जनगणना २०२७ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवा; व्यापक प्रचारासाठी सेलिब्रिटींची मदत घ्या – डॉ. विपिन शर्मा

जनगणना २०२७ प्रभावीपणे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यापक प्रचार आणि प्रसिद्धी मोहीम राबविण्याचे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिले. नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रभावशाली व्यक्ती, बॉलिवूड सेलिब्रिटी आणि क्रीडापटूंची मदत घेण्याचे आवाहन करण्यात आले.

Apr 28, 2026 - 17:22
Apr 28, 2026 - 17:23
 0  14
जनगणना २०२७ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवा; व्यापक प्रचारासाठी सेलिब्रिटींची मदत घ्या – डॉ. विपिन शर्मा
जनगणना २०२७, मुंबई जनगणना, डॉ विपिन शर्मा, बीएमसी जनगणना मोहीम, मुंबई

मुंबई : अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारावर होणारी जनगणना २०२७ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यंत्रणेने उत्तम तयारी करावी. तसेच जनगणनेच्या व्यापक प्रचार आणि प्रसिद्धीसाठी विभागनिहाय नेमलेल्या चमूंनी विशेष प्रयत्न करावेत, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) तथा अतिरिक्त प्रधान जनगणना अधिकारी डॉ. विपिन शर्मा यांनी दिले.

वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील पेग्विन कक्षात आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते.

जनगणना प्रक्रियेत सर्वसामान्य नागरिकांचा सहभाग वाढावा यासाठी अतिमहत्त्वाच्या आणि प्रभावशाली व्यक्ती, बॉलिवूड सेलिब्रिटी, क्रीडापटू यांची मदत घेऊन प्रचार-प्रसारावर भर द्यावा, असेही त्यांनी सांगितले.

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात पहिल्या टप्प्यात १ मे २०२६ ते १५ मे २०२६ या कालावधीत स्वगणना प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतर घरयादी व घरगणनेची प्रक्रिया १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे.

डॉ. विपिन शर्मा यांनी अधिकाऱ्यांना आपल्या विभागातील प्रभावशाली व्यक्ती, बॉलिवूड कलाकार आणि क्रीडापटू यांची पूर्वनियोजित वेळ घेऊन १ मे रोजी माहिती भरून घेण्याच्या सूचना दिल्या. तसेच जनगणनेत सहभागी होण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी चित्रफिती, समाजमाध्यमे आणि इतर प्रचार माध्यमांचा वापर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

या बैठकीस अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, सर्व सह आयुक्त, उपआयुक्त आणि सहायक आयुक्त उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 3
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0