प्रशासनाला कायदेशीर नोटीस बजावण्यात आली असून संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

संस्थेच्या म्हणण्यानुसार, इंदिरानगर परिसरातील अनेक कुटुंबे गेली ३५ ते ४० वर्षे या भागात वास्तव्यास आहेत. मात्र पुनर्वसनासाठी तयार करण्यात आलेल्या पात्रता यादीत अनेक पात्र झोपडीधारकांची नावे वगळण्यात आली असून काही अपात्र व्यक्तींचा समावेश करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

पात्रता निश्चिती आणि सर्वेक्षण प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्याचा दावा करत नागरिकांनी वेळोवेळी सादर केलेल्या हरकती आणि तक्रारींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याचेही संस्थेने म्हटले आहे.

इंदिरानगर झोपडपट्टी पुनर्वसन विकास संस्थेने SRA प्रशासनाकडे पात्रता यादी व सर्वेक्षण प्रक्रियेची स्वतंत्र चौकशी, सर्व पात्र दाव्यांची फेरतपासणी, अपात्र व्यक्तींच्या समावेशाची चौकशी तसेच संबंधित सर्व नोंदी सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे. याशिवाय प्रलंबित हरकती व आक्षेप निकाली निघेपर्यंत कोणत्याही झोपडीधारकावर बेदखल कारवाई, पाडकाम किंवा सक्तीचे स्थलांतर करू नये, अशी मागणी ॲड. अजित बोराडे यांनी केली आहे.

संस्थेने असा आरोपही केला आहे की, संपूर्ण पुनर्वसन प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात अडकली असून पात्र लाभार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. काही रहिवाशांनी पुनर्वसनातील घरांचे आश्वासन देत कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहार झाल्याचाही आरोप केला आहे. तसेच प्रभावित कुटुंबांसाठी पुरेशी आणि सुरक्षित ट्रान्झिट व्यवस्था उपलब्ध नसल्याने अनेकांना गंभीर अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

ॲड. अजित बोराडे म्हणाले...

"झोपडीधारकांनी वेळोवेळी निवेदने, तक्रारी आणि हरकती सादर करूनही त्यांना अद्याप सुनावणीची संधी मिळालेली नाही. हरकती प्रलंबित असताना पुनर्वसनाची प्रक्रिया पुढे रेटण्याचा प्रयत्न हा नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांचे उल्लंघन आहे. पुनर्वसन हा झोपडीधारकांचा केवळ कायदेशीर अधिकार नसून मानवी हक्कदेखील आहे. त्यामुळे ही प्रक्रिया पारदर्शक आणि कायद्याच्या चौकटीतच राबविणे आवश्यक आहे."

दुर्योधन कदम यांचा इशारा

इंदिरानगर झोपडपट्टी पुनर्वसन विकास संस्थेचे अध्यक्ष दुर्योधन कदम यांनी इशारा देताना म्हटले की, "पात्र झोपडीधारकांच्या हक्कांवर गदा आणणारी कोणतीही कारवाई सहन केली जाणार नाही. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून वस्तुस्थिती समोर आणावी आणि दोषींवर कारवाई करावी. अन्यथा न्यायालयीन तसेच लोकशाही मार्गाने तीव्र लढा उभारण्यात येईल."

झोपडीधारकांनी SRA प्रशासनाने निष्पक्ष चौकशी करून पात्र लाभार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे.